बीड जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सुरुवात !

संयुक्त मोजणीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Total Views |

Shaktipeeth Highway 
 
बीड : ( Shaktipeeth Highway )  नागपूर - गोवा शक्तीपीठ शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या उभारणीला बीड जिल्ह्यातूनही गती मिळत आहे. राज्यभरात या महामार्गाच्या कामाला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतली आहे. या जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि परळी या दोन तालुक्यांमधून सुमारे ३८ किलोमीटर लांबीचा मार्ग जाणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जमिनींची संयुक्त मोजणी प्रक्रिया सध्या सुरू असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून या प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
 
बीड जिल्ह्यातून महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची मोजणी करताना शेतकरी स्वतःहून उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढली असून, जमीन संपादनाचे काम अधिक वेगाने आणि सुलभतेने पार पडत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार असून, अंबाजोगाई-परळी परिसराचा औद्योगिक, धार्मिक आणि वाहतूक क्षेत्रातील विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास स्थानिक पातळीवर व्यक्त केला जात आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे या भागातील आर्थिक, सामाजिक आणि पर्यटनदृष्ट्या मोठा बदल घडून येईल, अशी अपेक्षा देखील शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
 
याशिवाय, या महामार्गाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणारा एक आधुनिक आणि वेगवान मार्ग उपलब्ध होणार आहे. नागपूरपासून गोव्यापर्यंत जोडणारा हा महामार्ग बीड, लातूर, सोलापूर, सांगली, बीड या जिल्ह्यांमधून जात असल्याने या भागातील व्यापार, शेतीमाल वाहतूक, तसेच पर्यटन यांना प्रचंड चालना मिळेल. राज्य सरकारच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सक्रिय प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचे काम नियोजित गतीने पुढे सरकत आहे, आणि लवकरच या भागात विकासाची नवी दिशा निर्माण होणार आहे.
 
हेही वाचा : दिल्लीत पहिल्यांदाच पडणार कृत्रिम पाऊस! क्लाउड सीडिंग चाचणीसाठी तयारी पूर्ण
 
माझ्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. यासाठी माझ्या शेतजमिनीची संयुक्त मोजणी सुरु करण्यात आली आहे. या शक्तीपीठ महामार्गामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पाबाबत उपविभागीय अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांनी योग्य ती माहिती दिली. संयुक्त मोजणीबाबत समजावून सांगितले. यानंतर आम्ही संयुक्त मोजणीसाठी तयार झालो.
 
- लहूदास मुंडे, शेतकरी, वरवटी, बीड
 
माझ्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून त्याच्या जमिनीची संयुक्त मोजणीची सुरुवात झाली असून आम्हा शेतकऱ्यांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. ग्रामपंचायती मध्ये येऊन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यासाठी अनेक बैठका घेतल्या. शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. शेतकऱ्यांनी नक्कीच या महामार्गाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे आणि या प्रकल्पाचे स्वागत करावे.
- सुलेमान खान पठाण, शेतकरी, पिंपळा धायगुडा, बीड
 
 
शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील जनतेसाठी दळणवळणाच्या दृष्ठीने अत्यंत महत्वाचा मार्ग ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक शेतकरी म्हणून माझा या महामार्गाला पूर्ण पाठींबा आहे. आमच्या गावात जमिनीची संयुक्त मोजणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सर्व शेतकऱ्यांना विश्वासात देखील घेतले. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना या प्रक्रियेत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील हा मार्ग सोयीचा असल्याने याच्या प्रक्रियेसाठी नक्कीच सहकार्य करावे.
 
- विठ्ठल मोरे, शेतकरी, पिंपळा धायगुडा, बीड
 
शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी संयुक्त जमीन मोजणीचे काम प्रगतीपथावर आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ८ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या २४६ हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया करावी लागणार आहे. संयुक्त जमिनीची प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना याबाबत समजावून सांगितले. ज्या शेतकऱ्यांना शंका होत्या त्यांचे आम्ही निरसन केले आणि प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच या प्रक्रियेत अनेक शेतकरी असे भेटले की ज्यांनी स्वतःहून सांगितले की, आम्ही या प्रक्रियेत स्वतःहून सहभागी होतो. आणि त्यांनी जमीन मोजणीसाठी सकारात्मकता दर्शविली.
 
- दीपक वजाळे, उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई, बीड
 
बीड जिल्ह्यातून परळी आणि अंबाजोगाई या तालुक्यांतून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. सुमारे ३८ किलोमीटर लांबीचा भाग बीड जिल्ह्यातून जात आहे. यासाठी जिल्ह्यात जमिनीच्या संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी या कामामध्ये सहकार्य करत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील ८ पैकी ५ गाव आणि परळी तालुक्यातील एक गावाची संयुक्त मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित गावातील संयुक्त मोजणीचे काम प्रगतीपथावर आहे. सर्व शेतकऱ्यांना अधिकाधिक आणि पारदर्शक पद्धतीने मोबदला देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
-विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.