जागतिक पर्यावरण दिनी जन्मून आपले जीवन पर्यावरणाशी सुसंगत करत, बीजसंकलनाचा वारसा जपणारे सुहास कडू यांच्याविषयी...
अमरावती जिल्ह्यातील धाबा हे सुहास कडू यांचे मूळ गाव. पण, त्यांचा जन्म दि. ५ जून, १९८३ रोजी अकोल्यात झाला. अकोला शहरातच सुहास यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या मनात नेहमीच नवनवीन शिकण्याची आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण पुण्यात घेण्याचे ठरवले. पुण्यात त्यांनी ‘एमबीए’ची पदवी मिळवली, ज्यामुळे व्यावसायिक कामाला सुरुवात झाली. मार्केटिंग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर ‘SAP’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःला प्रशिक्षित केले. ज्यामुळे त्यांचा ‘आयटी’क्षेत्रात प्रवेश झाला. सध्या सुहास ‘Fujitsu’ सारख्या नामांकित जागतिक कंपनीमध्ये ‘लीड कन्सल्टंट’ या जबाबदारीच्या स्थानावर कार्यरत आहेत.
सुहास यांचे निसर्गाशी ऋणानुबंध व्यावसायिक कामामुळेच जुळले. ‘ग्रीन हिल्स’ या संस्थेच्या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली. कार्यक्रम पुण्यातील एका टेकडीवर होता. सुरुवातीला केवळ झाडं लावण्यापुरतेच ते या उपक्रमात सहभागी झाले होते. मात्र, त्यानंतर या उपक्रमात त्यांचा सहभाग जसा वाढत गेला, त्यावेळी त्यांना वृक्षारोपणाची खोल आणि सूक्ष्म प्रक्रिया लक्षात आली. झाडे लावणे जितके सोपे, तितकेच त्यांना जगवणे आणि वाढवणे कठीण, हे त्यांच्या लक्षात आले. टेकाडीवर लावलेली झाडे मरत होती. पाण्याचा अभाव, मातीची गुणवत्ता अशी निरनिराळी कारणे समोर येत होती. मात्र, झाड मरते म्हणजे आपण कुठेतरी चुकतोय, हीच भावना सुहास यांच्या मनी होती. याच जिज्ञासेपोटी त्यांचा निसर्गाशी खर्या अर्थाने संवाद सुरू झाला. पुढल्या काळात त्यांची भेट रघुनाथ ढोले, धनंजय शेडबाळे यांसारख्या पर्यावरणप्रेमींसोबत झाली. निसर्गाच्या कामाला विज्ञान, शिस्त आणि सातत्य लागते, हे सुहास यांना त्यांच्या कामाच्या माध्यमातून उमगले. झाड लावणे म्हणजे सामाजिक जबाबदारी नसून, ती निसर्गाशी संवाद साधण्याची क्रिया असल्याचे त्यांना जाणवले. यातूनच तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकून व्यवहारी बनलेला हा माणूस झाडांशी संवाद साधायला लागला.
‘पाणी फाऊंडेशन’च्या कामात सहभागी झाल्यामुळे सुहास यांच्या विचारांना अजून एक आयाम मिळाला. याठिकाणी नालाबंदी, ट्रेंच खोदणे, जलव्यवस्थापन यांसारख्या कामांना महत्त्व देण्यात आले होते. मात्र, त्यामागे एक खोलवरचा अर्थ आणि उद्दिष्ट होते. केवळ झाड लावणे, पाणी साठवणे, जमिनीत खड्डे खोदण्याचे काम सुहास करत नव्हते, तर निसर्गाचे तापमान कमी करणे, जीवनसत्त्व वाढवणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जग सावरणे, असा एक मोठा विचार करून ते काम करत होते. पुढल्या काळात वेगवेगळ्या संस्थांच्या वृक्षारोपण मोहिमांमध्ये सहभागी होऊन त्यांनी मुळापासून कामाला सुरुवात केली. या प्रवासातच त्यांची ओळख झाली, लाला माने या सह्याद्रीच्या निसर्गवीराशी. लाला माने म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर चालते-बोलते जंगलच! लाला मानेंसोबतच्या भटकंतीत सुहास यांना झाडांची इत्यंभूत माहिती मिळाली. बीजसंकलनाचे महत्त्व उमगले. दुर्मीळ होणार्या प्रजाती आणि नाश पावणार्या स्थानिक वनस्पतींच्या बिया शोधून त्या जतन करण्याची ऊर्मी निर्माण झाली. यातूनच त्यांचा बीजसंकलनाचा प्रवास सुरू झाला.
आजही कुठे झाडे फुललीत, कुठे फळे लगडली, कुठे दुर्मीळ वेल दिसली, अशा बातम्या कानावर पडल्या की, सुहास आपली दुचाकी काढून त्या झाडांच्या भेटीला निघतात. ‘बीज बँक’मधून महाराष्ट्रभर विविध संस्थांना बियावाटप करणे, बिया रुजवणे आणि त्यासाठी संस्थांना मार्गदर्शनदेखील करतात. सुहास यांची पत्नी आणि मुलगी त्यांच्या प्रवासाचे केवळ साक्षीदार नसून, सक्रिय भागीदारदेखील आहेत. आज पुण्यातील त्यांच्या फ्लॅटमध्ये पाऊल ठेवले की, कोणालाही ते एखादे ‘बीज साठवणूक भांडार’ वाटेल. या घराला ‘बीज बँक’ म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. तसेच सुहास यांना देशी झाडांची रोपवाटिका उभी करण्यामध्येही यश आले आहे.
सध्या सुहास यांनी आपला मोर्चा पक्षी, फुलपाखरे, माकडे, डुंकी, मधमाश्या आणि निसर्गातील सूक्ष्मजीवांसाठी आवश्यक असणार्या कृत्रिम पाणवठानिर्मितीकडे वळवला आहे. या पाणवठ्याचे डिझाईन इतके सूक्ष्म आणि खोल विचारपूर्वक केले गेले आहे की, ते विविध प्रकारच्या जीवजंतूंना सहजतेने आकर्षित करते. काहीसा झाडांच्या सावलीत वसलेला, काही भाग खोलसर खोदलेला, तर काही भाग थोडा उंच करून पाण्याच्या प्रवाहाला मार्ग देणारा, असा हा पाणवठा जैविक पाणवठ्यांचा उत्कृष्ट नमुना आहे. एकूणच शिक्षणापासून ते आजच्या व्यावसायिक पदापर्यंतचा सुहास कडू यांचा प्रवास, हे एका समर्पित, मेहनती आणि सातत्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाची यशोगाथा आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!