मुंबई : ( WB Draft Voter List: 58 Lakh Names Removed ) निवडणूक आयोगाने विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर पश्चिम बंगालची मसुदा मतदार यादी जाहीर केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृत्यू, स्थलांतर आणि गणना (एन्युमरेशन) फॉर्म न सादर करणे अशा विविध कारणांमुळे ५८ लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यापैकी २४ लाख नावे 'मृत', १९ लाख 'स्थलांतरित', १२ लाख 'हरवले' आणि १.३ लाख 'दुहेरी' (डुप्लिकेट) अशी नोंदवण्यात आली आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार राज्याच्या मसुदा मतदार यादीत एकूण ७,०८,१६,६३१ मतदारांची नावे राहणार आहेत. एसआयआर पूर्वी ही संख्या ७,६६,३७,५२९ होती, म्हणजेच सुमारे ५८,२०,८९८ मतदारांची घट झाली आहे. दक्षिण कोलकात्यातील भवानीपूर मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातही किमान १२७ नावे वगळण्यात आली आहेत. एकूण ५८,२०,८९८ मतदारांची नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली असून त्यात २४,१६,८५२ मृत घोषित, १९,८८,०७६ कायमचे स्थलांतरित किंवा स्थलांतर केलेले, १,३८,३२८ दुहेरी, फसवे किंवा बनावट नोंदी, तर १२,२०,०३८ नावे 'हरवले' म्हणून नोंदवण्यात आली आहेत. याशिवाय 'इतर कारणां'साठी ५७,६०४ नावे वगळण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मागील एसआयआर दरम्यान २००२ च्या यादीच्या आधारे सुमारे ३० लाख मतदारांची ओळख पटू शकली नव्हती. तसेच, गणना फॉर्ममधील विसंगतींमुळे आणखी सुमारे १ कोटी ६७ लाख मतदारांची तपासणी निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. विसंगती सात गटांमध्ये वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. यात वडिलांचे नाव २००२ च्या यादीशी जुळत नसणे, पालकांशी वयातील फरक १५ वर्षांपेक्षा कमी किंवा ५० वर्षांपेक्षा जास्त असणे, आजी-आजोबांशी वयातील फरक ४० वर्षांपेक्षा कमी असणे, तसेच लिंगभेदाशी संबंधित विसंगती यांचा समावेश आहे.
मसुदा मतदार यादी जाहीर झाल्याने प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता दावे, हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया सुरू होईल. मतदार आणि राजकीय पक्ष १५ जानेवारी २०२६ पर्यंत मसुदा यादीतील नावांची भर किंवा वगळण्याबाबत निवडणूक आयोगाकडे दावे व हरकती सादर करू शकतात. सुनावणी आणि पडताळणीची प्रक्रिया १६ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान होणार असून अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. राज्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक