पंतप्रधान ८-९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार उदघाटन

    07-Oct-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ८-९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुपारी ३ च्या सुमाराला ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ३:३० च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. तसेच मुंबईतल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

पंतप्रधान ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमाराला ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचे मुंबईत स्वागत करणार आहेत. दोन्ही देशांचे पंतप्रधान दुपारी १:४० वाजता, मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे ‘सीईओ फोरम’ला उपस्थित राहतील. त्यानंतर, दुपारी २:४५ च्या सुमारास ते सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात सहभागी होतील. या महोत्सवात उभय पंतप्रधानांची मुख्य भाषणेही होणार आहेत.

पंतप्रधान मोदी, देशाला जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या आपल्या संकल्पानुरूप सुमारे १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा हरित क्षेत्र विमानतळ प्रकल्प असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीअंतर्गत तो विकसित करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर कार्यरत राहील. यामुळे गर्दी कमी होण्‍यास मदत मिळेल, तसेच मुंबईला जागतिक बहु-विमानतळ प्रणालींच्या श्रेणीत आणता येईल. या विमानतळाचे क्षेत्रफळ ११६० हेक्टर असून जगातील सर्वात कार्यक्षम विमानतळांपैकी एक ठरण्याच्या दृष्टीने त्याचे आरेखन करण्यात आले आहे. परिणामतः हे विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी (एमपीपीए) आणि ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळेल.

विमानतळाच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधांमध्ये स्वयंचलित प्रवासी वहन (एपीएम) या परिवहन प्रणालीचा समावेश आहे. यामुळे सर्व चारही प्रवासी टर्मिनल सुरळीतरीत्या आंतर-टर्मिनल स्थानांतरणासाठी जोडली जातील तसेच विमानतळाहून शहरांकडील पायाभूत सुविधांसाठी जोडणी उपलब्ध होईल. शाश्वततेसाठी विमानतळावर शाश्वत विमान इंधनासाठी समर्पित साठवणूक सुविधा, अंदाजे ४७ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आणि संपूर्ण शहरात सार्वजनिक कनेक्टिव्हिटीसाठी ईव्ही बस सेवा असतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हा वॉटर टॅक्सीने अर्थात जलमार्गाने जोडलेला देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे.

आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या मुंबई मेट्रो मार्गिका -3च्या 2बी या टप्प्याचे उदघाटनही पंतप्रधान या दौऱ्यात करणार आहेत. या टप्प्याचा एकूण खर्च सुमारे १२,२०० कोटी रुपये आहे. यासह, ते संपूर्ण मुंबई मेट्रो मार्गिका 3चे (अ‍ॅक्वा लाईन) राष्ट्रार्पण करणार असून याचा एकूण खर्च ३७,२७० कोटी रुपयांहून अधिक आहे. ही मेट्रो मार्गिका शहरी वाहतूक परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

मुंबईची पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका म्हणून हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) प्रवासाची पुनर्परिभाषा करण्यासाठी सज्ज आहे, जो लाखो रहिवाशांसाठी वेगवान, अधिक कार्यक्षम आणि आधुनिक वाहतूक उपाय प्रदान करेल.

कफ परेड ते आरे जेव्हीएलआर पर्यंत २७ स्थानके असलेली ३३.५ किमी लांबीची मुंबई मेट्रो मार्गिका -३ दररोज १३  लाख प्रवाशांना सेवा देईल. प्रकल्पाचा शेवटचा टप्पा २ ब दक्षिण मुंबईतील वारसा आणि सांस्कृतिक स्थळांशी, जसे की फोर्ट, काळा घोडा आणि मरीन ड्राइव्हशी, अविरत आणि सुलभ जोडणी प्रदान करेल. तसेच मुंबई उच्च न्यायालय, मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार आणि नरिमन पॉइंट यासारख्या प्रमुख प्रशासकीय आणि आर्थिक केंद्रांपर्यंत थेट पोहोचणे शक्य करेल.

रेल्वे, विमानतळ, इतर मेट्रो मार्गिका आणि मोनोरेल सेवा या आणि अशा वाहतुकीच्या इतर पर्यायांसोबत कार्यक्षम एकात्मितेची सुनिश्चित करता येईल अशा पध्‍दतीने मेट्रो मार्गिका-3 ची रचना केली गेली गेली आहे. यामुळे अगदी शेवटच्या टोकापर्यंतची संपर्क जोडणी वाढेल आणि संपूर्ण महानगरीय प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होईल.

पंतप्रधान मुंबई वन या ‘इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी अॅप’ चा प्रारंभही करतील. हे ॲप मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक परिवहन सेवा वापर करणा-यांसाठी असणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो मार्गिका २A आणि ७, मुंबई मेट्रो मार्गिका ३, मुंबई मेट्रो मार्गिका १, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई उपनगरीय रेल्वे, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन, ठाणे महानगरपालिका परिवहन, मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचा अंतर्भाव असणार आहे.