युरोपमधील समृद्धी, श्रीमंती, निसर्गसौंदर्य याची भूरळ जगात अनेकांना पडते. भारतीय सुद्धा यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे अनेक जण विविध मार्गाने युरोप अनुभवण्याचा प्रयत्न करतात. काहीजण प्रत्यक्ष प्रवास करुन, तर काहीजण प्रवासवर्णनांच्या माध्यमातून! याच युरोपातील पाच देशांच्या राजधान्या आणि एकूणच युरोपमधील अस्वस्थता यावर भाष्य करणारे पुस्तक दै ‘मुंबई तरुण भारत’च्या विदेशनीती स्तंभाचे लेखक अनय जोगळेकर यांनी लिहिले आहे. ‘पाच देश, पाच राजधान्या... अस्वस्थ युरोपचा मागोवा’ हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत असून, आज रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी फर्ग्युसन कॉलेज येथे, पुणे पुस्तक महोत्सवात सकाळी ११ वाजता ’लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमांतर्गत ते उपलब्ध होईल. त्यानिमित्ताने पुस्तकाविषयीचे लेखकाचे मनोगत...
महाराष्ट्र हे पर्यटन प्रिय राज्य आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्राकडे आपण म्हणावे तसे लक्ष दिले नसले, तरी आपल्याला जगभर फिरायला आवडते. गुजराती, बंगाली आणि दक्षिणेकडील राज्यांतील लोक वगळता, हौसेखातर पर्यटन करणारे लोक देशात सर्वत्रच आढळत नाहीत. महाराष्ट्राचे युरोपबद्दल आकर्षण थोडे अधिक असून, ते यश चोप्रांच्या युरोपमध्ये चित्रित केलेल्या चित्रपटांच्या पूर्वीपासून आहे. आपण इतिहास, संस्कृती आणि साहित्यात रमणारी माणसं असल्यामुळे असं असावं. पु. ल. देशपांडेंपासून मीना प्रभूंपर्यंत अनेकांचे युरोपमधील प्रवास महाराष्ट्रातील अनेकांनी केवळ वाचलेच नाहीत, तर अनुभवले आहेत. गेल्या चार दशकांमध्ये वाढलेली आर्थिक सुबत्ता, युरोपात कामानिमित्त स्थायिक झालेली माणसं, दूरसंचार यंत्रणा आणि सर्वत्र उपलब्ध असणारी यात्रा कंपन्यांची कार्यालयं यामुळे, महाराष्ट्रातील असंख्य लोकांनी युरोपला भेट दिली आहे.
या यात्रा कंपन्यांच्या ग्रुप टूरच्या माध्यमातून प्रवास करणार्यांचा सहसा असा अनुभव असतो की, या एक किंवा दोन आठवड्यांच्या प्रवासात तुमचे एका बसशी लग्न लावून दिले जाते. दिवसभर तुम्ही बसमधून फिरता आणि रात्री विश्रांतीला एका नव्या देशात आणि नव्या हॉटेलात जाता. भारतीय रेस्टॉरंटमधील जेवणाच्या वेळा सांभाळून काय आणि किती वेळ पाहायचे, याचे नियोजन केले जाते.
‘कोविड १९’च्या काळात जेव्हा पर्यटन क्षेत्र ठप्प झालं, तेव्हा अनेकांनी युट्यूबच्या माध्यमातून जगभराची भ्रमंती सुरू केली. गेल्या पाच वर्षांमध्ये अर्जेंटिनापासून ते सैबेरियापर्यंत प्रवास करणारे आणि हिंदीमध्ये त्याबाबत माहिती सांगणारे अनेक व्लॉगर तयार झाले. त्यातील अनेकजण एवढे प्रभावशाली झाले की, त्यांचे प्रवास बघून लोक आपल्या प्रवासाचे नियोजन करू लागले.
मीसुद्धा असे केले आहे. म्हणजे काहीतरी वेगळे करायच्या नादात आपण एखाद्या व्लॉगरची प्रवासाची रोजनिशी, म्हणजे कुठे नाश्ता करायचा, कोणते पदार्थ चाखून बघायचे, कोणत्या हॉटेलात राहायचे आणि काय पाहायचे, याचे तंतोतंत अनुकरण करतो. पण लोक असं करू लागल्यामुळे विविध हॉटेल, रेस्टॉरंट एवढेच काय, विविध देशांची पर्यटन मंत्रालयं त्यांना आमंत्रित करू लागली. ज्योती मल्होत्रा प्रकरणातून समोर आले की, असे व्लॉगर ‘आयएसआय’सारख्या गुप्तहेर संघटनेच्याही रडारवर आले. त्यामुळे दोन आठवड्यांत युरोपातील पाच देशांच्या राजधान्यांना दिलेल्या भेटीबाबत पुस्तक लिहिल्यास, ते वाचण्यात कोणाला रस असेल का? असा प्रश्न मला पडला होता. मी गेली १५ वर्षे वर्तमानपत्रांतील लेख आणि युट्यूबवरील व्हिडिओंद्वारे आंतरराष्ट्रीय विषयांवर विश्लेषण करत आहे. त्यामुळे सुटीसाठीही मी अशा जागा शोधतो की, ज्यांना इतिहास आहे आणि तेथील आर्थिक आणि राजकीय पटावर काही घडामोडी होत आहेत. त्यामुळे बातम्यांतून आपण बनवलेले मतं वास्तवाच्या किती जवळ आहे, याचा अंदाज येतो. युरोपची माझी ही काही पहिली भेट नसली, तरी काही वर्षांमध्ये युरोप वेगाने बदलत असल्याचे जाणवत होते.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील पावणे चार वर्षे चाललेले युद्ध, या युद्धामध्ये सैन्यानिशी न लढता, रशियावर निर्बंध लादून त्याला एकटे पाडण्याच्या प्रयत्नात फसलेला युरोपीय महासंघ, त्यामुळे वीज, ऊर्जा आणि जीवनावश्यक वस्तूंमध्ये झालेली भाववाढ, ‘कोविड १९’च्या काळात काढलेल्या भरमसाठ कर्जाचा बोजा, याच काळात पश्चिम अशिया आणि आफ्रिकेतून लाखो स्थलांतरितांचे लोंढे आणि त्यांच्याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून बघण्याच्या धोरणामुळे युरोप ढवळून निघाला आहे. अनेक देशांमध्ये मध्यममार्गी डाव्या आणि उजव्या राजकीय पक्षांचा शक्तिपात झाला असून, वर्ष-दोन वर्षांपूर्वीपर्यंत संसदेत बोटांवर मोजण्याइतके सदस्य निवडून आणणारे जहाल उजवे पक्ष सत्तेवर येत आहेत. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेच्या आणि उत्पादन क्षेत्रात चीनच्या मागे राहिल्यामुळे, युरोपच्या भवितव्यापुढे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती पुस्तिकेमध्ये, युरोपचे युरोपपण टिकवण्याचे आव्हान असल्याचे मान्य केले आहे.
दि. २८ मे ते १० जून २०२५ या कालावधीत मी पोलंडची राजधानी वॉर्सा, जर्मनीची राजधानी बर्लिन, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन तसेच उत्तर डेन्मार्कचा जटलॅण्ड भाग, लॅटवियाची राजधानी रिगा आणि लिथुएनियाची राजधानी विलनियस येथे प्रवास केला. २५ वर्षांपूर्वी एक विद्यार्थी-कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, या भागातील शेकडो विद्यार्थी आणि सामान्य लोकांशी इंटरनेटच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यातील काहींना प्रत्यक्ष आयुष्यात पहिल्यांदा भेटायचेही होते. मी भेट दिलेले सर्व देश दुसर्या महायुद्धामध्ये नाझी जर्मनीच्या तावडीत होते आणि या युद्धाला ८० वर्षे पूर्ण होत असताना, हे देश सध्या रशियाविरुद्धच्या संभाव्य युद्धाच्या सावटाखाली आहेत. युरोपमधील यापूर्वीच्या प्रवासाबाबत लिहावे, असे वाटले नव्हते. या प्रवासानंतर तशी इच्छा झाली याचे कारण म्हणजे, या प्रवासात मला अचानक युरोपमधील अस्वस्थता का आहे? याचा बोध झाला.
अमेरिका आणि अगदी मुंबईतही मला त्या अस्वस्थतेची स्पंदनं जाणवली. पर्यटन आणि पर्यावरणवादाच्या अतिरेकामुळे, युरोपातील अनेक मोठ्या शहरांमधून उत्पादन क्षेत्राने गाशा गुंडाळला आहे. सेवाक्षेत्र नेहमीच स्थलांतरितांना जास्त संधी उपलब्ध करून देते. पण त्यातून अनेक ठिकाणी लोकांमध्ये आपल्या देशाची राजधानी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, पण मुंबई महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते का? हा प्रश्न आपण नेहमीच उपस्थित करतो.
हे पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा यात्रा कंपन्यांसोबत न जाणार्या, वेगळी ठिकाणं आणि वाटा शोधणार्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काहीतरी लिहावं, असं मनात होतं. पुस्तक लिहित असतानाही भेट दिलेली ठिकाणं, त्यांचे ऐतिहासिक महत्त्वं किंवा घडणार्या घटना आणि त्यांचे परस्परांशी असलेले नाते उलगडण्यासाठी, ‘एआय’चा वापर केला आहे. हे पुस्तक लिहित असताना ‘एआय’ जसे तुम्हाला परावलंबी करू शकते, तसेच तुमच्यासाठी नवीन दालनंही उघडू शकते, यावरील माझा विश्वास दृढ झाला. मी स्वतः एक युट्यूबर आहे आणि युरोपमध्ये प्रवास करत असताना तेथूनही रोज व्हिडिओ प्रसिद्ध करत होतो; तसेच फोटोही काढत होतो. त्यामुळे असा विचार केला की, पुस्तक वाचतानाच लोकांना प्रत्यक्ष त्या जागा बघण्याची आणि त्याबाबत ऐकण्याचीही सोय करून देता येईल का? त्यासाठी या पुस्तकात प्रत्येक देशातील प्रवासवर्णनाच्या सुरुवातीलाच एक यूआर कोड दिला असून, तो स्कॅन केल्यास फोटो आणि व्हिडिओ पाहता येतील.
माझे पहिले पुस्तक ‘भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे’ २०१९ साली प्रसिद्ध झाले. मी २००८ सालापासून विविध वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करत असून, दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये २०१७ सालापासून ‘विदेशनीती’ हा साप्ताहिक स्तंभ लिहित आहे. ते पुस्तक माझ्या वृत्तपत्रीय लेखनावर, पुस्तकाचा संस्कार करून आकारास आले. द्विपक्षीय संबंध संथगतीने प्रवास करत असल्यामुळे, अनेकदा आंतरराष्ट्रीय संबंधांवरील लिखाण आस्वाद घेण्याच्या दृष्टीने रुक्ष वाटते. हे विषय त्यांचे गांभीर्य कमी होऊ न देता, सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत किंवा शैलीमध्ये मांडणे आवश्यक आहे. आम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय ठिकाणांसोबतच त्या शहरांचा इतिहास, समाजजीवन आणि तेथील राजकारणाची गुंतागुंत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. तो आपल्याला आवडेल, अशी अपेक्षा आहे.
‘बुकगंगा’च्या मंदार जोगळेकरांनी माझी कल्पना उचलून धरली आणि ते लिहून पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी प्रोत्साहित केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे पुस्तक ‘बुकगंगा’ची वेबसाईट
www.bookganga.com , ‘बुकगंगा’च्या पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील केंद्रात, पुणे आणि मुंबईतील प्रमुख विक्रेत्यांकडे तसेच ‘अमेझॉन’वरही उपलब्ध आहे.