जेनस्मृती

    03-Oct-2025   
Total Views |

ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक, संशोधक डॉ. जेन गुडाल यांचे वयाच्या ९१व्या वर्षी नुकतेच निधन झाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईत झालेल्या ‘ओशन लिटरसी डायलॉग’दरम्यान त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. आज डॉ. जेन गुडाल या जगात नसल्या, तरी त्यांचे विशेषत्वाने चिम्पाझींवरील संशोधनकार्य हे पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

वातावरणीय बदलांमुळे जगासमोर निर्माण झालेल्या समस्यांचे निरसन हे ‘इंटेलिजन्स’ वापरून नाही, तर ‘इंटेलेक्च्युअल’ दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक आहे,” असे मत ज्येष्ठ वन्यजीव संवर्धक, संशोधक आणि ‘संयुक्त राष्ट्र परिषदे’च्या शांतिदूत डॉ. जेन गुडाल यांनी मांडले. त्या गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘ओशन लिटरसी डायलॉग’ या कार्यक्रमात बोलत होत्या. स्मित चेहरा, साधी बोली आणि वलय निर्माण करणारी देहबोली, असे काहीसे गुडाल यांचे व्यक्तिमत्त्व मुंबईकरांना त्यावेळी अनुभवता आले.

नव्वदीच्या असूनदेखील न थकता, तासभर त्यांनी केलेले भाषण आणि वातावरणीय बदलांवर मांडलेले निरसनवादी मतं ऐकून उपस्थित मंडळी हेलावून गेली होती. गेल्या काही वर्षांत मुंबईला विद्रोही पर्यावरणीय चळवळींचा इतिहास लाभला आहे. पर्यावरणीय समस्यांची उकल ही विद्रोहातूनच होऊ शकते, असे भासवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. अशा नगरीत गुडाल यांनी अत्यंत शांतपणे, सामंजस्याने पर्यावरणीय समस्यांची उकल ही निसरनवादी दृष्टिकोन ठेवूनच होऊ शकते, असे ठसवून सांगितले. गुडाल या ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत पाच दिवसीय मुंबई दौर्‍यावर आल्या होत्या.

डॉ. जेन गुडाल या ज्येष्ठ वन्यजीव संशोधिका ‘प्रायमेट’ म्हणजेच वानर कुळातील प्राण्यांवर केलेल्या अभ्यासासाठी प्रसिद्ध होत्या. विशेष करून आफ्रिकेत चिम्पांझींविषयी त्यांनी केलेले संवर्धन आणि संशोधनकार्य कित्येकांसाठी मार्गदर्शक ठरले. त्यांनी टांझानियात जाऊन चिम्पांझींविषयी केलेल्या संशोधनामुळे वानरविज्ञानात क्रांतिकारक भर पडली. चिम्पांझी वेगवेगळी साधने बनवू शकतात आणि त्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व असते, याचा उलगडा गुडाल यांनी केला. चिम्पांझी झाडाच्या छोट्या फांदीचा हत्यार म्हणून उपयोग करतात.

जेन यांच्या संशोधनाने ‘हत्यार वापरणारा आणि बनवणारा प्राणी म्हणजे माणूस,’ ही माणसाची व्याख्या अपुरी आणि संदिग्ध ठरली. वारुळात डहाळी अलगद खुपसून त्यावरील मुंग्या खाण्याची युक्ती लहान चिम्पांझी हे मोठ्या चिम्पांझींचे निरीक्षण करून शिकतात, याचा उलगडा त्यांनी केला. या प्राण्यांच्या बुद्धिमत्तेबाबत गुडाल यांच्या इतके संशोधन अन्य कुणीही केलेले नाही. 2002 साली ‘संयुक्त राष्ट्र परिषदे’ने त्यांच्या नावाची घोषणा ‘शांतिदूत‘ म्हणून केली होती.

‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट-इंडिया’ने गेल्या वर्षी मुंबईत आयोजित केलेल्या ‘ओशन लिटरसी डायलॉग’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला जीवनकाळ उलगडला होता. त्या म्हणाल्या होत्या, “मी १९५७ साली केनियामध्ये गेले होते. परंतु, केनियाला जाण्यासाठी मी बराच संघर्ष केला. त्याकाळी विमानप्रवास हा जहाज प्रवासापेक्षा फार खर्चिक होता. केनियाच्या प्रवासाकरिता पैसे गोळा करण्यासाठी मी एका उपाहारगृहात वर्षभर मदतनीस म्हणून काम केले. केनियात मला प्राणीसृष्टीची पहिल्यांदाच ओळख झाली. जंगलतोडीमुळे तिथल्या चिम्पांझींची संख्या कमी होत असल्याचे माझ्या लक्षात आहे. लुई लिकी यांच्या सांगण्यावरून मी १९६० साली या प्राण्यावर संशोधनाचे काम सुरू केले,” असे गुडाल यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, “सध्या जगासमोर अनेक पर्यावरणीय समस्या आहेत. त्या वातावरणीय बदलांमुळे निर्माण झालेल्या आहेत. या समस्यांविषयी केवळ बोलण्यापेक्षा त्यांवर उपाय सूचविणे आवश्यक आहे. माणूस ‘इंटेलिजन्ट’ आहे. परंतु, चिम्पांझी हा ‘इंटेलेक्च्युअल’ आहे. त्यामुळे माणसांनी जगासमोर उभ्या असणार्‍या समस्यांचे निसरन हे ‘इंटिलिजन्स’ वापरून नाही, तर ‘इंटेलेक्च्युअल’ दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन गुडाल यांनी केले होते. “केनियाच्या प्रवासादरम्यान मला समुद्राचे विराट दर्शन झाले. आजवर ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट’ला जंगलासंबंधी केलेल्या कामासाठी ओळखले जाते. परंतु, आता आम्ही समुद्रासंबंधी कामाला सुरुवात केली असून ‘ओशन लिस्ट्रसी डायलॉग-इंडिया’ हा त्यामधीच एक भाग आहे,” अशीही माहिती त्यांनी दिली होती.


मैत्रीपूर्ण वर्तन

चिम्पांझी पूर्णतः शाकाहारी असतात, असा पूर्वी समज होता. परंतु, ते कीटक खातात. एवढेच नाही, तर ’कोलोबस’ जातीची छोटी माकडे आणि इतर छोटे प्राणी संगनमताने कोंडी करून शिकार करून खातात, असे जेन यांच्या निरीक्षणामुळे समजले. चिम्पांझींच्या गटात शारीरिक ताकदीप्रमाणेच आवाज मोठा असणे महत्त्वाचे असते. कारण, शत्रूला पळवून लावण्यास मोठा आवाज उपयोगी पडतो. ‘डेव्हिड’ नावाच्या लहानशा चिम्पांझीचा आकार आणि आवाजही लहान होता. एकदा त्याला जेनच्या तंबूत बिस्किटांचा पत्र्याचा रिकामा डबा सापडला. तो घेऊन डेव्हिड बाहेर पळाला. डब्यावर हाताने ठोकत, उतारावर डबा घरंगळवत धावू लागला. स्वतःबरोबर सतत डबा बाळगणे आणि जंगलात घुमत राहील असा आवाज करत राहणे, यामुळे त्याला गटात पदोन्नती मिळाली. आता तो अधिकारक्रमात अव्वल गणला जाऊ लागला. डबा फुटून त्यातून घनगंभीर आवाज येणे बंद होईपर्यंत डेव्हिडचा अव्वल क्रमांक टिकला. नंतर मात्र त्याला पदावनती स्वीकारावी लागली. जेन या मानव असूनही गोम्बीतील चिम्पांझींनी त्यांचा स्वतःच्या टोळीत समावेश केला होता. सुमारे दोन वर्षे जेन एका टोळीतील सर्वांत शेवटच्या क्रमांकावरच्या अतिदुबळ्या चिम्पांझी-सदस्या होत्या.

व्यक्तिमत्त्व म्हणून अभ्यास

चिम्पांझींचा व्यक्ती म्हणून जेन यांनी अभ्यास केला. दोन प्रौढ व्यक्तींचे एकमेकांशी, आई आणि मुलाचे, भावंडांचे आपसांत, प्रौढ व्यक्तींचे गटात-सामाजिक वर्तन, चिम्पांझींच्या दोन गटांचे जमिनी क्षेत्रावर मालकी अधिकार राखतानाचे वर्तन अशा बाबींचे निरीक्षण आणि नोंदी जेन यांनी ठेवल्या. चाणाक्ष डेव्हिड, कपटी माईक, धीट गटप्रमुख गोलिथ, दांडगा हम्फ्रे, माणसाच्या मुलांवर माया करणारी गिगी मावशी, फ्लो माता आणि तिची मुले-फिगन, फेबन, फ्रॉइड, फिफी आणि फ्लिटं, जेन यांना टोळीतून हाकलून काढणारा फ्रोडो या चिम्पांझींचे वर्णन जेन यांनी केले आहे. जेन यांची हजारो टिप्पणे ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा’ने अभ्यासकांसाठी जपून ठेवली आहेत.


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.