रेल्वेच्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणा - खासदार नरेश म्हस्के

    25-Nov-2025
Total Views |
 
Naresh Mhaske
 
ठाणे : ( Naresh Mhaske ) ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर, मीरा रोड या स्थानकांमधील प्रलंबित विकासकामे, ठाणे - मुलुंड स्थानका दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई याबाबत आज दिल्लीतील संसद भवनात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर खंत व्यक्त करत विकासकामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचनाही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली.
 
रेल्वेच्या सल्लागार समितीची एक बैठक मंगळवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री वी. सोमन्ना, रवनीत सिंह उपस्थित होते. या समितीत देशभारतील १५ खासदार हे सदस्य म्हणून सहभागी होतात. या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या रेल्वे विषयक समस्या, देशापातळीवरील रेल्वेच्या मुलभूत प्रश्नांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.
 
अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून तो अद्याप प्रलंबित आहे. या प्रस्तावाला तात्काळ मंजूरी देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. ठाणे ते मुलुंड स्थानका दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई दूर करुन तातडीने काम सुरु करावे, ठाणे स्थानकात मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल त्वरित बांधण्याची आवश्यकता आहे.
 
हेही वाचा : Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर शुक्रवारी अंतरिम सुनावणी
 
हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ शी जोडेल. तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडेल. ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७, ८ आणि ९, १० येथे एक्सलेटरची उभारणी करणे गरजेचे आहे. भाईंदर रेल्वे स्थानकातून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकलची संख्या वाढविणे, दादर रेल्वे स्थानकातून पश्चिम रेल्वेने जोधपूर येथे जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरु करणे, अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस दैनंदिन सोडण्यात यावी, जोधपूर आणि जयपूर येथे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना भाईंदर येथे थांबा द्यावा, भाईंदर स्थानकात नव्याने होत असलेल्या फलाटाची रुंदी १० मीटरने वाढविण्यात यावी, मीरा रोड स्थानकांत तिकीट खिडकीची संख्या वाढविण्यात यावी, पनवेल ते नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान विशेष लोकल सुरु करणे, सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता राखणे, त्यांची संख्या वाढविणे, ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांत वन रुपी रुपये क्लिनिक सुरु करणे, पादचारी पूल, लिफ्ट, एक्सलेटरची संख्या वाढविणे अशा विविध आग्रही मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठकीत केल्या.
 
सिडको प्रशासनाने नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे, तर रेल्वे प्रवासी सेवा मध्य रेल्वे देत आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कित्येक वर्ष येथील रेल्वे स्थानकांची सुधारणाच झालेली नाही. स्थानकांतील दुर्दशेमुळे प्रवाशांना नाहक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आतापर्यंत भारतीय रेल्वे करत असलेल्या प्रगतीचे खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक केले. मात्र सर्वसामान्य लाखो प्रवाशांना मस्तवाल अधिकाऱ्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
 
हे वाचलत का? - KDMC School : केडीएमसीच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी किडलेट ॲप माध्यमातून अध्ययन अध्यापन
 
सार्वजनिक शौचालये, पिण्याचे पाणी, एक्सलेटर, शेड अशा मुलभूत सोयीसुविधा देणे गरजेचे असताना मुजोर अधिकारी केबिनमध्ये बसून असतात. या देशभरातील मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणणे गरजेचे असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत ठणकावले. रेल्वेविषयक काम करत असतांना चर्चा, संवाद, सूचना आणि अंमलबजावणी होण्यासाठी देशभरातील खासदारांसाठी समन्वय अधिकारी नेमण्याची महत्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व खासदारांच्या वतीने बैठकीत केली. खासदार संजय पाटील, सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी सुद्धा खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रातील रेल्वे विषयक मांडलेल्या सूचना, मागण्यांना पाठींबा देत मागण्या लवकरात लवकर सोडविण्याची विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कडे केली.