मुंबई : ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ) समाज परिवर्तन व्यवस्था परिवर्तन करेल आणि त्यातून पुढे राष्ट्रपुनर्निर्माण होईल. असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार भानुशे यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६० व्या कोकण प्रांत अधिवेशनाचा (तीन दिवसीय) शुभारंभ गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल नगर, जी. एच. हायस्कूल, बोरिवली येथे झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अभाविपचे पूर्व कार्यकर्ते अभिनेते पंकज त्रिपाठी, अधिवेशनाचे स्वागत समिती अध्यक्ष जयेश वालिया, स्वागत समिती सचिव राजन छाछड, कोकण प्रांत अध्यक्ष वैद्य कैलास सोनमनकर, कोकण प्रांत मंत्री राहुल राजौरिआ, आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत मंदार भानुशे पुढे म्हणाले, विद्यार्थी परिषदेची छात्रशक्ती आजच्या पिढीचे नेतृत्व करते. त्यांच्या आशा आकांक्षानुसार आपण विविध कार्यक्रमांची रचना करत असतो. राष्ट्राच्या पुनर्निर्माणात अभाविपच्या युवाशक्तीचे समर्पण अतुलनीय आहे. गेल्या ७८ वर्षांपासून विद्यार्थी परिषदेचे कार्य सुरू आहे. विद्यार्थी परिषदेचे मुख्य उद्दिष्ट व्यक्तिनिर्माणाचे आहे. महाविद्यालय, विद्यापीठातील राष्ट्र प्रथम विचारानी प्रेरित विद्यार्थ्यांना संघटित करून, त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम विद्यार्थी परिषद करत आली आहे.
प्रांत अध्यक्ष वैद्य कैलास सोनमनकर म्हणाले, अभाविप ही जगभरातील सर्वात मोठे छत्र संघटन आहे. संपूर्ण भारत देशातील सदस्यता ७५ लाखापेक्षा अधिक आहे. कोकण प्रांताची १ लाख ९ हजार सदस्यता आहे. समर्पित कार्यकर्त्यांचे दर्शन नेहमीच घडते. सामाजिक क्षेत्रातही अभाविपचे महत्त्वाचे योगदान आहे. केवळ संख्यात्मक प्रगतीच नाही तर गुणात्मक प्रगतीसुद्धा कोकण प्रांताने केली आहे.
प्रांत मंत्री राहुल राजौरिआ यावेळी म्हणाले, विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम अभाविपची छात्रशक्ती करते. अभाविप मधील 'जेन-झी' भारत मातेला समर्पित असून राष्ट्र प्रथम हा विचार समोर ठेऊन काम करते. देशविरोधी नरेटीव्हला चोख प्रत्युत्तर देण्याचे कार्य अभाविप छात्रशक्ती करत आली आहे.
अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी यावेळी केवळ अभिनेते म्हणून नाही तर पूर्व अभाविप कार्यकर्ता म्हणून उपस्थितांशी संवाद साधला. अभाविपच्या बोधचिन्हातील 'ज्ञान, शील, एकता' या तीन शब्दांचे आपल्या जीवनातील महत्त्व त्यांनी याप्रसंगी विषद केले. छात्रजीवनात ज्ञान हेच सर्वोपरी असल्याचे ते म्हणाले. अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत वावरताना, काम करताना ज्ञान, शील, एकता या तीन गुणांचा त्यांच्या आयुष्यात कसा प्रभाव पडला हे पंकज त्रिपाठी यांनी सांगितले. १९९३ दरम्यान अभाविपच्या कार्यात सक्रीय असताना तेव्हाच्या आठवणी, गमतीशीर किस्से त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक