मुंबई : (Bangladesh Protests) बांगलादेशातील प्रमुख इंग्रजी दैनिक ‘द डेली स्टार’च्या कार्यालयावर इस्लामिक कट्टरपंथींनी तोडफोड करून आग लावल्यानंतर काही दिवसांनी, वृत्तपत्राचे संपादक महफूज अनाम यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या हल्लेखोरांचा उद्देश केवळ कार्यालय जाळण्यापुरता मर्यादित नव्हता, तर एकूण एक कर्मचाऱ्यांची हत्या करण्याचाच प्रयत्न यावेळी करण्यात आला, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना अनाम यांनी ईशारा दिला की, बांग्लादेश आता ‘हत्यांच्या युगात’ प्रवेश करत आहे.(Bangladesh Protests)
ते म्हणाले, “त्यांना इमारत जाळायची नव्हती, तर डेली स्टारमधील कर्मचाऱ्यांची हत्या करायची होती. आपण आता हत्यांच्या युगात आलो आहोत. बांगलादेशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आता एक दूरचे स्वप्न बनले आहे. आता प्रश्न अभिव्यक्तीचा नसून, जिवंत राहण्याचा आहे.” ही घटना १८ डिसेंबर रोजी घडली. त्याआधी इंकलाब मंच या संघटनेचा संयोजक आणि कट्टर इस्लामिक नेता शरीफ उस्मान हादी याचा मृत्यू झाला होता. १२ डिसेंबर रोजी अज्ञात हल्लेखोराने हादी याच्यावर गोळीबार केला होता. त्याच्या मृत्यूची बातमी बाहेर येताच, कट्टर समर्थकांनी प्रथोम आलो आणि द डेली स्टार या प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले चढवले. या वृत्तपत्रांनी पक्षपाती वार्तांकन केल्याचा आरोप करत जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली. (Bangladesh Protests)
अशी माहिती आहे की, या हल्ल्यांदरम्यान प्रथोम आलो आणि द डेली स्टारच्या कार्यालयांमध्ये अनेक पत्रकार आणि कर्मचारी अडकून पडले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनेक तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. याच इस्लामिक जमावाने ढाका येथील धनमंडी परिसरात बांगलादेशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांच्या वडिलोपार्जित घराचीही तोडफोड केली. दि. १८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मायमेनसिंग जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात एका हिंदू व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. दिपू चंद्र दास असे या व्यक्तीचे नाव असून, कथित ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने त्याला मारहाण करून ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला बांधून पेटवण्यात आला होता. (Bangladesh Protests)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक