छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर आयोजित क्रीडामहोत्सवात पारंपरिक व मनोरंजक खेळांचा उत्साह

    22-Dec-2025   
Total Views |
 Sports Day
 
मुंबई : ( Young Students Celebrate Sports Day in Jogeshwari ) जोगेश्वरी, पूर्व येथील अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर या बालमंदिर आयोजित क्रीडामहोत्सवात विविध पारंपरिक व क्रीडा प्रकारांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या क्रीडा महोत्सवामध्ये चमचा-लिंबू शर्यत, गोणपाट शर्यत, बादलीत चेंडू टाकणे यांसह धावणे, अडथळा शर्यत व संगीत खुर्ची अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
 
चमचा–लिंबू शर्यतीत विद्यार्थ्यांनी एकाग्रता व संतुलनाचे कौशल्य दाखवले, तर गोणपाट शर्यतीत चपळता व ताकदीचे प्रदर्शन झाले. धावणे व अडथळा शर्यतीत स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. संगीत खुर्ची या मनोरंजक खेळाने विद्यार्थ्यांसह उपस्थित प्रेक्षकांनाही भरपूर आनंद दिला. बादलीत चेंडू टाकण्याच्या खेळातून विद्यार्थ्यांची अचूकता व लक्ष केंद्रीकरण स्पष्ट झाले.
 
यश संपादन केलेल्या मुलांना सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर मुलांना खाऊ देण्यात आला. सदर क्रीडामहोत्सवासाठी संस्थेचे विश्वस्त पारखी सर, साठ्ये सर, खंडकर सर उपस्थित होते. समुपदेशन विभागाच्या सर्व शिक्षिका मैदानावर उपस्थित होत्या. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रचना पवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
 
हेही वाचा : ज्येष्ठ संगीतकार स्व वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृतिदिनी संगीतामधून आदरांजली अर्पण ...
 
बक्षीस वितरण समारंभासाठी जोगेश्वरी पोलीस स्टेशन निरीक्षक वैशाली या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आणि शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य दाखवण्याचे आवाहन केले. त्यांनी भाषणातून आजच्या चालू घडामोडीतील मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पालकांनी घ्यावयाची काळजी व सतत सतर्क राहण्याचे मार्गदर्शन केले.
 
या क्रीडामहोत्सवामुळे विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक खेळांची ओळख होऊन संघभावना, शिस्त व खेळभावना जोपासली गेली. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. क्रीडामहोत्सव उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक