आवाज गोड असल्याने शाळेतील कवितागायनामुळे संघशाखेत संघाची गाणी गाण्याची संधी मिळवून पुढे संघासाठीच आपले आयुष्य वेचणार्या रामभाऊ देशमुख यांचे आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेले होते. संघावरील बंदी उठल्यानंतर संघ सावरण्यात ज्या स्वयंसेवकांचे योगदान होते, त्यात रामभाऊही एक होते. त्यांच्या या जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊया...
स्वातंत्र्यपूर्व काळात कल्याणवासी झालेल्या रामभाऊंची रेल्वेत स्टेशनप्रमुख म्हणून कारकीर्द सुरू झाली. लहानपणापासूनच गळा गोड, त्यात गायनाची आवड असल्याने संघाची गाणी गाण्यासाठी त्यांना आवर्जून बोलावले जात असे. यातून ते कायमचे संघकार्याशी जोडले गेले ते शेवटपर्यंत. रामभाऊ देशमुख यांचा जन्म दि. १ सप्टेंबर १९२४ रोजी जळगाव येथे झाला, जे गाव आज मुक्ताईनगर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील वनविभागात फॉरेस्टर म्हणून होते. त्यांनी अमळनेरला घर बांधले. तेथेच प्रताप हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांचा आवाज गोड असल्याने शाळेतील मुळे मास्तर त्यांच्याकडून शाळेत कविता म्हणून घेत असत. संघाच्या शाखेतही त्यांना गाणी गायला बोलावले जायचे. संघाची गीते म्हणता म्हणता त्यांना शाखेची गोडी लागली. पूज्य साने गुरुजीही त्यांच्या शाळेत होते. पण सेवादलाच्या शाखेपेक्षा त्यांना संघशाखेनेच जास्त आकर्षित केले व ते रोज संघात जाऊ लागले.
अमळनेरच्या शाखेत, रामभाऊ बोंडाळे, ब्रह्मे, साळवी हे त्यांचे मित्र झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना मुंबईत रेल्वेत नोकरी लागली व ते १९४४ ला कल्याण येथे आले. तेव्हा पारनाक्यावरील सरकारवाडा मैदानात संघशाखा लागत असे. त्या शाखेत ते जाऊ लागले. वासुदेवराव विद्वांस, गंंगाधरपंत जोशी, बापूराव फडणीस, रामभाऊ फडके, वामनराव साठे, भाऊ साठे, भाऊ सबनीस, दामुआण्णा टोकेकर, माधवराव काणे, मधुकरराव काळे, भगवानराव जोशी, प्रभाकर संत हे त्यावेळचे समवयस्क स्वयंसेवक होते. अॅड. बापूसाहेब मोडक हे जिल्हा संघचालक होते. तर भाऊराव चोळकर हे नगर संघचालक होते. रामभाऊ रेल्वेत नोकरी करीत होते. महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकात त्यांना प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. ती त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. ते उत्तम शंखवादक होते. त्यामुळे ते घोषपथकातही होते.
१९४८ साली महात्मा गांधींची हत्या झाली. इतर गावांप्रमाणे कल्याणातही दंगे झाले. सहस्रबुद्धे यांचे दुकान जाळण्यात आले व विघ्नसंतोषी लोक ‘नमस्कार मंडळ’ जाळण्यास आले. त्यावेळी प्रसंगावधान राखून मंडळात असलेल्या रामभाऊ देशमुख व रामभाऊ फडके यांनी बिगुलातून ‘डेंजर कॉल’ वाजवला. डेंजर कॉल ऐकून स्वयंसेवक दंड घेऊन ‘नमस्कार मंडळा’त धावून आले व जमावाला चोप देऊन पळवून लावले. नंतर संघावर बंदी आली. शाखा बंद झाल्या. तेव्हा स्वयंसेवकांना एकत्र येता यावे, म्हणून काय करता येईल, याचा विचार झाला.
रामभाऊ उत्तम पोहणारे होते, ते उत्तम व्हॉलीबॉल खेळत असत. त्यांचा आवाज सुरेल होता. तेव्हा तरुणांना, बालकांना खाडीवर पोहायला शिकविण्याचे ठरले. एक व्हॉलीबॉल क्लब काढण्यात आला व आठवड्यातून एकदा पारनाक्यावरील राम मंदिरात तुकडोजी महाराजांची राष्ट्रभक्तीने भरलेली भजने गावयाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात रामभाऊंकडे प्रामुख्याने जबाबदारी देण्यात आली. त्यांचे मोठे बंधू गजाननराव पेटी वाजवायचे. तर रामभाऊ गोखले व इतर मंडळी भजने गाऊ लागली. यानिमित्ताने दर आठवड्याला स्वयंसेवकांचे एकत्रिकरण सुरू झाले.
दि. ९ नोव्हेंबर १९४८ पासून सत्याग्रह पर्व सुरू झाले.
कल्याणात पारनाक्यावर स्वयंसेवकांनी काही दिवस तुकड्यातुकड्यांनी सत्याग्रह केला. याची सर्व योजना भजनाच्या वेळी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी केली होती. यथावकाश संघबंदी उठली व शाखा पुन्हा सुरू झाल्या. दि. २६ जानेवारी १९५० या प्रजासत्ताक दिनी संघाचा उत्सव झाला. त्यादिवशी कल्याणमध्ये संघ, पोलीस व होमगार्ड यांचे संयुक्त संचलन निघाले, ते दुर्गाडी किल्ल्यावर संपले. त्या संचलनाचे नेतृत्व बंडू गोगटे यांनी केले होते. गंमत म्हणजे, तेव्हा घोषपथकात दोन रामभाऊ फडके व रामभाऊ देशमुख होते.
रामभाऊंकडे स्टेशनप्रमुख ही जबाबदारी होतीच, त्याचबरोबर कल्याण तालुक्यातील त्यावेळच्या ठाकुर्ली, पाथर्ली, असरे, गोळवली या खेड्यांच्या संपर्काचीही जबाबदारी होती. कल्याणमध्ये संघाचे काम खूप चांगले होते. दि. २६ फेब्रुवारी १९५० रोजी कल्याणमध्ये प्रांतिक कार्यकारिणीची सभा व निवडणूक झाली. काशिनाथपंत लिमये प्रांतसंघचालक म्हणून निवडले गेले.
स्टेशनप्रमुख म्हणून सर्व महत्त्वाच्या मंडळींना स्टेशनवर उतरवून घेणे. त्यांना गावात वाहनाने आणणे; त्यांच्या रेल्वे आरक्षणाची व्यवस्था करणे किंवा गाडीत जागा पकडण्याची व्यवस्था करणे आदी गोष्टी रामभाऊ करीत. नागपूरहून पुण्याला किंवा पुण्याहून नागपूरला जायचे असेल, तर पू. श्रीगुरुजी व इतर आधिकार्यांना कल्याणला उतरावे लागे. गाडीला जास्त वेळ असेल तर ते गावात बापूसाहेबांकडे येत असत. काही वेळा आपल्या आधिकार्यांसाठी स्वयंसेवक मुंबईहून गाडीत बसून येत असत. यामुळे प. पू. श्रीगुरुजी व सर्व अखिल भारतीय कार्यकर्त्यांचा व रामभाऊंचा परिचय झाला.
पं. दीनदयाळ उपाध्याय, हिंदूमहासभेचे अध्यक्ष ना. भा. खरे, बाळशास्त्री हरदास, वाचस्पती क्षीरसागर, बाबासाहेब पुरंदरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, एकनाथजी रानडे, पंडित सातवळेकर, बाळासाहेब देवरस व इतर अनंत कार्यकर्त्यांची सोबत त्यांना लाभली. मोरोपंत पिंगळे व पू. श्रीगुरुजींचा जास्त सहवास लाभला.
स्वतः संघकाम करीत त्यांनी अनेकांना संघकामाशी जोडले. अनेकांना आपल्या ओळखीतून नोकरीला लावले. घरातील सर्वांवर संघसंस्कार केले. आज त्यांची चार मुले व एका मुलीसह सर्व संघपरिवारात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. अशा तर्हेने जीवनभर संघकाम करून दि. १२ नोव्हेंबर २००७ रोजी ते अनंतात विलीन झाले. त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहील.