या चिमण्यांनो, परत फिरा गं, आनहुई प्रांताकडे!

Total Views |

Killing Sparrows
 
‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हिसांजा...’ हे कवी गदिमा, संगीतकार श्रीनिवास खळे आणि गायिका लताबाई यांचे एक चिरस्मरणीय गाणे. यात ‘चिमण्यांनो’ हे संबोधन सगळ्या लहान मुलांना उद्देशून आहे. पण, ‘या चिमण्यांनो, परत फिरा गं, आनहुई आणि गुईझाऊ प्रांताकडे’ अशी साद चिमणी या पक्ष्याला तळमळून घालण्याची वेळ चिनी शेतकर्‍यांवर आली होती. माओ त्से तुंग (आता माओ झेडाँग) आणि त्याचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष यांच्या मूर्खपणामुळे प्रथम लाखो चिमण्या मेल्या. मग, किमान पाच कोटी माणसे मेली. कशी, ते जाणून घेऊया...
 
मुसलमान सुलतानांच्या इतिहासात महंमद तुघलख हा ‘वेडा महंमद’ याच नावाने ओळखला जातो. साधारणपणे ललित साहित्यिक, कवी वगैरे लोक अचाट आणि अफाट कल्पनांसाठी प्रसिद्ध असतात. त्यांचे ठीक असते. त्यांना फक्त लोकांचे मनोरंजन करायचे असते. राज्यकर्त्यांना असे करून चालत नाही. महंमद तुघलख हा इ.स. १३२४ साली दिल्लीचा सुलतान झाला आणि त्याने इ.स. १३५१ पर्यंत म्हणजे २७ वर्षे राज्य केले. तो सर्व सुलतानांप्रमाणेच क्रूर, धर्मद्वेष्टा आणि कत्तलबाज असल्यामुळे हिंदूंचा तर तो कर्दनकाळ होताच. पण, त्याच्या लहरीपणामुळे तो मुसलमानांनाही नकोसा झाला.
 
महंमद तुघलख सुलतान बनला त्या काळात आजच्या सिंध प्रांतापासून थेट दक्षिणेत आजच्या कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ प्रांतांचे बरेच मोठे सुभे त्याने जिंकले होते. त्यामुळे त्याच्या डोक्यातून अशी कल्पना निघाली की, बादशाहीची राजधानी दिल्लीपेक्षा मध्यवर्ती अशा देवगिरी किल्ल्यावर न्यावी, म्हणजे मध्यवर्ती ठिकाणाहून संपूर्ण बादशाहीचे व्यवस्थित संचालन करता येईल. देवगिरीला बाटवून दौलताबाद आधीच खिलजी सुलतानांच्या काळात केलेलेच होते. कल्पना खरोखरच चांगली होती. पण, तिची अंमलबजावणी अत्यंत घिसाडघाईने झाली. परिणामी, हजारो माणसे आणि जनावरे अन्न-पाणी नीट पुरवले न गेल्याने मेली. हे सगळे इ.स. १३२७ साली झाले. आठ वर्षांनी त्याला उमजले की, हे काही खरे नाही. सन १३३५ साली त्याने पुन्हा राजधानी दौलताबादहून दिल्लीला नेली. तितक्याच अकार्यक्षमपणे नेली. परिणामी, पुन्हा हजारो माणसे आणि जनावरे पटकीच्या म्हणजे कॉलर्‍याच्या साथीने मेली.
 
राजधानी दौलताबादला असतानाच म्हणजे इ.स. १३३७ मध्ये महंमदाने आणखी एक अचाट उद्योग (किंवा नसता उद्योग) केला. आजच्या उत्तराखंड राज्यातल्या कुमाऊँ-गढवाल भागातून हिमालयाची रांग ओलांडून प्रथम तिबेटवर आणि मग चीनवर स्वारी करण्याचा त्याचा बेत होता. बेत नक्कीच महत्त्वाकांक्षी होता. पण, हिमालयात वावरण्यासाठी गंगा-यमुनेच्या खोर्‍यातले कपडे, घोडे, पादत्राणे, हत्यारे चालणार नाहीत. त्यासाठी वेगळी तयारी पाहिजे, हे त्याने लक्षातच घेतले नाही. परिणामी, त्याचे ८० हजार ते १ लाख सैन्य बर्फाने गारठून वाटेतच गारद झाले.
 
१९४९ साली माओ त्से तुंग याच्या साम्यवादी पक्षाने सशस्त्र क्रांती करून चीनमध्ये सत्ता हडपली. हे करताना त्याने लोकशाही मार्गाने निवडून आलेले चँग कै शेक याचे सरकार उलथले. आता साम्यवादी सरकार म्हणजे काय विचारता, शोषित-वंचित-कष्टकरी-श्रमिक-शेतकरी-मजूर यांचे सरकार ते. आता बूर्झ्वा, पांढरपेशे, सरंजामदार, जहागिरदार, शोषक, भांडवलदार आणि त्यांचे बगलबच्चे यांचे दिवस भरले. आता सोव्हिएत रशियाप्रमाणेच चीनमध्ये स्वर्ग अवतरणार.
 
पहिली पाच-सात वर्षे विरोधकांच्या कत्तली उडवणे, भारतातल्या नेहरू सरकारला ‘पंचशील करार’ नावाची झकास शेंडी लावून भारत-चीनच्या मधला तिबेट हा स्वायत्त प्रदेश आपल्या घशात घालणे, इत्यादी प्रेममय खेळ खेळून झाल्यावर चिनी राष्ट्राध्यक्ष माओ आणि त्याचा पंतप्रधान चाऊ एन लाय हे चीनच्या अंतर्गत विकासाकडे वळले. (माऊ-चाऊची जोडी.) १९५८ साली त्यांनी ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ असा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला. कृषिप्रधान देश अशी जी चीनची ओळख होती, ती साफ बदलून कारखानदार देश अशी चीनची नवी ओळख निर्माण करायची. म्हणजे शेती बंद करायची असे नव्हे; पण सामुदायिक आणि यांत्रिक शेतीद्वारे त्याला आधुनिक उद्योगाचे स्वरूप आणायचे.
 
हे करण्यासाठी जे अनेक उपप्रकल्प राबविले गेले, त्यातला एक होता- ‘फोर पेस्ट कँपेन.’ ‘पेस्ट’ म्हणजे नुकसानकारक कीटक किंवा प्राणी. माश्या, डास आणि उंदीर हे अतोनात त्रासदायक कीटक वा प्राणी असतात. त्यांचा नायनाट झाला पाहिजे, हे समजू शकते. पण, चौथा प्राणी किंवा पक्षी होता चिमणी. माओ आणि चाऊ यांना कोण कृषिपंडित भेटला कोण जाणे, त्याने त्यांच्या डोक्यात भरवून दिले की, चीनमध्ये चिमण्यांची संख्या पण फार झाली आहे. या चिमण्या शेतात उभ्या पिकांचे फार म्हणजे फारच नुकसान करतात. कणसे कापणी करून मळणी करायला येईपर्यंत कणसातला निम्मा दाणा चिमण्या खाऊन टाकतात.
आपल्या देशातला शेतकरी परंपरेने असे मानतो की, देवाने दिलेल्या धान्यरूपी देणगीमध्ये पशु-पक्ष्यांचासुद्घा वाटा आहे. जसे माणसाला अन्न लागते, तसे त्या पशु-पक्ष्यांना पण लागते. म्हणून पहा, शेतातल्या पिकावर येऊन बसणार्‍या पक्ष्यांना गोफणीतून दगड मारून फक्त हाकलले जाते, ठार मारले जात नाही. गोफणीतून सुटणार्‍या दगडांनी पक्षी घाबरून उडतात आणि परत येऊन बसतात. शेतात लावलेल्या बुजगावण्याला घाबरून पक्षी किंवा प्राणी थोडे कमी येतात. कितीही हाकलले तरी हे पक्षी-प्राणी येणार आणि थोडे धान्य खाणार, हे गृहीतच धरलेले असते. हे पक्षी धान्याच्या दाण्याबरोबरच पिकावर पडणारी कीडसुद्घा खाऊन टाकतात. हे शहाण्या शेतकर्‍याला माहिती असते.
 
पण, चाऊ-माऊंना भेटलेला कृषिपंडित बहुधा, भुईमूग जमिनीसाठी लागतो की, वर लागतो? जित्राप कशाला म्हणतात? असे प्रश्न विचारणार्‍यांच्या वर्गातला असावा. त्याने चाऊ-माऊंना पटवून दिले की, कष्टकर्‍यांच्या राज्यातल्या शेतीचा चिमणी हा पक्षी फार मोठा शत्रू आहे. तेव्हा माश्या, डास आणि उंदीर यांच्याच सोबत चिमण्यांचाही नायनाट करा.
 
झाले, चाऊ-माऊचा फतवा निघाला आणि चिमण्यांवर संक्रांत आली. १९५८ ते १९६० या दोन वर्षांत किमान २० कोटी चिमण्या ठार मारण्यात आल्या. या इरसाल मूर्खपणाचा परिणाम लगेच पुढच्या वर्षी दिसला. टोळधाडी आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव यामुळे आनहुुई आणी गुईझाऊ या प्रांतांमधले पीक संपूर्ण खलास झाले. इतर प्रांतांमधून उत्पादन निम्म्याच्या खाली घसरले. याचा परिणाम म्हणजे, देशभर दुष्काळ पडला आणि किमान पाच कोटी माणसे भूक-भूक करत मेली.
 
निवांतपणे ही खबर माओपर्यंत पोचली. मग त्याने ‘फोर पेस्ट कँपेन’मधल्या चिमण्या काढून तिथे ढेकणांचा समावेश केला. म्हणजेे आता कष्टकर्‍यांच्या राज्यातल्या जनतेने आणि लोकसेवक शासकीय अधिकार्‍यांनी माश्या, डास, उंदीर आणि ढेकूण यांचा नायनाट करावा, असा सुधारित आदेश निघाला. पण, यामुळे मेलेल्या चिमण्यांची जागा कशी भरून निघणार? म्हणजे पुढच्या वर्षी पिकाला पुन्हा टोळ, खोडकिडे किंवा अन्य कीटक त्रास देणारच. मग शोषित-वंचित-श्रमिकांचा तारणहार असलेल्या सोव्हिएत रशियाकडून अडीच लाख चिमण्या आयात करून त्या वेगवेगळ्या प्रांतात सोडण्यात आल्या. पुढे १९६२ साली ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ ऊर्फ ‘हनुमान उडी’ हा कार्यक्रम गुंडाळण्यात आला.
 
शिकागो विद्यापीठातल्या पर्यावरण अर्थतज्ज्ञ एयाल फ्रँक आणि त्यांच्या संशोधक चमूने अमेरिकेच्या ‘नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च’ या संस्थेसाठी चीनच्या चिमणी संहार उपक्रमाचा तपशीलवार अभ्यास नुकताच केला. चीनच्या प्रत्येक प्रांतात किती चिमण्या मारल्या गेल्या, आदल्या वर्षी प्रांतवार उत्पादन किती होते आणि चिमण्या मारल्यावर ते किती घटले; कोणत्या किडींचा प्रादुर्भाव झाला, असे सगळे मुद्दे त्यांनी ६५ वर्षे उलटल्यावर पुन्हा तपासले.
 
आता इथेच प्रश्न निर्माण होतो की, याविषयी पूर्वी बर्‍यापैकी अध्ययन झालेले असताना अमेरिकेला ६५ वर्षांनंतर चीनमधल्या दुष्काळाबद्दल तपशीलवार संशोधन करावेसे का वाटते? त्यावेळी चीनने स्वतःच २० कोटी चिमण्या मारून देशातले संपूर्ण पीक हातचे घालवले होते. आता?
 
चंद्रभागेतीरी ताहेर अंद्राबी
 
ताहेर अंद्राबी हा पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातला एक अधिकारी. तो भारत सरकारवर भलताच खवळला आहे. भारत सरकारने चंद्रभागा नदीचे पाणी अगोदर भरमसाठ सोडून आमचे पीक बुडवण्याची वेळ आणली आणि आता इतके कमी पाणी सोडले जात आहे की, हाताशी आलेली पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात पाक सरकारने भारत सरकारला कडक पत्र पाठवले आहे, असे हा ताहेर अंद्राबी बुवा म्हणाला. शेवटी ‘बी’ अक्षर आले की, ती बाई असते, असा आपणा मराठी माणसांचा समज असल्यामुळे मुद्दाम अंद्राबी बुवा असा उल्लेख केला आहे.
 
असो. तर खुद्द पंढरपुरातही झुरुमुरु वाहणारी आम्हा मराठी भाविकांची आवडती चंद्रभागा नदी एकदम पाकिस्तानात कुठे गेली? इथे तिच्या पाण्यात आम्ही कशीबशी डुबकी मारतो आणि तिकडे तिच्या पाण्याने पूर आला?
 
थांबा, थांबा! ही चंद्रभागा नदी आहे हिमालयातली. आजच्या हिमाचल प्रदेशात हिमालयाच्या रांगेतून ती उगम पावते. बर्फाळ शिखरावरून उगम पावूनसुद्धा तिचे पाणी काळे आहे. म्हणून ऋग्वेदात तिचा उल्लेख ’असिनी’ या नावाने येतो. पुढे हिमाचलातून ती काश्मीर प्रांतात आल्यावर तिला ‘चंद्रभागा’ हे नाव मिळते. इतिहासकाळात तिला चिनाब हे नाव मिळाले. चिनाब, झेलम, रावी, सतलज आणि बियास या पाच नद्यांमुळेच ‘पंचनद’ किंवा ‘पंच-आब’ किंवा ‘पंजाब’ हा प्रदेश निर्माण झाला आहे. चिनाब नदी पुढे सिंधू नदीला मिळते.
 
भारताने चिनाब नदीवर काश्मीर प्रांतात बगलिहार आणि सलाल अशी दोन धरणे बांधली आहेत. भारत-पाक सिंधू नदी पाणी करारान्वये भारताने चिनाब नदीतून साधारण २६ हजार युसेक पाणी सोडत राहावे, जेणेकरून चिनाबच्या पाकिस्तानी तीरांवरील शेतीला पाण्याचा नियमित पुरवठा होत राहील, असा हा करार आहे. आता ७ आणि ८ डिसेंबरच्या रात्री भारताने एकदम ५८ हजार युसेक पाण्याचा उत्सर्ग केला. त्यामुळे चिनाबच्या पाकिस्तानी भागात अवचित पूर येऊन पिके वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. नंतरच्या दिवसात भारताने हा उत्सर्ग कमी करत अवघे ८७० युसेक एवढा आवळून धरला आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेली पिके सुकून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आतापर्यंतची काँग्रेसी सरकारे पाकला निषेधाचे तीव्र, कडक, अतिकडक खलिते पाठवायची. आता पाक भारताला खलिते पाठवतोय. हा आहे बदलता भारत!
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.