Bondi Beach Shooting : सिडनीच्या बाँडी बीच गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन आलं समोर! कोण आहेत हल्लेखोर साजिद व नवीद अकरम?

    15-Dec-2025   
Total Views |

Bondi Beach Shooting

मुंबई : (Bondi Beach Shooting)
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यातील सिडनी येथील बाँडी बीचवर दोन हल्लेखोरांनी हजारोंच्या जमावावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात १० वर्षांच्या मुलीसह १६ जणांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्या ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी दिली. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी या हल्लेखोरांची ओळख जाहीर केली असून ५० वर्षीय साजिद अकरम आणि त्याचा २४ वर्षीय मुलगा नवीद अकरम या बापलेकाने मिळून हा हल्ला केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे दोघेही मूळचे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे बोलले जात आहे.
नेमकं काय घडलं?

रविवारी संध्याकाळी बाँडी बीचजवळच्या पार्कमध्ये ज्यू समुदायासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'हनुका'चा पहिला दिवस साजरा करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने ज्यू नागरिक एकत्र आले होते. संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास नवीद अक्रम व साजिद अक्रम हे दोन हल्लोखोर बीच परिसरात दाखल झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व इतर प्रत्यक्षदर्शीनी काढलेले व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. त्यानुसार हे दोघे पिता-पुत्र बाँडी बीचवर दाखल झाले व एका छोट्या पुलावर चढून दोघांनी समोर जमलेल्या ज्यू समुदायावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी हल्ल्यासाठी तब्बल ६ बंदुका बरोबर आणल्या होत्या. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १० मिनिटे हा गोळीबार सुरू होता.

न्यू साऊथ वेल्स पोलीस आयुक्त मैल लैन्योन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ५० वर्षीय साजिद अकरम आणि त्याचा २४ वर्षीय मुलगा नवीद अक्रम या बापलेकांनी मिळून हा हल्ला केला. यापैकी साजिद हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला असून नवीदला पोलिसांनी जखमी अवस्थेत ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्याकडून या हल्ल्यामागच्या कारणाबाबत अधिक माहिती कळू शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

नवीदजवळ ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील ड्रायव्हिंग लायसेंसही होते. हा हल्ला करणारे साजिद आणि नवीद अकरम यांनी घरातून बाहेर निघताना दक्षिणी सागरी किनाऱ्यावर मासे पकडायला जात आहे, असे सांगितले, त्यानंतर या दोघांनी बीचवर जमलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, साजिद अकरमकडे सहा बंदुकांचा वैध परवाना होता आणि हल्ल्यासाठी त्याने याच शस्त्रांचा वापर केला. याशिवाय, घटनास्थळावरून काही 'आयईडी' स्फोटक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. मात्र ती अगदी प्राथमिक स्तरावरील असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्या कारमध्ये आयसिसचा झेंडाही सापडल्याचे समोर आले आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी कनेक्शन आहे का, याचा तपास सुरु

ऑस्ट्रेलियाई तपास यंत्रणांच्या मते, २०१९ मध्येच, नवीद अकरमचे 'आयसिस' सोबत संबंध असल्याचे उघड झाले होते, त्याची चौकशीही करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, नवीद अकरम ऑस्ट्रेलियातच जन्मलेला आहे, तर वडील साजिद अकरम टूरिस्ट व्हिसावर पाकिस्तानमधून आला होता. आता, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि उच्च सुरक्षा यंत्रणांनी ही घटना म्हणजे, देशाच्या सुरक्षेला गंभीर इशारा असल्याचे म्हणत, आंतरराष्ट्रीय दहशतवादी कनेक्शन आहे का, यादृष्टीने तपास केला जात आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\