आपल्या हिंदू समाजाला बलिदानाचे मोठे आकर्षण आहे. किंबहुना, एक प्रकारची आसक्तीच आहे. देशासाठी बेदरकारपणे आयुष्य झुगारून देणारे अगणित ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक हे आपल्या देशाचे वैभव आहे. पण, या प्रत्यक्ष बलिदानांइतकीच मोलाची आहेत अप्रत्यक्ष बलिदाने. बलिदान करणे म्हणजे प्राणच द्यायला हवेत, असे नाही. एका संघ गीताच्या ओळी आहेत - "शलभ (म्हणजे पतंग) बन जलना सरल हैं, स्नेह की जलती चिता पर, स्वयम् को तिल-तिल जलाकर दीप बनना ही कठिन हैं; साधना का पथ कठिन हैं”
चित्रपटाची सुरुवातच होते, रेडिओवरच्या एका उद्घोषणेने- ’हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे. आम्ही आज आपल्याला अशी गाणी ऐकवणार आहोत, ज्यांनी दहा वर्षांपूर्वी लोकप्रियतेचा कळस गाठला होता. आता ऐका गाणे ‘साँवरे, साँवरे.’ गायिका अनुराधा राय. पंडित रविशंकरांची सतार झणाणते आणि लताबाईंच्या दैवी सुरात कवी शैलेंद्रांचे एक अनुपम गाणे सुरू होते- ’साँवरे, साँवरे, काहे मोसे करो जोराजोरी, बैंया ना मरोडो मोरी, दूँगी दूँगी गाली हटो जाओ जी, साँवरे.’ ‘भैरवी’ रागावर आधारित अशी ही एक अप्रतिम बंदिश आहे. कितीही वेळा ऐकली, तरी कान तृप्तच होत नाहीत.
गाणे चालू असतानाच पडद्यावर चित्रपटाची श्रेयनामावली उलगडत जाते. दहा वर्षांपूर्वी हे गाणे गाऊन धूम मचावणारी गायिका अनुराधा राय (अभिनेत्री लीला नायडू) आता अनुराधा चौधरी बनलेली असते. तिचा नवरा असतो डॉ. निर्मल चौधरी (अभिनेता बलराज सहानी). तिच्या बापाने तिच्यासाठी दीपक (अभिनेता अभि भट्टाचार्य) हा नवरा ठरवलेला असतो. पण, डॉ. निर्मलच्या अफाट बुद्धिमत्तेला आणि ध्येयनिष्ठेला भाळून गायिका, कवयित्री आणि नृत्यांगना असलेली अनुराधा त्याच्याशीच हट्टाने लग्न करते. डॉ.निर्मल शहरात न राहता खेडेगावात येऊन ग्रामीण जनतेची वैद्यकीय सेवा करत असतो. मात्र, शहरांतून आणि परदेशातून नवनवीन संशोधनपत्रिका मागवून, त्यांचे सतत अध्ययन करून त्याने आपले वैद्यकीय ज्ञान अगदी अद्ययावत ठेवलेले असते. निर्मल आणि अनुराधा यांना एक छोटी मुलगी असते. निर्मलची समाजसेवा, संशोधन आणि मुलीचे संगोपन यात अनुराधाचे संगीत, काव्य, नृत्य पाठी राहते.
तिचा एकेकाळचा नियोजित पती दीपक आणि त्यांची प्रेयसी राणू यांच्या गाडीला निर्मल-अनुराधा यांच्या गावालगत अपघात होतो. निर्मल दोघांवर नुसते उपचारच करतो असे नव्हे, तर राणूच्या जखमी चेहर्यावर चक्क प्लास्टिक सर्जरी करतो. निर्मलचे ते अद्भुत शल्यकौशल्य पाहून दीपक थक्कच होतो. यानिमित्ताने दीपक काही दिवस निर्मल-अनुराधाच्या त्या खेड्यातल्या घरात मुक्काम करतो.
आणि मग त्याला दुसरी बाजू दिसते. निर्मल रुग्णसेवेत आणि नव्या संशोधनात इतका मग्न आहे की, त्याला अनुराधाकडे लक्ष द्यायला वेळच नाही. तिच्या सगळ्या कला तर बाजूला पडल्याच आहेत. पण, ज्याच्यासाठी तिने एवढे बलिदान दिले, त्याचा एक प्रेमाचा शब्दही तिला महाग झालाय. आता या ‘सिच्युएशन’ला गाणे हवेच. शैलेंद्र, रवीशंकर आणि लताबाई पुन्हा एकदा एका अप्रतिम बंदिशीद्वारे अनुराधाचे दु:ख अतिशय संयतपण व्यक्त करतात- ‘कैसे दिन बीते, कैसी बीती रतियाँ, पिया जाने ना. रुत मतवाली आ के चली जाएँ, मन ही में मेरे मन की रह जाएँ, खिलने को तरसे नन्हीं नन्हीं कलियाँ, पिया जाने ना.’
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी या गाण्याचे चित्रिकरणही फार हृद्य असे केले आहे. अनुराधा आपल्या मनातले दु:ख गाण्यातून व्यक्त करते आहे. निर्मल नव्या वैद्यकीय संशोधन पत्रिका चाळतो आहे. त्याचे गाण्याकडे, त्यातून उमलून येणार्या भावांकडे जराही लक्ष नाही. मधेच तो उठून सरळ निघून जातो. अनुराधा आणखीनच कष्टी होते आणि आपली एकेकाळची नियोजित वधू, प्रतिभावंत कलावती अशी अनुराधा आणि तिचा ध्येयनिष्ठ, बुद्धिमान पती निर्मल यांच्या संसाराचे हे चित्र पाहून खंतावणारा, हळहळणारा दीपक, असे हे ‘साँग काँपोझिशन’ फार बहारदार झाले आहे. लीला नायडू, बलराज सहानी आणि अभि भट्टाचार्य या तिघांनीही उत्कृष्ट ‘क्लोज अप्स’ दिले आहेत.
पुढे घडते असे की, दीपक अनुराधाला पुन्हा शहरात येऊन कलावंत म्हणून तिची कारकीर्द पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करतो. निर्मलला जेव्हा हे सगळे कळते, तेव्हा तो आपल्या ध्येयनिष्ठेच्या तंद्रीतून खडबडून जागा होतो. आपण अनुराधावर अन्याय केलाय, हे तो मान्य करतो. मात्र, तो तिला स्पष्टपणे सांगतो की, माझा मार्ग आता बदलणार नाही. पण, तू अवश्य शहरात जाऊन तुझी कारकीर्द उभी कर. तुझ्यासाठी मी एकटा राहीन.
आता अनुराधासमोर प्रश्न असतो- नवरा, त्याचे संशोधन, समाजसेवा, संसार? की, आपली कविता, संगीत, नृत्य? अनुराधा पहिला पर्याय स्वीकारते. रात्रभर आपल्या प्रयोगशाळेत संशोधनात मग्न असलेला निर्मल घरी येतो, तेव्हा अनुराधा घर आवरत असते. दीपक हसतो आणि गाडी सुरू करून निघून जातो. यावेळी पुन्हा एकदा लीला नायडू, बलराज सहानी आणि अभि भट्टाचार्य यांचे भावदर्शन अप्रतिम.
हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित, सचिन भौमिक लिखित हा ‘अनुराधा’ नामक चित्रपट १९६० साली पडद्यावर आला. तिकीट बारीवर त्याला माफकच यश मिळाले. पण, त्यातली गाणी मात्र आजही रसिकप्रिय आहेत. आता यातला महत्त्वाचा सामाजिक मुद्दा असा की, नवर्याची समाजसेवा, ध्येयनिष्ठता, शहराऐवजी गावात डॉक्टरकी करणे, म्हणजेच एकप्रकारे जाणूनबुजून दारिद्य्र पत्करणे, हे एका बायकोने त्याच्या गुणांना भाळून स्वीकारले आहे. ती स्वतः प्रतिभावंत कलावती आहे. ‘रेडिओ स्टार’ असण्याच्या ग्लॅमरची चव तिने चाखलेली आहे. एकेकाळी सोडून दिलेले ते सगळे आयुष्य आता तिला पुन्हा साद घालते आहे. पण, नवर्याने आपली चूक कबूल केल्यावर ती त्याच्या संसारातच राहण्याचा पर्याय निवडते. म्हणजे कठोर भाषेत बोलायचे, तर स्वतःच्या करिअरवर पाणी सोडते. हे बलिदान नाही का?
असंख्य क्रांतिकारकांनी ‘गीते’चे पुस्तक हातात घेऊन हसत-हसत आपली मान फासात अडकवून घेतली. त्यांचे बलिदान दिव्य आणि परमवंदनीयच आहे. पण, बदलत्या गरजेनुसार डॉ. हेडगेवारांनी बलिदानाची संकल्पना बदलली. ‘देशासाठी मरण्यापेक्षा, देशासाठी जगेन’ ही ती संकल्पना. कसा जगेन? तर देशासाठी, समाजाच्या उत्थानासाठी, समाज संघटनेसाठी माझ्या सर्व शक्ती समर्पित असतील. थोडा विचार करून पाहा. मृत्यूवर स्वतःच झडप घालणे हे सोपे नाही. पण, स्वतःच्या सर्व शक्ती तिळातिळाने समर्पित करून जगणे जास्तच कठीण आहे. तेसुद्धा सुखोपभोगाची सर्व साधने, प्रसिद्धी, कीर्ती सहज मिळत असताना. शलभ (पतंग) दिव्यावर झडप घालून प्रेमाची कुर्बानी देतो. जळून जातो. त्याचा त्याग, बलिदान दिव्य आहेच. पण, स्वतःच दीप बनून तिळतिळ जळत राहून लक्षावधींच्या अंधकारमय जीवनात आशेचा, अस्मितेचा प्रकाश आणणे जास्त दिव्य आहे. ती कठीण अशी ईश्वरी साधना आहे.
स्वतः डॉक्टर हेडगेवार आणि त्यांचे अनुकरण करणारे लक्षावधी स्वयंसेवक यांनी हिंदू संघटनेसाठी समर्पित केलेली आयुष्ये म्हणजे बलिदाने नव्हेत का? पूजनीय श्रीगुरुजींनी तर या बलिदानांना फारच समयोचित रूप दिले. तिळातिळाने समर्पित होत आजीवन प्रचारक होणे व्यावहारिकदृष्ट्याही फार अवघड आहे, हे लक्षात घेऊन श्रीगुरुजींनी १९४२ साली कालबद्ध प्रचारक योजना सुरू केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर, नोकरी-व्यवसायाला लागून संसारात पडण्यापूर्वी फक्त दोन वर्षे संघाचे पूर्णवेळ काम करावे, अशी ही काळानुरूप सोयीस्कर योजना होती. त्यामुळे असंख्य तरुणांच्या तरुणाईच्या जोम, जोश, उत्साह यांचा लाभ हिंदू संघटनाला मिळाला. हा त्याग नव्हे का? हे बलिदान नव्हे का?
पण, आणखी गंमत तर पुढेच आहे. अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते पुढे संसाराला लागले. अनेक जण संसारी असताना संघ संपर्कात येऊन कार्यकर्ते बनले. अशा सगळ्या लोकांना संघाचे काम करण्याची अतीव इच्छा होती. मग, ते नोकरी-धंदा सांभाळून संघकार्य करू लागले. संघाच्या गेल्या शतकभराच्या कार्यकाळात असे हजारो कार्यकर्ते असतील की, जे सकाळी ७ वाजता घर सोडायचे आणि रात्री १२ वाजता परतायचे. विनोदाने असे म्हटले जाते की, संघ कार्यकर्ते आपल्या छोट्या मुलांना उंचीने वाढताना अंथरुणातच पाहातात. कारण, ते पहाटे घरातून बाहेर पडतात, तेव्हा मुले झोपलेली असतात आणि रात्री परततात, तेव्हाही मुले झोपलेलीच असतात. आपल्या छोट्या मुलांशी बोबडे बोल बोलावेत, त्यांना पाठीवर बसवून घोडा-घोडा खेळावे, असे या बापांना कधीच वाटले नसेल का? मग, तो वात्सल्यभाव निग्रहाने बाजूला ठेवून समाजासाठी वणवण करणे, हे बलिदान नाही का?
आणि आपला नवरा या फुकटच्या ‘लष्कराच्या भाकर्या भाजत’ गावभर हिंडत असताना, त्याचा संसार सांभाळणारी; त्याचे घर, त्याची मुले वाढवणारी, याच्याबरोबर येणार्या कार्यकर्त्या मित्रांना वाटेल त्या वेळेला पोटभर जेवू घालणारी त्याची बायको? तिचा त्याग हे बलिदान नव्हे? अशा अनुराधा हिंदू समाजात घरोघर आहेत, म्हणून डॉ. निर्मलचे काम चालू आहे.
तुमची मढी तुमच्या देशात
अफजलखानाला हिंदवी स्वराज्य बुडवायचे होते. शिवरायांच्या विलक्षण बुद्धिमतीत्तेने आणि शौर्याने अफजलखानच बुडाला. ठार झाला. हिंदवी स्वराज्याच्या संपूर्ण भूमीऐवजी त्याला मेल्यावर स्वराज्यात फक्त साडेतीन हात भूमी मिळाली, त्याचे मढे गाडण्यासाठी.
शिवछत्रपतींच्या मृत्यूने आनंदित होऊन खुद्द आलमगीर औरंगजेब हिंदवी स्वराज्यावर चाल करून आला. त्यालाही हे स्वराज्य गिळून टाकायचे होते. पण, शंभू छत्रपती, राजाराम छत्रपती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खवळून उठलेल्या अवघ्या महाराष्ट्राने औरंगजेबाच्याही नशिबी फक्त साडेतीन हात भूमी आली, मढे गाडण्यापुरती. म्हणून कवी म्हणतो- ‘दुष्ट हेतूने जरी तू आला गिळण्या हिंदुस्थान, तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनले कबरस्तान, दुष्ट शत्रूचे मढे गाडण्या जमीन पुरते अमुची, पहा चाळुनि पाने पाने अमुच्या इतिहासाची.
पण, आधुनिक युगात या कबरस्तानांवर उरूस भरायला लागले आणि आमचेच बावळट लोक तिथे जाऊन शत्रूंच्या मजारीवर चादरी चढवायला लागले. असले उद्योग करायला संधीच मिळू नये म्हणून पाहा; अमेरिकेच्या कमांडो पथकाने अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला उडवल्यावर त्याचे मढे समुद्रात कुठेतरी अज्ञात जागी बुडवून टाकले. ‘न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी!’
आता जपान सरकारनेही आपल्या देशातल्या मुसलमानांना स्वच्छ शब्दांत सांगितले आहे की, तुमचे मृतदेह तुमच्या मूळ देशात नेऊन, त्यांची जी काही विल्हेवाट लावायची असेल, ती लावा. आम्ही तुम्हाला जपानच्या भूमीवर कुठेही कब्रस्तान उभे करायला परवागनी देऊ शकत नाही.
जपान हा आशिया खंडातला एक चिमुकला देश आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ अवघे तीन लाख ७७ हजार चौ. किमी आहे. म्हणजे आपल्या भारताच्या राजस्थान प्रांतापेक्षा तो थोडासा मोठा आहे. त्याची लोकसंख्या आहे फक्त १२ कोटी ३४ लाख. यात शिंटो आणि बौद्घ हे मुख्य धर्म आहेत. त्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ९४ टक्के होते. एखादा टक्का ख्रिश्चन आहेत. मुसलमान सुमारे दोन लाख म्हणजे ०.१५ टक्के आहेत. हे सगळे गेल्या सुमारे ३०-३५ वर्षांत नोकरी-व्यवसायानिमित्त जपानमध्ये गेलेले आहेत. मूळ जपानी लोकांमध्ये कुणीही मुसलमान नाही.
पण, जगभरातल्या सवयीप्रमाणे या ०.१५ टक्के मुसलमानांनी जपान सरकारकडे कब्रस्तानासाठी जमीन मागितली. जपान सरकारने त्यांना ठामपणे सांगितले आहे की, या देशातले ९९ टक्के लोक मृतदेहांचे दहन करतात. तुम्ही पण तसेच करा अथवा तुमचे मृतदेह, तुमच्या खर्चाने, तुमच्या मूळ देशात न्या. कब्रस्तानासाठी स्वतंत्र जागा मिळणार नाही!