मुंबई : (Bangladesh Protests) बांग्लादेशातील कट्टरपंथी नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. तपास यंत्रणांनी या हत्येतील मुख्य आरोपी म्हणून फैसल करीम मसूद याची ओळख पटवल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या देशाबाहेर जाण्यावरही बंदी घातली आहे. सध्या देशभरात त्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून ‘लूकआऊट नोटीस’ही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, हादी याच्या मृत्यूनंतर बांग्लादेशातील विविध भागांत निषेध आंदोलन आणि हिंदूंवरील अत्याचार अद्यापही सुरूच आहेत. (Bangladesh Protests)
ढाका येथील एका न्यायालयाने रविवारी (२१ डिसेंबर २०२५) या हत्याकांडातील मुख्य आरोपी फैसल करीम मसूद याला देश सोडण्यास मनाई केली आहे. ज्या गोळीबारात शरीफ उस्मान हादी याचा मृत्यू झाला, त्या घटनेतील मुख्य संशयित म्हणून मसूद याच्याकडे पाहिले जात आहे. पोलिसांनी मसूद आणि इतर संशयित हल्लेखोरांविरोधात अटक वॉरंटही जारी केले आहे. (Bangladesh Protests)
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, फैसल करीम मसूद अद्याप बांग्लादेशातच असल्याची शक्यता आहे; मात्र अटकेपासून वाचण्यासाठी तो वारंवार आपले ठिकाण बदलत आहे. त्याला पकडण्यासाठी अनेक विशेष पथके तैनात करण्यात आली असून अनेक जिल्ह्यांमध्ये निगराणी वाढवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की, गोळीबारानंतर लगेचच हल्लेखोरांनी देश सोडून पलायन केले. तथापि, तपास यंत्रणांनी अधिकृतपणे सांगितले आहे की आरोपींनी देश सोडल्याची कोणतीही ठोस माहिती त्यांच्या हाती आलेली नाही. (Bangladesh Protests)
अशी माहिती आहे की, फैसल करीम मसूद आणि दुसरा आरोपी मोहम्मद आलमगीर शेख यांनी मयमनसिंह येथील हालुआघाट परिसरातून एका निर्जन सीमा मार्गाने भारतातील मेघालय राज्यात प्रवेश केला. या दरम्यान त्यांना मानव तस्करी करणाऱ्या जाळ्याची मदत मिळाल्याचा आरोप आहे. फैसलने अगदी जवळून गोळी झाडली, तर आलमगीर मोटारसायकल चालवत होता, असेही सांगण्यात येते. तपासकर्त्यांचा दावा आहे की हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी अनेक वेळा वाहने बदलली आणि ढाक्यातील विविध भागांतून प्रवास करत मयमनसिंह येथे पोहोचले. (Bangladesh Protests)
मात्र बांग्लादेश पोलिसांचे अतिरिक्त महानिरीक्षक खंदाकर रफीकुल इस्लाम यांनी फैसलने देश सोडल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “तो सीमा ओलांडून गेला आहे, असे सिद्ध करणारी कोणतीही विश्वासार्ह माहिती मिळालेली नाही.” तसेच आरोपी अनेकदा तपास दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत असतात, असा इशाराही त्यांनी दिला. (Bangladesh Protests)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक