भांडवल उभारणीचा एक पर्याय क्राऊड फण्डिंग

    12-Dec-2025   
Total Views |
Crowdfunding
 
लोकांकडून अगदी अल्प प्रमाणात पैसे घेऊन मोठा निधी उभा करण्याच्या पद्धतीला ‘क्राऊड फण्डिंग’ असे म्हणतात. उद्योग-व्यवसायाच्या भांडवल उभारणीसाठीदेखील ‘क्राऊड फण्डिंग’चा पर्याय प्रचलित होत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्लॅटफॉर्मही उपलब्ध झाले आहेत. याद्वारे गुंतवणुकीची संधीही निर्माण होत आहे. तेव्हा, नेमके ‘क्राऊड फण्डिंग’ म्हणजे काय? त्याचे विविध प्रकार कोणते? आणि यासंदर्भात नेमकी काय खबरदारी घेणे गरजेचे आहे? यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
एखादा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी किंवा चालू असलेल्या व्यवसायाच्या वाढीसाठी किंवा एखादे सामाजिक कार्य करण्यासाठी भांडवलाची गरज असते. सामान्यतः असे भांडवल प्रवर्तक स्वतः उभे करतात. तथापि काही वेळा व्यावसायिकांना संपूर्ण भांडवलाची उभारणी करणे शक्य होत नाही. अशा वेळी बँकेकडून कर्ज घेणे, शेअर बाजारातून निधी उभारणे किंवा सामाजिक कार्यासाठी देणग्या गोळा करणे, हे पर्याय असतात. या पारंपरिक पर्यायांपेक्षा ‘क्राऊड फण्डिंग’ हा एक पर्याय नव्या तंत्रज्ञानामुळे अधिक सुलभपणे उपलब्ध झाला आहे. ‘क्राऊड फण्डिंग’ म्हणजे अनेक लोकांच्या छोट्या-छोट्या आर्थिक योगदानातून एक मोठी रक्कम गोळा करून एखादा प्रकल्प, उत्पादनक्रिया, कलाविषयक काम, सामाजिक कार्य यांसाठीचे भांडवल उभे करणे. ही भांडवल उभारणीची आधुनिक पद्धत असून, यात इंटरनेटचा वापर करून मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचणे सहजशक्य होते. यासाठी ‘क्राऊड फण्डिंग’ अ‍ॅप किंवा नेट वर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. ज्यांना या फंडातून निधी हवा आहे, त्यांना किती रक्कम हवी आहे, कशासाठी व कशाप्रकारे हवी आहे, याबाबत विविध माध्यमांतून माहिती दिली जाते व ज्यांना हा प्रस्ताव योग्य वाटतो, असे गुंतवणूकदार ‘क्राऊड फण्डिंग’ अ‍ॅप किंवा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना शय असणारी व योग्य वाटणारी रक्कम गुंतवतात.
 
‘क्राऊड फण्डिंग’चे फायदे
 
हा पर्याय भांडवल उभारणी वाढीच्या पारंपरिक पर्यायांपेक्षा तंत्रज्ञानावर आधारित नवा पर्याय असून, याचे कामकाज पारदर्शक चालते. यामुळे नव्याने व्यवसाय सुरू करणार्‍याला आवश्यक ते भांडवल कमीत कमी वेळेत मिळते. सर्वसामान्य गुंतवणूकदारास त्याच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार, गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होतो व जास्त परतावाही मिळतो. निधी उभारणारे व गुंतवणूकदार हे दोघेही एकमेकांच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांच्यात थेट संवाद होतो. गुंतवणूकदार आपली गुंतवणूक विविध प्रकल्पांत करून आपली गुंतवणुकीची जोखीम कमी करू शकतो.
 
१) डोनेशन बेस्ड ‘क्राऊड फण्डिंग’ या पर्यायात संबधित अ‍ॅप किंवा प्लॅटफॉर्मवर सामाजिक कार्याकरिता किंवा आपत्कालीन मदतीकरिता देणगी स्वरूपात रक्कम गोळा केली जाते. यात देणगीदाराला कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते.
 
२) रिवॉर्ड बेस्ड ‘क्राऊड फण्डिंग’ यात अ‍ॅप किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इनोव्हेटिव्ह प्रोजेट, क्रिएटिव्ह प्रोजेट यासाठी पैसे गोळा केले जातात. प्रकल्प पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदाराला काही बक्षीस, सवलत, इन्सेन्टिव्ह दिला जातो.
 
३) डेट बेस्ड ‘क्राऊड फण्डिंग’ यामध्ये अ‍ॅप किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज स्वरूपात पैसे गोळा करता येतात. यासाठी किती रक्कम गोळा करायची आहे, किमान किती रक्कम घेतली जाईल, तसेच किती कालावधीसाठी घ्यावयाची आहे व घेतलेल्या रकमेवर किती दराने व्याज दिले जाईल, याची माहिती घ्यावी लागते. भांडवल उभे करीत असताना ज्यांना व्यवसायावरील आपला ताबा कायम ठेवायचा असतो, अशांना ‘इक्विटी’ऐवजी हा पर्याय सोयीचा वाटतो. लहान व्यवसायाची किंवा वैयक्तिक आर्थिक गरज यातून भागविली जाते.
 
४) इक्विटी बेस्ड ‘क्राऊड फण्डिंग’ यामध्ये अ‍ॅप किंवा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअरच्या स्वरूपात भांडवल गोळा केले जाते. स्टार्टअप उद्योजकांसाठी हा पर्याय सोयीचा असतो. कंपनीच्या प्रगतीबरोबरच गुंतवणूकदारास त्याने गुंतविलेल्या पैशांच्या प्रमाणात फायदा मिळतो. यात प्लॅटफार्मवर जमा झालेल्या रकमेच्या दोन ते पाच टक्के इतके शुल्क आकारले जाते. ते प्लॅटफॉर्मनुसार कमी-अधिक असू शकते.
 
‘क्राऊड फण्डिंग’ची प्रक्रिया
 
ज्याला भांडवल गोळा करायचे आहे, असा व्यावसायिक अ‍ॅप किंवा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रकल्पाची माहिती, आवश्यक भांडवलाची गरज, शैक्षणिक पात्रता, अनुभव, पार्श्वभूमी, प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी, गुंतवणूकदारास मिळू शकणारा संभाव्य परतावा, तसेच संबंधीचा व्हिडिओ उपलब्ध करून देतो, ज्यामुळे गुंतवणूकदारास प्राथमिक माहिती मिळून गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे शक्य होऊ शकते. त्यानंतर विविध माध्यमांतून प्रकल्पाचे मार्केटिंग केले जाते. याचा कालावधी एक ते दोन महिने इतका असतो. या कालावधीत अपेक्षित रक्कम जमा झाल्यास प्रवर्तकाच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाते व प्रकल्पाच्या कामास सुरुवात केली जाते. अपेक्षित रक्कम जमा झाली नाही, तर प्रकल्प अयशस्वी ठरला, असे समजून रक्कम गुंतवणूकदारास परत केली जाते. प्रकल्प सुरू झाल्यावर तो वेळेत पूर्ण करणे व गुंतवणूकदारांची अपेक्षा पूर्ण करणे, ही जबाबदारी प्रवर्तकांची असते. ज्या कारणासाठी भांडवल गोळा केले आहे, त्याच कारणासाठी ते वापरण्याची जबाबदारीही प्रवर्तकांची असते.
 
‘क्राऊड फण्डिंग’चे तोटे
 
अपेक्षित निधी जमा झाला नाही, तर प्रकल्प अयशस्वी समजून गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातात. अशा वेळी प्रवर्तकाने घेतलेली सर्व मेहनत वाया जाते. प्रकल्पाची सर्व माहिती प्लॅटफॉर्मवर असल्याने यात गुप्तता राहात नाही. स्पर्धकांना माहिती मिळत असल्याने स्पर्धात्मक युगात ही बाब घातक ठरू शकते. गुंतवणूकदारांची गुंतवणूक पारंपरिक पर्यायांपेक्षा जास्त जोखमीची असते.
 
काही प्रमुख प्लॅटफॉर्म
 
अ) फंडेबल - या प्लॅटफार्मचा मूळ उद्देश छोट्या उद्योगांना भांडवल उभे करून देण्यास साहाय्य करणे, तसेच व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे.
 
ब) किकस्टार्टर - या प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश, नवे चित्रपट, गाण्यांचे अल्बम, क्रिएटिव्ह आर्ट यांसारख्या प्रकल्पांना भांडवल उभे करून देणे, हा आहे.
 
क) केटो व मिलाप - या दोन प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश गंभीर आजारावरील उपचारांसाठी देणगी स्वरूपात पैसा गोळा करणे हा असून, देणगीदारास यातून प्राप्तिकरात कशी व किती सवलत मिळेल, याचीही माहिती या प्लॅटफॉर्मवर मिळू शकेल. हा प्लॅटफॉर्म समाजसेवा या उद्देशाने काम करतो.
 
ड) दि हॉटस्टार्ट - या प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश खाद्यपदार्थ व शीतपेये, वैद्यकीय सुविधा, शिक्षण किंवा यांसारख्या अल्प काही प्रकल्पांना भांडवल उभे करून देणे, हा आहे.
 
डोनेशन बेस्ड क्राऊन फण्डिंग - आपल्या देशात ‘क्राऊन फण्डिंग’ ही प्रक्रिया ‘सेवा’च्या नियंत्रणाखाली असून गुंतवणूकदारांच्या हिताचे लक्षण करणे, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. ‘डोनेशन बेस्ड क्राऊन फण्डिंग’मध्ये गुंतवणूक नसून केवळ देणगी असल्याने त्यात काही जोखीम नसते. यात प्रामुख्याने ‘पी-टू-टू (पीअर-टू-पीअर)’ पदवीचा समावेश असून, त्यासाठी २०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक सूचना असणारे परिपत्रक काढले आहे.
 
‘इक्विटी बेस्ड क्राऊड फण्डिंग’बाबत अनेक बंधने आहेत व हे फण्डिंग कायदेशीर नाही. सध्या ‘डोनेशन बेस्ड क्राऊड फण्डिंग’चा वापर ट्रस्ट, राजकीय पक्ष, समाजसेवी संस्था देणग्या गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करतात. सुमारे १४ पी-टू-पी प्लॅटफॉर्मवर ५० लाखांपर्यंतची गुंतवणूक व दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज काढता येते. रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्ट २०२४च्या आदेशानुसार, ‘पी-टू-पी’साठीच्या अटींची पूर्तता आता जास्त काटेकोरपणे होत असल्याने हे व्यवहार आधीच्या तुलनेत बरेच कमी झाले आहेत. आता केवळ ‘लेनदेन लब’ व ‘इंडिया पी-टू-पी’ हे दोनच प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक ‘डेट बेस्ड प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून आपल्या व्यवसायासाठी पैसे कर्जास येत आहेत.
 
काही चित्रपटनिर्माते ‘नेटफ्लिस’, ‘झी-फाईव्ह’, ‘हॉटस्टार’, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मशी विक्रीकरार करून आपल्या चित्रपटनिर्मितीसाठी पैसा उभा करीत आहेत. चित्रपट पूर्ण झाला की ओटीटी प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांचे पैसे परस्पर देऊन रक्कम निर्मात्यास देतात. यासाठी निर्माता, गुंतवणूकदार व संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्यात एक त्रिपक्षीय करार केला जातो. गुंतवणूकदारास साधारणपणे ११ ते १३ टक्के इतका वार्षिक परतावा मिळतो. भविष्यात ‘क्राऊड फण्डिंग’चा वापर निश्चितच वाढीस लागेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
 
 

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.