मुंबई : (Ashish Shelar) मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेय हे विधान राज ठाकरे यांचे होते. वेगळा पक्ष करताना चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला, असे ते म्हणाले होते. त्यामुळे हे बडवे आणि चार कारकून कोण आहेत? तसेच आता या बडव्यांशी आणि कारकुनांशी अचानक घरोबा का? असा सवाल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसेला केला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केलेल्या युतीबद्दल बोलताना मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, "दोन भाऊ एकत्र आले तर आनंद आहे. पण हे पक्ष वेगळे का झाले? दोन पक्ष का निर्माण झाले? याचे उत्तर मराठी माणूस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना विचारत आहे. कुठल्याही मराठी माणसाने दोन पक्ष वेगळे करा, दोन भाऊ वेगळे करा यासाठी आंदोलन केले नव्हते. लाव रे तो व्हिडीओ म्हणणाऱ्यांच्या भाषणांचे आमच्याकडे असंख्य व्हिडिओ असून आम्हीसुद्धा लाव रे व्हिडिओ अंजनरूपी तुमच्या डोळ्यात घालू. ज्यावेळी मुंबई, मुंबईकर आणि मराठी माणसाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मतरुपी आशीर्वाद दिला तेव्हा तुम्हाला कंप फुटू लागला. त्यामुळे या भीतीपोटी घाबरलेल्या मनस्थितीत हे दोन पक्ष एकत्र येत आहेत, हे मराठी माणूस जाणतो. ते मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर त्यांच्या पक्ष अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत." (Ashish Shelar)
"राज ठाकरे म्हणतात, जागा वाटप करणार नाही. तुम्हाला भीती वाटते का? एका भावाला दुसऱ्या भावाला फसवायचे आहे की, अजूनही वादविवाद आहेत, याचे उत्तर द्या. कोण कोणास केव्हा म्हणाले? हे आम्ही मराठी शाळेमध्ये इतिहासात आम्ही शिकलो. राज ठाकरे यांनी पळवापळवीचा प्रश्न उपस्थित करताना माझे नगरसेवक कसे पळवले हे बाजूला बसलेल्या उद्धवजींना विचारावे," असेही ते म्हणाले. (Ashish Shelar)
खुनी काँग्रेससोबत हातमिळवणी कशी केली?
"संयुक्त महाराष्ट्रातल्या सर्व चळवळीतल्या नेतृत्वाचा आम्हाला आदर, अभिवादन, अभिमान आहे. पण ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्रातल्या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या, निष्पाप मुलांना मारले, खुनी काँग्रेससोबत उद्धवजी तुम्ही हातमिळवणी कशी केली? तुमचे सुपुत्र म्हणाले होते की, मनसे हा संपलेला पक्ष आहे. मग आता काय चवनप्राश दिला का? मुंबईच्या मराठी माणसाच्या मनात असंख्य प्रश्न आहे. हे दोन्ही पक्ष मराठी माणसासाठी एकत्र आले नसून हा संधीसाधूपणा आणि सत्तापिपासूपणा आहे. १५ तारखेला घोडा मैदान असून आमचे ठरले आहे याच भूमिकेत मुंबईकर आहेत," असेही मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....