गाझा शांतता प्रयत्नांत निर्णायक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक

    04-Oct-2025   
Total Views |

नवी दिल्ली : गाझा पट्ट्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे स्वागत केले आहे. बंधकांच्या सुटकेबाबत सकारात्मक हालचाली झाल्याने मानवतावादी आणि राजनैतिक प्रयत्नांत निर्णायक प्रगती झाली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

शनिवारी एका पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “गाझा शांतता प्रयत्नांत निर्णायक प्रगती होत असताना आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे स्वागत करतो. बंधकांच्या सुटकेचे संकेत मिळणे ही मोठी सकारात्मक पायरी आहे. भारत टिकाऊ आणि न्याय्य शांततेसाठी होणाऱ्या सर्व प्रयत्नांना ठाम पाठिंबा देत राहील.”

गाझा परिसरात अनेक आठवड्यांपासून चालू असलेल्या संघर्षामुळे शेकडो लोकांचा बळी गेला असून हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटनांदरम्यान सुरू असलेल्या या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक समुदायाकडून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ट्रम्प प्रशासनाने या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढाकार घेतल्याने परिस्थिती स्थिर करण्यासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. बंधकांच्या सुरक्षित सुटकेसाठी चाललेले प्रयत्न हे मानवतावादी दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहेत.

भारताने नेहमीच पश्चिम आशियातील शांतता प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांशी भारताचे ऐतिहासिक आणि मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे या भागात टिकाऊ व न्याय्य शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताने सातत्याने आपला पाठिंबा नोंदवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या निवेदनामुळे भारताची शांततेच्या बाजूने असलेली भूमिकाही पुन्हा अधोरेखित झाली आहे.