मुंबई : ( Dattatreya Hosabale ) चारित्र्यनिर्मितीतूनच राष्ट्रनिर्मिती शक्य आहे. भारताच्या सांस्कृतिक मुळांमध्ये एकता आहे; उपासनेच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, मात्र आपले पूर्वज आणि मूळ एकच आहेत. येथे राष्ट्ररक्षण म्हणजेच धर्मरक्षण आहे, कारण धर्म हा केवळ पूजा-पाठ नसून एक जीवनपद्धती आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
हिंदू समाजाची एकता, सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक चेतना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मंगळवारी उत्तर प्रदेशच्या संतकबीरनगर जिल्ह्यात हिंदू परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक एकता, राष्ट्रहित आणि संघटनात्मक चेतना यांवर सरकार्यवाहंनी आपल्या उद्बोधनातून प्रकाश टाकला.
उपस्थितांना संबोधत दत्तात्रेय होसबाळे म्हणाले की, संघटित समाजच राष्ट्राला परम वैभवाकडे नेऊ शकतो. संघ हा या प्राचीन राष्ट्राला आधुनिक काळात परम वैभवावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. केवळ व्यक्ती चांगली असणे पुरेसे नाही, तर तिच्यात राष्ट्रबोध आणि समाजबोध असणेही आवश्यक आहे. व्यक्तिगत चारित्र्याच्या माध्यमातून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याच्या उद्देशानेच संघ आणि शाखेची संकल्पना करण्यात आली आहे.
या हिंदू परिषदेत साधू-संत, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर नागरिक तसेच समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग होता. समाजातील विविध वर्गांना एका मंचावर आणून आपसी बंधुता, सहकार्य आणि सांस्कृतिक मूल्यांना बळकटी देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक