हिंडन हवाई तळावर ९३ वा हवाई दल दिन साजरा; 'ऑपरेशन सिंदूर'चे एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्याकडून कौतुक

    08-Oct-2025   
Total Views |

नवी दिल्ली : भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी बुधवारी हिंडन हवाई तळावर झालेल्या ९३ व्या हवाई दल दिन सोहळ्यात जवानांना संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’चे उल्लेखनीय यश अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, हे ऑपरेशन सूक्ष्म नियोजन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि ठाम अंमलबजावणीद्वारे काय साध्य करता येते याचे तेजस्वी उदाहरण आहे.

एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले, “देशात विकसित शस्त्रास्त्रांनी शत्रूच्या भूभागात अचूक आणि प्रखर प्रहार करून स्वदेशी क्षमतांवरील विश्वास अधिक दृढ केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नियोजन, प्रशिक्षण आणि धैर्याच्या एकत्रित प्रयत्नांचे उत्कृष्ट उदाहरण आहे.”

ते पुढे म्हणाले, “या ऑपरेशनने आम्हाला व्यावसायिक अभिमान दिला आहे. काही दिवसांतच हवाई शक्तीने युद्धातील निकालावर परिणाम घडवून आणता येतो हे जगासमोर सिद्ध केले आहे. भारताच्या अचूक आणि धाडसी हवाई कारवायांनी राष्ट्राच्या सामरिक जाणीवेत आक्रमक हवाई मोहिमेचे स्थान पुन्हा प्रस्थापित केले आहे.”

सिंग यांनी इतिहासातील हवाई दलाच्या कामगिरीचा उल्लेख करताना सांगितले, “आपल्या हवाई योद्ध्यांनी १९४८, १९७१ आणि १९९९ मधील युद्धांमध्ये तसेच बालाकोटवरील कारवाई आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अभूतपूर्व कामगिरी केली. आम्ही फक्त आकाशाचे रक्षणकर्ते नाही, तर राष्ट्राच्या सन्मानाचेही संरक्षक आहोत.”

हवाई दलाच्या कार्यप्रणालीत नवे शस्त्रास्त्र, प्रणाली आणि उपकरणे समाविष्ट करण्यात आलेली असून, त्यातून उत्तरदायित्व, सुरक्षा आणि सुरक्षिततेची नवी संस्कृती विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले. “सर्व पातळ्यांवर अधिकारी स्वतः नेतृत्व करत आहेत आणि प्रत्येक जवानाला प्रशिक्षण व प्रेरणा दिली जात आहे,” असे त्यांनी नमूद केले.

एअर चीफ मार्शल सिंग यांनी ‘ऑपरेशन सिंधू’चा उल्लेख करताना सांगितले की, १८ जून रोजी इराण आणि इस्रायलमधील संघर्षग्रस्त भागांतून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हवाई दलाने तत्काळ कारवाई केली. “संघर्षग्रस्त प्रदेशातून नागरिकांचे बचाव, तसेच परदेशी संकटांदरम्यान मदत सामग्री व कर्मचारी पाठवणे — हे सर्व आमच्या सेवाभावाचे सर्वोच्च उदाहरण आहे,” असे ते म्हणाले.

या सोहळ्यात भारतीय हवाई दलाने आपली ताकद प्रदर्शित करत भव्य संचलन केले. यात राफेल, सुखोई-३० एमकेआय, मिग-२९ यांसारखी लढाऊ विमाने, स्वदेशी ‘नेत्रा’ एईडब्ल्यूअँडसी विमान, सी-१७ ग्लोबमास्टर, ‘आकाश’ जमिनीवरून आकाशात मार करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, सी-१३०जे हरक्युलिस, अपाचे हल्लेखोर हेलिकॉप्टर आणि प्रगत हलके हेलिकॉप्टर यांचा समावेश होता.