नवी दिल्ली : सोनम वांगचुक यांच्या नजरबंदीविरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. लडाखमध्ये अलीकडे झालेल्या हिंसक घटनांनंतर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एनएसए) 1980 अंतर्गत वांगचुक यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून, त्याला गीतांजली यांनी आव्हान दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला होणार आहे.
न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान निरीक्षण नोंदविताना सांगितले की, याचिकाकर्त्याला नजरबंदीची कारणे सांगण्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात येणार नाही.
याचिकाकर्त्या गीतांजली अंगमो यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडणी करताना सांगितले की, वांगचुक यांच्या नजरबंदीचे कारण स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्रतिवाद करत सांगितले की, नजरकैदेत असलेल्या वांगचुक यांना आधीच कारणे कळविण्यात आली आहेत. मात्र, कायद्यानुसार पत्नीला ती कारणे सांगण्याचा कोणताही प्रावधान नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.