नवी मुंबई विमानतळ उड्डाणांसाठी सज्ज! २५ डिसेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिल्या विमानाचे टेकऑफ

Total Views |
 Navi Mumbai International Airport
 
नवी मुंबई : ( Navi Mumbai International Airport ) बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या म्हणजेच गुरुवार, दि.२५ डिसेंबर रोजी व्यावसायिक उड्डाणासाठी सज्ज आहे. विमानतळ प्राधिकरणाने ऑपरेशनल रेडीनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षभरात अनेक वेळा लाईव्ह ऑपरेशनल ट्रायल घेतल्या. या लाईव्ह ऑपरेशनल ट्रायल यशस्वी झाल्या आहेत. दि.२५ डिसेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिल्या विमानाचे टेकऑफ होणार आहे. नवी मुंबईकरांसाठी हा मोठा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
 
दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी उद्घाटन पार पडले. या विमानतळावरून उद्या दि.२५ डिसेंबर रोजी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआय) औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू केले जाणार आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या मते , चाचण्यांदरम्यान आलेल्या सर्व समस्यांची नोंद करण्यात आली. एका वेळी, १,३०० हून अधिक समस्या नोंदवण्यात आल्या होत्या, ज्यानंतर सोडवण्यात आल्या. दि.२५ डिसेंबर रोजी नवी मुंबई विमानतळ सुरु होईल. तेव्हा टर्मिनल, धावपट्टी आणि सर्व आवश्यक यंत्रणा पूर्णपणे कार्यरत होतील.
 
हेही वाचा : भारतीय महिला क्रिकेट संघानं घेतलं श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात जाऊन दर्शन
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस ठाणे सुरु
 
नवी मुंबई विमानतळ परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस ठाणे’ सुरू करण्यात आले आहे. पनवेल शहर आणि उलवे पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून हे स्वतंत्र ठाणे स्थापन करण्यात आले आहे. या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, विमानतळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखाली राहणार आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून या ठाण्यासाठी सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच सहाय्यक उपनिरीक्षक, हवालदार, महिला कर्मचारी आणि शिपाई अशा विविध पदांवरील ४० हून अधिक अधिकारी व अंमलदारांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 
हे वाचलत का? - रेल्वेमंत्रालयाकडून किरकोळ भाडेवाढ जाहीर
 
तारघर नवे रेल्वे स्थानक सज्ज
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बेलापूर-नेरूळ-उरण या रेल्वे मार्गावर १०० कोटी रुपये खर्चून तारघर हे नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहे. तारघर स्टेशन हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. तारघर हे नवे स्टेशन कार्यान्वित झाले असून याशिवाय उरण मार्गावर आणखी एक महत्त्वाची सुविधा प्रवाशांच्या सेवेत देण्यात आली आहे. बेलापूर-नेरूळ-उरण या मार्गावर लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. तसेच, तारघर स्टेशन सुरू झाल्यामुळे कामोठे, उलवे, बामणडोंगरी परिसरातील रहिवाशांनाही थेट रेल्वे सेवेचा फायदा मिळणार आहे.
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.