Devendra Fadnavis : ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    24-Dec-2025   
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की, ते भावनिक बोलतात. पण आता भावनिक बोलण्याला जनता भुलणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर दिली.
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "ठाकरे बंधू एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे राजकीयदृष्ट्या फार काही घडेल असा कुणाचा समज असल्यास तो बाळबोध समज आहे. काही माध्यमे तर असे दाखवत होते, जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होत आहे. इकडनं झेलेस्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली, असे सगळे सुरु होते," असा टोला त्यांनी लगावला.
 
हेही वाचा :  Chandrashekhar Bawankule : मुंबई तोडण्याची खोटी कॅसेट दरवेळी प्रमाणे लावली जात आहे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
 
मुंबईकर महायुतीच्याच पाठीशी
 
"कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावे लागते त्यादृष्टीने अस्तित्वासाठी लढणाऱ्या दोन पक्षांनी केलेली ही युती आहे. यापलीकडे त्यातून फार अन्वयार्थ काढण्याचे कारण नाही. यामुळे फार काही परिणाम होईल असे मला वाटत नाही. कारण ज्याप्रकारे या मंडळींनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला, मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे पाप केले, त्यामुळे मराठी माणूसही त्यांच्या सोबत नाही. तसेच ज्याप्रकारे त्यांनी अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले, त्यामुळे तेसुद्धा यांच्या सोबत नाही. मुंबईमध्ये कुणीही त्यांच्या सोबत येणार नाही. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की, ते भावनिक बोलतात. पण आता भावनिक बोलण्याला जनता भुलणार नाही. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही दोन चार लोक सोबत घेतले तरीही महायुतीचे काम, त्यांनी केलेला विकास, भविष्यातील मुंबई तयार करण्याची केलेली सुरुवात आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घर देण्याचा जो कार्यक्रम सुरू केला ते बघून निश्चितपणे मुंबईकर महायुतीच्या पाठीशीच उभे राहतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)
 
खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला
 
"आकड्यांशी माझा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत, ते कुठे आकडे लावतात त्यात मला रस नाही. ज्याप्रकारे ही पत्रकार परिषद झाली, त्याच्या पाठीशी जो वलय तयार केला होता त्यातून खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला, अशी होती. ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणजे सर्व काही आहे, हा त्यांचा गर्व आणि दुराभिमान असून यामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. मुंबईकरांना सेवेकरी हवे असून राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नकोत," असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
 
हे वाचलात का ?:  Thackeray Brothers: ठाकरे बंधूंच्या राजकीय प्रयोगाचा प्रारंभ; उबाठा-मनसे एकत्र लढणार
 
किती वर्षे एकच स्क्रिप्ट घेऊन फिरणार
 
उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि अमीत शाह यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "त्यांनी काही तरी स्क्रिप्ट बदलली पाहिजे. किती वर्षे एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहेत? काही तरी नवीन आणा. उद्धवजींनी विकासावर बोलले तर मी हजार रुपये देईन, अशी घोषणा मी केली होती. पण अजूनही माझे हजार रुपये वाचले आहेत. ते अजून विकासाची एकही गोष्ट बोलत नाहीत. ही निवडणूक विकासाची आणि मुंबईकराच्या हिताची निवडणूक आहे. त्यावर ते एक शब्दही बोलू शकत नाही. त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागेल. मिठी नदीचा आणि मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल. पण ते देऊ शकत नाहीत." तसेच आमच्या नवनाथ बन यांनी परवाच या युतीचे अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. हा भीती संगम आहे हा प्रीती संगम नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....