सांस्कृतिक साम्यवाद - अर्थशास्त्रापलीकडील समाजविचार

Total Views |
European Decolonisation
 
सांस्कृतिक साम्यवाद, वोकिझम यांची वैचारिक पाळेमुळेही युरोपातच आढळतात. त्यामुळे यांसारख्या सामाजिक समस्यांवरील उत्तरांसाठीही युरोपीय दृष्टिकोनावर अवलंबून राहण्यापेक्षा, निर्वसाहतीकरणाचा विचार हा त्या-त्या राष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीतून केल्यास, त्याचे योग्य उत्तर नक्कीच सापडू शकेल.
 
जगभरातील वसाहतींचे वैविध्यपूर्ण अनुभव पाहता, या प्रक्रियेची सुरुवात कोलंबसाच्या स्वारीपासून किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून आफ्रिकेतून होणार्‍या गुलामांच्या व्यापारापर्यंत, अशा साधारण २०० वर्षांच्या कालखंडात कधीतरी झाली. या सर्व काळात झालेल्या वसाहतीकरणामागील युरोपीय राष्ट्रांची भूमिका कायम एकसारखी होती, असे म्हणता येत नाही. कारण, हाच काळ युरोपात आत्यंतिक वैचारिक घुसळणीचा होता. यानंतरच्या २०० वर्षांच्या प्रत्यक्ष वसाहतींच्या कालखंडात युरोपचे स्वतःचे समाजशास्त्रीय आकलन अधिक बदलत गेले आणि त्याचबरोबर वसाहतींमधील विचारवंतांकडून त्याचे प्रतिवादही निर्माण झाले. वसाहती स्थापन केलेल्या राष्ट्रांचे स्वतःचे वैचारिक संचित वसाहतवादाला विभिन्न वैशिष्ट्यपूर्ण उत्तरे शोधण्यात कारणीभूत होते. ही उत्तरे जशी राजकीय स्वरूपाची होती, तशीच वैचारिक स्वरूपाचीही होती. वसाहतींचा इतिहास आणि त्यांच्या राजकीय स्वातंत्र्याचा इतिहास जसा एकमेकांशी संबंधित आहे, तसेच निर्वसाहतीकरणाचे सिद्धांतन मूळ वसाहतवादाच्या सिद्धांतनाहून वेगळे समजून घेता येत नाही. युरोपच्या वैचारिक प्रश्नांना युरोपने शोधलेली उत्तरे आणि त्यांच्या वसाहतींनी शोधलेली उत्तरे यांचा प्रवाह समजून घेणे, निर्वसाहतीकरणाचे आजचे सिद्धांतन समजून घेण्यास आवश्यक आहे.
 
ख्रिस्ती रिलीजनच्या श्रद्धेवर आधारित समाजव्यवस्थेला प्रत्युत्तर म्हणून प्रथम पुनरुज्जीवन आणि नंतर प्रबोधन कालखंडात तर्काधिष्ठित विचारप्रवाह युरोपात निर्माण झाले. या तर्कप्राधान्यातून मानवी इतिहास, समाजव्यवहार आणि मानसिकताही गणिती पद्धतीने समजून घेण्याचे प्रयत्न या कालखंडात युरोपात झाले. मानवी प्रेरणांचे आकलन करून घेण्यास युरोपीय विचारवंतांनी ‘सौख्यवाद’ आणि ‘उपयुक्ततावादा’सारख्या कल्पना मांडल्या; तर त्यांचे समाजव्यवहारांतील उपयोजन विशद करण्यास बाजारपेठेचा विनिमय सिद्धांत आणि विरोध विकासाचा सिद्धांत इत्यादी कल्पना पुढे आल्या. या सर्व कल्पनांमध्ये श्रद्धा आणि तर्क यांच्यातील विसंगती दाखवून ‘रिलीजन’शिवाय समाजबांधणी कशी होऊ शकते, हा विचार प्रबळ होता. २०व्या शतकाच्या उंबरठ्यावर ‘भावनिक आदर्शवाद’ ( Romanticism ) आणि ‘राष्ट्रवाद’ या संकल्पनांनी तर्कप्राधान्याचे सर्वोच्च स्थान जरासे हलवले आणि दोन जागतिक महायुद्धांनी या सर्वंकष चिंतनाच्या विषयी शंका निर्माण करण्यास सुरुवात केली. फ्रँकफर्ट स्कूलचा चिकित्सा सिद्धांत या नवीन विचारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
 
साम्यवादाला अपेक्षित क्रांती जेव्हा औद्योगिक युरोपात न होता, कृषिप्रधान रशियात झाली आणि दोन महायुद्धांमधून दिसलेला ‘अर्थायामा’व्यतिरिक्त असलेल्या मानवी प्रेरणांचा समाजावरील प्रभाव जेव्हा साम्यवादाच्या अर्थशास्त्रीय आकलनात बसवता येईनासा झाला, तेव्हा साम्यवादी विचारवंत सांस्कृतिक उच्चवर्चस्ववादाच्या दिशेने विचार करू लागले. चिकित्सा सिद्धांताने मानवी समाज ठरावीक मूल्यांच्या चौकटीतूनच विचार का करतो, असा प्रश्न विचारण्यास आणि हेगेलच्या विरोध विकासाच्या मूळ सिद्धांताच्या आधारे त्याचे उत्तर शोधण्यास सुरुवात केली. मॅस होर्कहेमर आणि थिओडोर अडोर्नो हे या गटाचे मुख्य प्रवर्तक मानले जातात. १९२३ साली फ्रँकफर्ट येथे स्थापन झालेला हा विचारवंतांचा गट दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत स्थलांतरित झाला आणि तेथूनच त्यांची अनेक महत्त्वाची संशोधने प्रसिद्ध झाली.
 
चिकित्सा सिद्धांताच्या मते, समाजातील मूठभर उच्चवर्णीय सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये कोणती असावीत, याविषयीचा एक विमर्श निर्माण करतात. हा विमर्श त्यांचे राहणीमान आणि परंपरा यावर आधारलेला असतो आणि त्याच्या पालनातून त्यांचे आर्थिक व राजकीय हितसंबंधही जोपासले जात असतात. याच गटाच्या हातात माध्यमे असतात आणि त्यातून या उच्चभ्रू संस्कृतीचे प्रसारण सतत होत असते. अन्य समाजात आणि या समाजात जे सांस्कृतिक भेद असतात, त्यांना सांस्कृतिक न्यूनत्वाचे स्थान देऊन सतत मुख्य प्रवाहातून कडेला सारले जाते. हळूहळू सर्व समाज या एकाच प्रकारच्या सांस्कृतिक परंपरांशी एकरूप होत आपल्या मूळ परंपरांना विसरून जातो. परंतु, उच्चभ्रू संस्कृतीत तो परका असल्याने तिथे त्याची भूमिका कडेला बसलेल्या शिकाऊ उमेदवाराची असते. या प्रक्रियेतून समाजाची सांस्कृतिक विविधता नष्ट होत संस्कृतीचा एक प्रवाह ‘मुख्य प्रवाह’ म्हणून मान्यता पावतो. वैविध्यपूर्ण सांस्कृतिक प्रवाहांचे दमन होऊ नये, म्हणून समाजात प्रस्थापित झालेल्या सांस्कृतिक मूल्यांची चिकित्सा करून ती बहुजन संस्कृतीशी सुसंगत आहेत का, अशी चर्चा घडवणे आवश्यक आहे; असे चिकित्सा सिद्धांत मानतो.
 
चिकित्सा सिद्धांताचे अनेक पैलू नंतरच्या काळात मांडले गेले, ज्यांनी विविध क्षेत्रांत उच्चभ्रू मानल्या गेलेल्या सांस्कृतिक मूल्यांची चिकित्सा आरंभली. यात लिंग, वंश, भाषा व बोली, आर्थिक व सामाजिक स्तर यांवर आधारित भेदांचे आकलन चिकित्सा स्वरूपात केले गेले. भारतात याचे उपयोजन जातव्यवस्थेच्या संदर्भातही केले गेले आहे. याच चिकित्सा सिद्धांताचा आणि सांस्कृतिक साम्यवादाचा एक पैलू म्हणून ‘सांस्कृतिक शोषितांचे चिंतन’ ( Subaltern studies ) अभ्यासले आणि प्रयत्नपूर्वक मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणले जाऊ लागले.
 
चिकित्सा सिद्धांताने जरी सांस्कृतिक प्रवाहांना चिकित्सकपणे पाहात उपेक्षित प्रवाहांनाही महत्त्व देण्याची चर्चा सुरू केली, तरी त्यातील तर्कप्राधान्याचे प्रबोधनकालीन तत्त्व कायम होते. विशेषतः नंतरच्या काळातील हेबरमास प्रभृती विचारवंतांनी तर्कप्राधान्य केवळ उच्चवर्चस्वास जन्म देते हे नाकारून, त्यातून मुक्तीचा मार्गही तर्काच्या आधारे शोधता येईल; असे प्रतिपादन केले. परंतु, चिकित्सा सिद्धांताला उत्तर म्हणून जन्मलेल्या आधुनिकोत्तरवादाने तर्कप्राधान्य नाकारत उच्च संस्कृती आणि बहुजन संस्कृती यांचा कोणताही संगम शक्य असल्याचे नाकारले. किंबहुना, तर्काच्या आधारे असा संगम घडवून कोणतीही सर्वसमावेशक मूल्ये निश्चित करणे अनावश्यक असल्याचे प्रतिपादन करीत मूल्यांच्या सापेक्षतेचा सिद्धांत आधुनिकोत्तर चिंतनाने मांडला. या मताप्रमाणे प्राचीन युरोपची सामाजिक सत्ये श्रद्धाप्रधान होती, तर आधुनिक युरोपची तर्कप्रधान होती. परंतु, आता जगाने आधुनिकोत्तर काळात प्रवेश केलेला असून, या काळातील सामाजिक सत्ये संदर्भप्रधान आहेत.
 
कोणतेही सामाजिक सत्य अथवा सांस्कृतिक मूल्य हे केवळ तर्काच्या आधारे योग्यायोग्य ठरवता येत नाही, तर त्यासाठी स्थळकाळाचे संदर्भ लक्षात घेणे आवश्यक असते. स्वाभाविकपणे कोणतेही मूल्य हे सार्वकालिक किंवा सार्वजनिक सत्य ठरत नाही. आधुनिकोत्तरवादानुसार, कोणतीही मूल्ये आपल्याला सामाजिक मूल्ये वाटतात. कारण, आपली भाषा, साहित्य, सामाजिक चालीरीती त्या मूल्यांचे वहन आणि प्रतिपादन करत असतात. त्यामुळे समाजमनावर ती ठसली जाऊन योग्य वाटू लागतात. पण, त्यांच्यात कोणतेही आंतरिक सत्यासत्यतेचे मूल्य नसते, ज्याच्या आधारे त्या मूल्यांना संस्कृतीनिरपेक्षपणे योग्य सिद्ध करता येईल. मिशेल फुको, जाक देरिडा, ज्यॉँ फ्रान्स्वा ल्योता इत्यादी विचारवंत आधुनिकोत्तर विचारांचे प्रमुख प्रणेते मानले जातात. या विचारवंतांनी कोणत्याही क्षेत्रात वैश्विक सत्यांचे आणि संपूर्ण मानवजातीला लागू पडतील अशा प्रणालींचे अस्तित्व नाकारून केवळ स्थानिक संदर्भातील सत्यांचे अस्तित्व मान्य केले. भाषाही केवळ अशा मूल्यांची वाहक असल्याने भाषेचे मूल्यसंवहनात्मक स्वतंत्र अस्तित्व नाकारत, त्यातून कोणत्याही शाश्वत मूल्यांची निर्मिती होत असल्याचे नाकारले.
 
आधुनिकोत्तरवादाचे पुढचे टोक आज आपण सत्योत्तरवादात गाठलेले पाहतो. कोणतेही सामाजिक सत्य हे केवळ त्याच्या सांस्कृतिकसंदर्भात खरे असते, या तत्त्वाचा विस्तार कोणत्याही विधानाला कधीही सत्य म्हणता येत नाही, असा विचार सत्योत्तरवाद मांडतो. सापेक्षता आणि सत्यता ही मूल्ये परस्परविरोधी असल्याने केवळ सापेक्षता अस्तित्वात असून, कोणत्याही प्रकारचे सत्य कधी अस्तित्वातच नसते, अशी मांडणी सत्योत्तरवादात आहे. सामाजिक मूल्यांची सापेक्ष सत्यताही नाकारल्याने मूल्यविहीन निरंकुश समाजाची कल्पना या चिंतनात मांडली जाते. कोणत्याही प्रकारचा अधिकार नाकारून सर्व मतांना समान पातळीवर आणले जाते. कोणत्याही सामायिक सत्यास नाकारले जाते. व्यक्ती-व्यक्तींमध्ये जितके भेद कल्पिता येतात, त्या सर्व भेदांना समान दर्जाचे मानून प्रत्येकाचे स्वतःचे सापेक्ष सत्य सापेक्ष परिघात मान्य केले जाते. सर्वत्र चर्चेत असणारी ‘वोक जीवनप्रणाली’ याच सत्योत्तरवादाचा परिपाक आहे.
 
भारतीय दृष्टीने विचार करता हे प्राचीन, आधुनिक आणि आधुनिकोत्तर भेद धर्मसंकल्पनेच्या सुयोग्य आकलनाअभावी निर्माण होतात, असे म्हणता येते. ‘एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति’ हे ऋग्वेदातील विधान हे सर्व विचार केवळ अंशतः समजून घेतात. प्राचीन काळात रिलीजन किंवा श्रद्धा आणि आधुनिक काळात तर्क किंवा विज्ञान हे एकमेव सत्य मानून, त्याचा ध्यास घेऊन जाणारा युरोपीय समाज आधुनिकोत्तर काळात विविध मार्गांची केवळ सापेक्ष सत्यता समजू पाहतो आहे. अंतिम सत्याचे एकत्व आणि विविध मार्गांचे सत्यत्व हे एकाच वेळी अस्तित्वात असते, हे एकात्म आकलन या सर्व प्रणालींमधून निसटलेले आहे. त्याहीपलीकडे जाऊन भारतीय संस्कृती वैश्विक सत्य, म्हणजेच ‘ऋत’ संकल्पना मांडते. सामाजिक पातळीवर सापेक्ष आकलनांचा समन्वय साधणे धर्माद्वारे शक्य होईल. पण, त्यास आधारभूत असा संकल्पनात्मक पातळीवरील समन्वय ‘ऋत’ संकल्पनेच्या आधारे घडवता येऊ शकतो.
 
सांस्कृतिक साम्यवाद, चिकित्सा सिद्धांत आणि आधुनिकोत्तर सिद्धांत हे युरोपच्या प्रबोधन चळवळीस प्रत्युत्तर म्हणून जन्माला आलेले आहेत. स्वाभाविकपणे त्यांचे वैचारिक मूळ हे युरोपियनच आहे, असे म्हणता येईल. निर्वसाहतीकरण म्हणजे जर प्रबोधनकालीन युरोपच्या वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून मुक्ती असेल, तर ते युरोपचीच उत्तरे वापरून करता येणार नाही. निर्वसाहतीकरणाचे सिद्धांतन अभ्यासताना त्यावरील असे सर्व प्रभाव सूक्ष्मपणे तपासून ते आपल्या राष्ट्रीयसंदर्भात योग्य आहेत का, याची पडताळणी आवश्यक आहे. सत्योत्तर विचार आणि ‘वोकिझम’चे भीषण दुष्परिणाम सर्वत्र स्पष्टच आहेत. तरीही, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या विचारवंतांवर या सर्व सिद्धांतांचा प्रभाव जाणवतो. भारताची यासंदर्भात वेगळी भूमिका निर्माण करणे आणि स्वतःच्या निर्वसाहतीकरणाचे मार्ग शोधून काढणे, या सर्व वैचारिक गोंधळातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक आहे.
 
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून ‘खगोलशास्त्रा’त ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
 
 

डॉ. हर्षल भडकमकर

मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.