मुंबई : ( Chief Faiz Hameed ) पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स' अर्थात आयएसआयचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हामिद यांना कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीक्रेट ॲक्टचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून त्यांना १४ वर्षांच्या तुरुंगवास भोगावा लागणार आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत पाकिस्तानातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे फैज हामिद हे माजी पंतप्रधान इमरान खान यांचे अत्यंत जवळचे सैन्य अधिकारी होते.
पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंग 'आयएसपीआर'ने दिलेल्या माहितीनुसार, फैज हामिद यांच्या विरोधात पाकिस्तान आर्मी ॲक्टअंतर्गत फिल्ड जनरल कोर्ट मार्शल प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली होती. ही प्रक्रिया जवळपास १५ महिने चालली. त्यानंतर राजकीय गतिविधींमध्ये सहभाग, ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्टचे उल्लंघन, अधिकार आणि सरकारी संसाधनांचा दुरुपयोग आणि संबंधित व्यक्तींना बेकायदेशीर नुकसान पोहोचवणे या चार आरोपांखाली कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान सैन्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टॉप सिटी प्रकरणात फैज हामिद यांच्यावरील तक्रारींची सखोल चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांच्यावर कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
बराचकाळ चाललेल्या कठोर न्यायप्रक्रियेनंतर फैज हामिद यांना सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले. कोर्टाने त्यांना १४ वर्षे कैदेची शिक्षा सुनावली असून ती ११ डिसेंबर पासून लागू करण्यात आली. पाक सेनेने या प्रकरणात सर्व कायदेशीर प्रावधानांचे पालन करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच दोषी ठरवलेल्या फैज हामिद यांना संबंधित फोरममध्ये 'अपील करण्याचा अधिकार' असल्याची माहितीही सैन्याकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तान सैन्याचे म्हणणे आहे की न्यायप्रक्रिये दरम्यान आरोपी फैज हामिद यांना त्यांच्या पसंतीच्या बचाव पक्षाच्या टीमसह सर्व कायदेशीर अधिकार प्रदान करण्यात आले होते. मात्र, यानंतरही फैज यांच्यावर लावलेले सर्व आरोप सिद्ध झाले. तसेच, दोषी ठरवलेल्या फैज हामिद यांना संबंधित फोरममध्ये अपील करण्याचा अधिकार असल्याची माहितीही सेनेकडून देण्यात आली.
पाकिस्तान सैन्याने हेही स्पष्ट केले आहे की फैज हामिद यांची राजकीय घटकांशी संगनमत, तसेच राजकीय अस्थिरता आणि गोंधळ निर्माण करण्याशी संबंधित मुद्द्यांची वेगळी चौकशी सध्या सुरू आहे. असीम मुनीर आणि शहबाज शरीफ सरकारच्या भूमिकेचा विचार करता, या प्रकरणांमध्येही फैज हामिद यांना अजून शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक ले.जन.अहमद शरीफ चौधरी यांनी अलीकडे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, “जनरल फैज हामिद यांच्यावरील खटला हा पूर्णपणे कायदेशीर विषय आहे. कोणतीही अटकळ बांधू नये. प्रक्रिया पूर्ण होताच निर्णय घोषित केला जाईल.” अहमद शरीफ चौधरी हे सध्या त्यांनी केलेल्या एका लज्जास्पद कृतीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी माध्यम संवादादरम्यान एका महिला पत्रकाराकडे पाहून डोळा मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात बऱ्याच टीका टिपण्णी होताना दिसतायत.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक