मुंबई : ( Nainital Schools ) नैनीताल जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ‘सांता क्लॉज’ बनवण्याचे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांवर विश्व हिंदू परिषदेकडून आक्षेप नोंदवण्यात आला. परिषदेचे जिल्हाध्यक्ष खजान भट्ट यांनी या संदर्भात नैनीतालचे जिल्हाधिकारी ललित मोहन रयाल यांना पत्र लिहून, पालकांची पूर्वपरवानगी न घेता अशा प्रकारच्या धार्मिक उपक्रमांमध्ये मुलांना सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी केली आहे.
या पत्रामध्ये खजान भट्ट यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, सरकारी शाळा या पूर्णतः शैक्षणिक संस्था असून त्यामध्ये कोणत्याही एका धर्माशी निगडित प्रतीकात्मक कार्यक्रम सक्तीने राबवले जाणे योग्य नाही. पालकांची संमती न घेता मुलांना ‘सांता क्लॉज’ करणे हे पालकांच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरू शकते.
या प्रकरणाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने योग्य चौकशी करून आवश्यक ते निर्देश देण्याचे संकेत दिले आहेत. सरकारी शाळांमध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी आधीच मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. जर त्या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळले, तर संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर स्थानिक नागरिकांकडून देखील चिंता व्यक्त होत आहे. अनेक पालकांनी आमच्या मुलांना आमच्या धर्माच्या गोष्टींशिवाय अन्य धर्माच्या गोष्टी शिकवू नयेत असे सांगितले आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.