जीवनगति ही न्यारी!

Total Views |
 
Sherrl Jennings
 
तीन तीन रोगांच्या प्रादुर्भावामुळे वयाच्या सहाव्या वर्षीच दृष्टी गमावलेल्या शर्ल जेनिंग्जने पुढे ‘मसाजिस्ट’ म्हणून अद्भुत कौशल्य आत्मसात केले. लग्नही झाले. लग्नानंतर बायकोच्या आग्रहाखातर विख्यात नेत्रचिकित्सकाकडून उपचारांनंतर शर्लला जग उघड्या डोळ्याने अगदी स्पष्ट दिसूही लागले. पण, जवळपास ४७ वर्षे डोळ्यांशिवाय जीवन जगलेल्या शर्लला हा डोळसपणाच नंतर सलू लागला. अशा या एका न्यार्‍याच जीवनगतिची ही कहाणी...
 
संत सूरदासांच्या ‘करम की गति न्यारी’ या काव्यरचनेवरून मराठीत दोन सुंदर रूपांतरे झाली आहेत. १९६०च्या दशकात गदिमांनी ‘उद्धवा, अजब तुझे सरकार,’ ही गीतरचना ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटासाठी केली. बाबूजींचे संगीत आणि त्यांचाच आवाज लाभलेल्या या अजरामर गीताने मराठी मनावर सुरू केलेेले अधिराज्य आज ६५ वर्षांनंतरही तस्से कायम आहे.
१९७०च्या दशकात शांताबाई शेळक्यांनी ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकासाठी, ‘उधो, जीवनगति ही न्यारी,’ अशा शब्दांनी पुन्हा एकदा सूरदासांच्या ‘करम की गति न्यारी’चे सुंदर रूपांतर केले. अभिषेकीबुबांनी ते सुरांमध्ये बांधले आणि रामदास कामतांच्या दमदार आवाजाने ते महाराष्ट्राच्या घराघरात पोचवले.
 
संत सूरदास अंध होते. कुणी म्हणतात, ते जन्मांध होते; कुणी म्हणतात, लहानपणी झालेल्या आजारात त्यांचे डोळे गेले. कसेही असो, समजत्या वयापासून सूरदासाचा सोबती अंधार हाच होता; पण त्याच वयात त्याला कृष्णभक्तीची आवडी जडली आणि ती हळूहळू इतकी वाढत गेली की, त्याला बाह्यदृष्टीची गरजच उरली नाही. त्याच्या अंतर्द़ृष्टीला कृष्ण परमात्म्याच्या अद्भुत लीला लख्ख-लख्ख दिसू लागल्या. तरीही म्हणे, एकदा असे घडले की, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपलिया’ असे भगवंताचे ते रूपडे प्रत्यक्ष पहावे, अशी अनिवार इच्छा सूरदासांच्या अंत:करणात उद्भवली आणि काय आश्चर्य! सूरदासांच्या डोळ्यांच्या ज्योती उमलल्या. भगवंताचे ते घवघवीत रूप त्यांनी ‘याचि डोळा’ पोट भरून पाहिले आणि मग ते भगवंताला म्हणाले, "देवा, मला पुन्हा आंधळाच कर बाबा! तुला पाहिल्यावर आता मला दुसरे काहीच पाहण्याची इच्छा नाही!” अशा महान संतांच्या, भक्तराजांच्या मालिकाच्या मालिका अखंडितपणे निर्माण झाल्यात, त्या फक्त आमच्या या भारतवर्षात; अन्य कुठेही नाही, कुठेही नाही.
 
असो. तर सूरदासांची आठवण झाली ती शर्ल जेनिंग्जवरून. शर्ल जेनिंग्ज हा अमेरिकन मध्यमवयीन इसम आहे. तो उत्तम ‘मसाजिस्ट’ आहे. तो अंधही आहे. अंध व्यक्ती फार उत्तम ‘मसाजिस्ट’ बनू शकतात. कारण, दृष्टी नसल्यामुळे त्यांचे स्पर्शज्ञान अतिशय तीव्र बनते. मानवी शरीरातली नसांची, शिरांची गुंतागुंत, स्नायूंना बसलेला मार इत्यादि गोष्टी त्यांच्या बोटांना क्षणात जाणवतात आणि मग कुशलपणे मसाज करून ते तो बिघाड दूरही करू शकतात.
 
पण, शर्ल जेनिंग्ज आता पाहू शकतो आणि त्यामुळेच सॉलिड वांधे झाले. मसाज करून घ्यायला येणार्‍या गिर्‍हाईकांची तुळतुळीत डोकी किंवा त्याहीपेक्षा म्हणजे चरबीचे थरच्या थर साचलेली थुलथुलीत पोटे पाहून त्याला कसेसेच वाटू लागले. त्यामुळे त्याची कुशल बोटे पूर्वीसारखे काम करीनात. शर्ल जेनिंग्ज तसा जन्मांध नाही. वयाच्या तिसर्‍या वर्षी त्याला पोलिओ, मेनेंजायटिस आणि कॅटस्क्रॅच फीव्हर असे तीन-तीन रोग एकदम झाले. डॉक्टरांनी त्याची आशाच सोडली होती; पण दोरी बळकट म्हणून तो वाचला. मात्र, त्याचे कमरेखालचे शरीर पूर्ण लुळे पडले नि दृष्टी हळूहळू मंदावत जाऊन साफच गेली. त्याची आई पर्ल लेमन ही मोठी जिद्दीची बाई. तिने त्याची खूप शुश्रूषा केली आणि हळूहळू त्याची प्रकृती सुधारली. वयाच्या सहाव्या वर्षी तो चालू-फिरू लागला. नजर मात्र गेलीच. त्यामुळे अंधशाळेत त्याचे शिक्षण झाले. मग तो मसाज शिकला आणि जॉर्जिया प्रांताची राजधानी अ‍ॅटलांटा इथल्या एका वैद्यकीय संस्थेत ‘मसाजिस्ट’ म्हणून नोकरीला लागला.
 
अमेरिकेत कुणीही, कुणाशीही, केव्हाही लग्न करत असतात नि तितक्याच सहजतेने घटस्फोटही देत असतात. वयाच्या ५१व्या वर्षी शर्लला बार्बारा नावाची मैत्रीण भेटली. ती घटस्फोटिता होती; पण दोघांचे सूर जुळले आणि दोघेजण लग्न लावून मोकळे झाले.
डॉ. ट्रेव्हर वुडहॅम्स हा अ‍ॅटलांटातला एक प्रख्यात नेत्रचिकित्सक. तो बार्बाराच्या चांगल्या ओळखीचा होता. तेव्हा बार्बाराने त्याच्याकडे जाऊन डोळे तपासून घेण्याचा भुंगा शर्लमागे लावला. डोळे जाऊन ४७ वर्षे उलटली होती नि डोळे नसल्यामुळे काहीच अडत नव्हते. त्यामुळे शर्ल फारसा उत्सुक नव्हता; पण आता नवीकोरी बायको एवढा आग्रह करतेय तर जाऊया, म्हणून तो बार्बाराबरोबर वुडहॅम्सकडे गेला.
 
तपासणीत डॉ. वुडहॅम्सला आशादायक परिस्थिती आढळली. शर्लचे नेत्रपटल बरेचसे शाबूत होते. डोळे येणे अवघड होते; पण अशक्य नव्हते. वुडहॅम्सने आवश्यक त्या शस्त्रक्रिया केल्या नि काही काळाने शर्ल जेनिंग्जचे काळोखभरले आयुष्य प्रकाशाने उजळून निघाले. शर्ल आणि बार्बारा दोघांनाही अर्थातच आनंद झाला; पण दिवस जसजसे उलटू लागले, तसतशी आनंदाची जागा भीती आणि नैराश्य घेऊ लागले. शर्लला चेहरे दिसू लागले; पण चेहर्‍यांवरच्या भावभावना ‘पाहून’ ओळखणे त्याला माहितीच नव्हते. त्यामुळे त्याचा गोंधळ उडू लागला. वस्तू ‘पाहण्याची’ त्याला सवयच नव्हती. त्याला वस्तू ओळखू यायच्या, त्या स्पर्शावरून आणि गंधावरून. त्यामुळे त्याला वस्तू दिसत होत्या; पण काय आहेत हे कळत नव्हते.
 
अंध असताना तो काठीच्या साहाय्याने का होईना; पण सहजपणे रस्ते ओलांडायचा. बस पकडायचा. जिने चढून किंवा उतरून भुयारी रेल्वे पकडायचा. आता त्याला रस्ता ’दिसत’ होता, जिना ’दिसत’ होता; पण तो कसा ओलांडावा, कसा चढावा हे त्याला सुधरेना. पूर्वी एखाद्या पार्टीला गेल्यावर कोण आपल्याशी मित्रत्वाने वागतोय, कोण तुटकपणे वागतोय, कोण खोट्या औपचारिकपणे वागतोय, हे शर्लला त्या माणसाच्या नुसत्या एका वाक्याच्या बोलण्यावरून समजायचे. त्याची तीव्र संवेदनाशक्ती त्या माणसाच्या बोलण्यातला खरा ’अंडरटोन’ अचूक पकडायची; पण आता तसे होईना. शर्लला चेहरे दिसू लागले; पण त्यांवरच्या भावभावना त्याच्या लक्षातच येईनात. सगळ्यात कहर झाला तो बाजारहाट करताना. अन्नपदार्थ, फळे अशा वस्तू तुम्ही हाताने स्पर्श करून, हुंगून पाहिल्यात तर एकवेळ कोणाला काही वाटणार नाही; पण घरसजावटीसाठी नवे फर्निचर घ्यायला तुम्ही दुकानात गेलात नि टेबल, खुर्च्या, कपाटे, सोफा सेट चाचपून आणि हुंगून पाहायला लागलात, तर विक्रेते तुमच्याकडे विचित्र नजरेनेच पाहणार; पण शर्लचाही नाईलाज होता. कारण, कोणतीही गोष्ट स्पर्शाने नि गंधानेच ओळखायची त्याला सवय होती. त्याच्या मेंदूला टेबल-खुर्ची ‘पाहून’ माहित नव्हती, तर स्पर्श-गंधानेच माहित होती.
 
या सगळ्यामुळे शर्ल जाम वैतागला. नको ते डोळे, असे त्याला वाटू लागले. वास्तविक, काही काळानंतर त्याच्या मेंदूला ’पाहाण्याची’ही सवय झाली असती आणि सारे काही सुरळीत झाले असते; पण असे घडायचे नव्हते. शर्ल जेनिंग्जला कमालीचे ’डिप्रेशन’ आले. त्यातून त्याला जबरदस्त न्यूमोनिया झाला. बार्बाराने, शर्लच्या मित्रमंडळींनी खूप धावपळ करून त्याच्यावर चांगले उपचार करवले. तो पूर्ण बरा झाला; पण त्याची नजर पुन्हा एकदा साफ गेली आणि यामुळे शर्ल जेनिंग्ज आता अगदी आनंदात आहे. त्याला जणू आपल्या पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते. परमेश्वराच्या या चित्रविचित्र जगात, अशीही न्यारीच जीवनगति बघायला मिळते!
 
बॉम्बकाढ्या गेला
 
कुठल्या तरी अज्ञात दूरध्वनीवरून पोलिसांना खबर येते- अमुकतमुक मोयाच्या जागी कोणत्या तरी अतिरेकी संघटनेने बॉम्ब ठेवलाय. अतिरेयांची मागणी मान्य न झाल्यास त्यांनी रीमोट कंट्रोलने बॉम्बचा धडाका उडवून देण्याची धमकी दिलेली आहे.
एकच धावपळ सुरू होते. अनेक पोलिसी गाड्या त्या विशिष्ट ठिकाणाच्या दिशेने सुटतात. गाड्यांमधून उतरलेले शेकडो पोलीस त्या ठिकाणाला संपूर्ण वेढा घालून तिथल्या सर्व माणसांना शयतितया दूर, सुरक्षित ठिकाणी हलवतात. स्वतः पोलीसही जय्यत तयार असतात; पण आता त्यांचे काम फक्त बंदोबस्त ठेवणे एवढेच उरते. मग पोलिसांच्या कड्यातून एकच माणूस आत प्रवेश करतो. जणू काही रोमच्या या प्रसिद्ध आखाड्यात - ‘कलोसियम’मध्ये उतरणारा ग्लॅडिएटर, कलोसियममधले पिसाळलेले वाघ-सिंह फक्त ग्लॅडिएटरचाच बळी घेणार असतात. इथला हा बॉम्ब कदाचित त्या सगळ्या ठिकाणाचाच विध्वंस करणार असतो. त्यामुळे या बॉम्बला ठार मारणे - डिफ्यूज करणे, या एका माणसासाठी फार-फार आवश्यक असते. तो एकटा माणूस असतो पोलीस खात्याचा ‘बॉम्ब डिस्पोझल स्पेशालिस्ट’ म्हणजे बॉम्ब निकामी करणारा तज्ज्ञ.
 
पीटर गर्नी हा लंडन पोलिसांचा असाच बॉम्बकाढ्या तज्ज्ञ होता. आपल्या कारकिर्दीत त्याने अक्षरश: शेकडो बॉम्ब निकामी केले असतील. १९५० साली तो साधा सैनिक म्हणून ब्रिटिश सैन्यात दाखल झाला. वापरून झालेली रिकामी काडतुसे, आयुष्य संपल्यामुळे मोडीत काढलेला दारूगोळा, मोडया-तोडया बॅटर्‍या, तसेच डायनॅमो, वायर्स अशी सामग्री घेऊन काहीतरी प्रयोग करीत बसणे, त्याला फार आवडायचे. १९७३ साली तो सैन्यातून निवृत्त होऊन लंडन पोलिसात दाखल झाला आणि अचानक त्याला आणि त्याच्या वरिष्ठांना कळले की, तो स्फोटक पदार्थ निकामी करण्याचे काम उत्तम प्रकारे करू शकतो. बघता-बघता पीटर गर्नी लंडन पोलिसदलाचा प्रमुख बॉम्बकाढ्या बनला. लष्करी बॉम्ब ठरावीक पद्धतीनेच बनवलेले असतात. त्यामुळे ते निकामी करणे एकवेळ सोपे; पण अतिरेयांचे बॉम्ब म्हणजे त्यांची आतली रचना कशी असेल याचा काहीच भरवसा नसतो. प्रत्येक सर्किट हे बुद्धीला आव्हान असते; पण पीटर गर्नीने वर्षानुवर्षे ते काम उत्तम रीतीने बजावले. ‘ब्रेव्हर मेन वॉक अवे’ हे त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पीटर गर्नी दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी नैसर्गिक मृत्यूने मरण पावला. शत्रूची गोळी त्याच्या कपाळी लिहिलेली नव्हती.
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.