मेस्सीचं वानखेडे स्टेडियमवर जंगी स्वागत; प्रोजेक्ट महादेवाचा भव्य शुभारंभ

    14-Dec-2025   
Total Views |
Project Mahadeva
 
मुंबई : ( Project Mahadeva ) महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडणाऱ्या ‘प्रोजेक्ट महादेवा’ या महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा आज (दि.१४) भव्य शुभारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेला हा उपक्रम मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे जागतिक फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे लाँच करण्यात आला. मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी स्टेडियम परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.
 
या विशेष कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके, तसेच टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनो मोरया यांसह क्रीडा व चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत उपस्थित होते.
 
‘प्रोजेक्ट महादेव’ अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून निवड चाचण्यांच्या माध्यमातून १३ वर्षांखालील ६० गुणवंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसोबत ४५ मिनिटांचे विशेष फुटबॉल प्रशिक्षण व मार्गदर्शन सत्र अनुभवण्याची संधी मिळणार आहे, ही या उपक्रमाची खास बाब ठरणार आहे.
 
हा उपक्रम MITRA, VSTF, WIFA, CIDCO तसेच महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात येत असून, धोरणात्मक नियोजन, तळागाळातील प्रतिभा शोध, व्यावसायिक फुटबॉल कौशल्य, आधुनिक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ यांचा समन्वय साधण्याचा उद्देश आहे.
 
हेही वाचा : १ जुलैपर्यंत कर्जमाफीबाबत घोषणा करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
‘प्रोजेक्ट महादेवा’चा उद्देश काय?
 
‘प्रोजेक्ट महादेवा’चे ध्येय म्हणजे मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्राला अधिक सुवर्णपदके मिळवून देणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरणे व विजेतेपदासाठी सक्षम संघ उभारणे. १३ ते १८ वयोगटातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण व जागतिक संधी देत, महाराष्ट्रात एक शाश्वत आणि सर्वसमावेशक फुटबॉल विकास प्रणाली उभी करण्याचा निर्धार या उपक्रमामागे आहे.
 

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.