मुंबई : ( Arvind Sawant ) मुंबईला मेगा कनेक्टिव्हिटी देणारी भूमिगत मुंबई मेट्रो ३ सध्या मुंबईकरांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आरे ते कफ परेड या मार्गिकेला पहिल्या दिवसापासूनच मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रवासी मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घेत आहेत. या प्रकल्पामुळे दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवास सुलभ झाल्याने अनेक मुंबईकरांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या मेट्रो ३ प्रकल्पाला सुरुवातीच्या टप्प्यात तीव्र विरोध झाला होता, त्या प्रकल्पाचा प्रवास आता विरोधकांनाही आकर्षित करत असल्याचे दिसत आहे. उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अलीकडेच भूमिगत मेट्रो ३ने 'दादर ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी–१)' दरम्यान प्रवास केला. या प्रवासाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत मेट्रो प्रकल्पावर काम करणाऱ्या टीमचे कौतुक केले आणि प्रवाशांशी संवादही साधला.
मात्र, त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. अनेक नेटकऱ्यांनी, “या प्रकल्पाला गती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख का नाही?” असा थेट सवाल उपस्थित केला. काहींनी तर “आरे कारशेड प्रकरणी आपला विरोध आठवतोय का?” अशी आठवण करून देत खोचक टोले लगावले.
दरम्यान, कधीकाळी ‘आरे बचाव’ आंदोलनात सहभागी असलेले काही तथाकथित पत्रकार, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्तेही आता मेट्रो ३च्या प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मेट्रो प्रशासन आणि राज्य सरकारचे कौतुक केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मेट्रो ३च्या ‘आचार्य अत्रे चौक ते कफ परेड’ या अंतिम टप्प्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमाला निमंत्रण असूनही खासदार अरविंद सावंत उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे मेट्रो ३चा प्रवास आणि त्यानंतरची सोशल मीडिया चर्चा पाहता, राजकीय भूमिका बदलत असल्या तरी मुंबईकरांची आठवण मात्र ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.