गुळाला मुंगळा चिटकून बसं...

Total Views |

अनेक देशांच्या सीमेचा भाग असलेल्या भूप्रदेशाचा काहीही वापर तो देश करत नाही. मात्र, अशा भूप्रदेशात काहीही उगवत नाही म्हणून तो प्रदेश दुसऱ्या देशाला दान देण्याचा प्रसंग जागतिक इतिहासात एकच म्हणावा लागेल. इतर सर्वच देश त्यांच्या सर्व भूप्रदेशाच्या इंच इंच भागाला डोंगळ्यासारखे चिकटून बसतात.

शाहीर वामनदादा कर्डक यांचे एक फार लोकप्रिय गीत आहे, ‌‘यो यो यो पाव्हणा, सखूचा मेव्हणा, तुझ्याकडं बघून हसतोय गं, काहीतरी घोटाळा दिसतोय गं.‌’ संगीतकार मधुकर पाठक यांनी चालीत बांधलेले आणि श्रावण यशवंते यांनी गायलेले हे गीत, गेली किमान 50 वर्षे अत्यंत लोकप्रिय आहे. याच्या एका कडव्याच्या ओळी आहेत, ‌‘गुळाला मुंगळा चिटकून बसं, मेतकूट तुमचं जमलंय तसं.‌’ हल्ली शहरी जीवनात गूळ आणि त्याला चिकटलेला मुंगळा हे दृश्य दिसतच नाही, पण पूव हे दृश्य सर्रास असे. संतांनीही विविध भौतिक इच्छा आकांक्षांनी लिप्त झालेल्या माणसाच्या मनासाठी, गुळाला चिकटलेला मुंगळा ही उपमा वापरलेली आहे. गुळाला चिकटलेला मुंगळा ओढून काढला तर तुटतो, पण गुळावरची पकड काही सोडत नाही; तसेच मानवी मनही काय वाटेल ते झाले तरी, सांसारिक मोहांपासून बाजूला हटतच नाही. त्याला त्या मोहांपासून सोडवण्याचा एकच मार्ग म्हणजे श्रीहरीचे नामस्मरण, असे संत सांगतात.

शिवछत्रपती आपल्या आज्ञापत्रामध्ये, युरोपीय व्यापाऱ्यांबद्दल आपल्या सरदारांना असाच इशारा देताना आढळतात. या युरोपीय गोऱ्या व्यापाऱ्यांना इथे स्वराज्यात फक्त व्यापारच करायचा नसून, राज्यविस्तार करायचा आहे. त्यांच्या त्यांच्या देशी त्यांचे राजे आहेत. त्यांचे राज्य इथे स्थापन करणे हा टोपीकरांचा अंतस्थ हेतू आहे. तेव्हा यांना समुद्रकिनारी, नदीकाठी पक्का ठिकाणा, बुरुजबंद, कोटबंद, बांधकाम करण्यास कधीही परवानगी देऊ नये, अन्यथा तेवढे ठिकाण आपल्या राज्यातून कायमचे गेले असे समजा; असा सक्त इशारा शिवछत्रपतींनी दिलेला आहे.

हा इशारा किती अचूक होता, याचे प्रत्यंतर आज 300 वर्षांनंतरही आपल्या डोळ्यांसमोर आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ही दलदलयुक्त, खाजणांनी भरलेली, रोगट हवामानाची ठिकाणे इंग्रजांनी पक्की धरून ठेवली आणि ती इतकी पक्की बनवली की, आज स्वतंत्र भारतातही तीच तीन महानगरे सर्व क्षेत्रांत अग्रेसर आहेत.

असो, तर मिळेल तो जमिनीचा तुकडा पार्श्वभागाखाली घट्ट धरून ठेवायचा, ही सवय इंग्रजांनाच नव्हे; तर सगळ्याच युरोपीय लोकांना आहे असे दिसते. रशियाचे क्षेत्रफळ साधारण 17 लाख, 75 हजार चौ.किमी आहे. तरीही त्याला युक्रेन देश हवा आहे. हेदेखील आपण एकवेळ समजू शकतो, कारण युक्रेन हा संपूर्ण युरोप खंडाचे गव्हाचे कोठार असलेला देश मानला जातो. पण स्वतःची अवाढव्य भूमी असूनही, रशियाला आर्क्टिक समुद्रातल्या स्पिट्सबर्गेन ऊर्फ स्फालबार या द्वीपसमूहाची चतकोरभर जमीन सोडवत नाही. स्फालबार हा द्वीपसमूह उत्तर ध्रुव प्रदेशापासून जवळ असल्यामुळे सदैव बर्फाच्छादित असतो. त्यामुळे साहजिकच तिथे ध्रुवीय पांढरी अस्वले, व्हेल मासे, हिमकोल्हे आणि रेनडिअर हे प्राणी विपुल प्रमाणात आढळतात. स्फालबार द्वीपसमूहाचे एकंदर क्षेत्रफळ 37 हजार, 600 चौ.किमी आहे. इ.स. 1596 मध्ये डच दर्यावद विल्यम बेरेंटस्‌‍ याने नॉर्वे देशाच्याही उत्तरेकडे प्रवास करीत, हा द्वीपसमूह शोधून काढला होता. म्हणून आर्क्टिक महासागराच्या या भागाला ‌‘बेरेंट्स समुद्र‌’ हेच नाव पडले आहे. रशिया आणि नॉर्वे या दोन देशांची किनारपट्टी बेरेंट्स समुद्रावर येते. 17व्या आणि 18व्या शतकात युरोपीय देशांनी, स्फालबार द्वीपसमूहांमध्ये मनसोक्त व्हेल शिकारी केल्या. 19व्या शतकात इथल्या बर्फाखालच्या जमिनीत कोळशाच्या खाणी मिळाल्या. 20व्या शतकाच्या सुरुवातीला पहिले महायुद्ध झाले. त्याच्या शेवटी विजेत्या देशांनी संपूर्ण जगाचीच वाटणी, आपल्याला फायदे शीर अशीच करून घेतली. 1920 सालच्या स्पिट्‌‍सबर्गेन करारानुसार, स्फालबार द्वीपसमूहावर नॉर्वे देशाची मालकी असल्याचे मान्य करण्यात आले. पण तिथे कोळशाची खाण किंवा व्हेल मासेमारी करण्याचा हक्क सर्वच युरोपीय देशांना असल्याचे ठरवण्यात आले. प्रत्यक्षात नॉर्वे आणि रशियानेच तिथे कोळशाच्या खाणी सुरू ठेवल्या. कारण अन्य युरोपीय देशांना स्फालबार बेटे फार लांब पडतात.

परवा दि. 14 ऑगस्ट 2025 या दिवशी स्पिट्‌‍सबर्गेन करार प्रत्यक्ष लागू झाला, या घटनेची शताब्दी साजरी झाली. आज 100 वर्षांनंतर स्फालबार कोळसा खाणींमधले, कोळशाचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. म्हणजे नॉर्वेच्या ‌‘स्टोर नॉर्वे‌’ या कोळसा कंपनीने कोळसा खणणे सुरू ठेवले आहे, पण रशियाच्या ‌‘आर्क्टिकुगोल‌’ या कंपनीने 2007 पासून अत्यल्प उत्पादन केले आहे. असे का? तर रशियाचे म्हणणे असे की, स्फालबारच्या खाणींमधून कोळसा काढून तो रशियात वाहून नेणे किंवा अन्य देशांना विकणे, हे सध्याच्या काळात किफायतशिर राहिलेले नाही. सहाजिक आहे, खुद्द रशियात आणि रशियाच्या मध्य आशियातल्या मित्र राष्ट्रांमध्ये तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे नवेनवे साठे सापडले आहेत, सापडत आहेत. त्यामुळे कोळसा खाणी आता पूवइतका फायदा देत नाहीत. पुुन्हा कोळसा जाळल्याने पर्यावरणाची जी काही हानी होते, त्याबद्दल जगभर सर्वत्रच बोंबाबोंब सुरू असल्यामुळे कोळशाचा इंधन म्हणून वापर घटलाच आहे.

मग ‌‘आर्क्टिकोगुल‌’ कंपनीचा गाशा गुंडाळा आणि ती भूमी नॉर्वे देशाच्या ताब्यात देऊन मोकळे व्हा ना! छे छे! असा निर्णय घ्यायला पुतीन सरकार म्हणजे काही नेहरू सरकार नव्हे. आपण हे ऐकले किंवा वाचलेच असेल की, उत्तर धु्रवावर भारतीय वैज्ञानिकांनी एक कायम स्वरुपी विज्ञान संशोधन केंद्र उभे केलेले असून, त्याला ‌‘हिमाद्रि स्थानक‌’ असे नाव आहे. हे हिमाद्रि स्थानक उत्तर धु्रवावर म्हणजे अगदी धु्रव बिंदूवर नसून, याच स्फालबार द्वीपसमूहावर आहे. तशीच पोलंडची ‌‘पोलिश पोलर स्टेशन‌’ आणि चीनची ‌‘आर्क्टिक यलो रिव्हर स्टेशन‌’ ही संशोधन केंद्रेही, स्फालबारवरच कार्यरत आहेत. ती नॉर्वे देशाच्या अधिकृत परवानगीनेच चालू आहेत. अशा स्थितीत रशिया गाशा गुंडाळून घरी कसा जाईल? स्फालबार बेटामधल्या बेरेंट्‌‍सबर्ग शहराची लोकसंख्या मुळात फक्त दोन हजार होती. ती आता 340 पर्यंत घसरली आहे. तिथल्या प्रयोगशाळांमध्ये एके काळी रशियन शास्त्रज्ञांबरोबर, जर्मन आणि नॉर्वेजियन शास्त्रज्ञही होते आता फक्त रशियन्स आहेत? पण मग ते काय करत आहेत तिथे? पृथ्वीच्या अति उत्तर भागातील एकमेव गगनचुंबी इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका चार मजली इमारतीतून, संपूर्ण बेरेंट्‌‍स समुद्रावर लक्ष ठेवून आहेत. म्हणजे आले ना लक्षात? यालाच म्हणतात, ‌‘गुळाला मुंगळा चिटकून बसं!‌’

संघ गीतांची मोहिनी

इतिहास काळात मराठी साहित्यात तीन प्रकारच्या काव्याने राज्य केले, संत काव्य, पंत काव्य आणि तंत काव्य. ज्ञानोबा, नामदेव, तुकोबा हे संत कवी, वामन पंडित, मोरोपंत हे पंत कवी, तर शाहीर परशुराम, रामजोशी इत्यादी लोक हे तंत कवी. त्यांच्यानंतर ‌‘आधुनिक युगातले पहिले कवी‌’ असा मान केशवसुतांना दिला जातो.

या आधुनिक कवींच्या काव्यात प्रेमकविता जरा जास्तच दिसते. स्वातंत्र्यानंतर तर कविता म्हणजे प्रेकविताच, असा एक प्रघातच जणू पडला. कवींनी समाजाला रगेल बनवण्याऐवजी रंगेल बनवले. पुरुषाथ बनवण्याऐवजी लंपट बनवले.

अशा विपरीत स्थितीत रा. स्व. संघाच्या शाखेवर म्हटल्या जाणाऱ्या कविता किंवा पद्ये किंवा गीते, ही नेहमीच गाणाऱ्यांना-ऐकणाऱ्यांना सकस, बलशाली, तेजस्वी जीवनाचा संस्कार देणारी राहिलेली आहेत.

संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. विजय कुमारजी यांनी, संघगीतांचे काही गमतीदार किस्से सांगितले. 1975च्या आणीबाणीत स्वतः विजय कुमारजी मेरठ तुरुंगामध्ये बंदी होते. संघ कार्यकर्ते, नक्षलवादी, आनंदमाग, सर्वोदयी अशा विविध कार्यकर्त्यांना, इंदिरा विरोधी म्हणून एकत्रच तुरुंगात डांबण्यात आले होते. संघ कार्यकर्त्यांनी तुरुंगातच रोज संध्याकाळी शाखा लावायला सुरुवात केली. वरील सर्व संघटनांचे कार्यकर्ते, कबड्डी किंवा अन्य खेळ खेळण्यासाठी उत्साहाने शाखेवर यायचे. शाखेवर व्यायाम, खेळ यांच्याप्रमाणेच गीत हे व्हायचेच. एक दिवस एका कार्यकर्त्याने एक जबरदस्त गीत सुरू केले.

‌‘नेत्र तीसरा, पलभर यदि, शंकर क्रोधी खोलेंगे|
रौद्र रूप धर, चंद्रहास ले, असुर शक्ति को तोलेंगे|
शत्रू रक्त को पीकर अपनी पूर्ण प्रतिज्ञा कर लेंगे|
तांडव नृत्य दिखाएंगे, स्वयं काल बन जाएंगे॥‌’

गीताचे बोलच असे आहेत की, म्हणताना सगळ्यांना भलताच आवेश चढला. मग असे ठरले की, हे गीत आता आठवडाभर म्हणायचे. हा निर्णय ऐकून सर्वोदयी कार्यकर्ते घाबरले आणि म्हणाले, “आम्ही नाही रे बाबा आठवडाभर शाखेवर येणार.” तर नक्षली कार्यकर्ते भलतेच खूश झाले आणि आठवडाभर अगदी जोरजोरात हे गीत म्हणून, त्यांनी तुरुंग दुमदुमून सोडला.

1983 सालच्या उन्हाळ्यातला किस्सा. पश्चिमी उत्तर प्रदेश क्षेत्रातील बरेली शहरात संघशिक्षावर्ग सुरू झाला. शहराच्या एका मोठ्या रस्त्याला लागूनच संघस्थान होते. वर्गात एका संध्याकाळी मारामारीचे, आरडाओरड्याचे, धमाल मस्तीचे खेळ असे एक सत्र होते. मग काय विचारता! एक गण नौकायुद्ध खेळ खेळतोय, दुसरा गण भुतांची दरी खेळ खेळतोय, तिसरा गण वाघ-बकरी खेळ खेळतोय, चौथा गण ‌‘ये दिल्ली किसकी हैं‌’ हा खेळ खेळतोय. संपूर्ण संघस्थान दणादण पावलांचे आवाज; पाठीत मारलेल्या धपाट्यांचे आवाज, ‌‘अरे, मारो पकडो, खींचो, यह दिल्ली हमारी हैं,‌’ अशा तारस्वरातला गर्जना, बाद होऊन जमिनीवर पडलेल्या स्वयंसेवकांचे उगीचच ओरडणे, त्यांना बाद करणाऱ्यांचे त्यांच्या दुप्पट आवाजात हसणे-खिदळणे; धावण्या-पळण्याने मैदानभर उसळलेली धूळ, शिक्षकांनी बाद किंवा फाऊल म्हणून जोरजोरात मारलेल्या शिट्ट्या अशा विविध आवाजांनी तो सगळा आसंमत नुसता कोंदून गेला.

मुख्य रस्ता बाजूलाच असल्यामुळे जाणारे-येणारे पादचारी, सायकलवाले, रिक्षावाले, सगळे मैदानाच्या कडेला थांबून, या धुमाकुळाचा आनंद लुटत होते. पण रानदांडग्या खेळांमध्येसुद्धा आनंद असतो, उत्साह असतो, हे माहीतच नसलेले काही चिंतातूर जंतू होतेच. ते सरळ शहराच्या मुख्य कोतवालीत म्हणजे मुख्य पोलीस स्टेशनात गेले आणि त्यांनी खबर दिली की, अमूक ठिकाणी संघवाल्यांनी दंगा चालू केला आहे. आता खरे म्हणजे संघशिक्षावर्ग रीतसर परवानगी घेऊन सुरू झालेला होता, त्यामुळे शहर कोतवालीत ती माहिती होतीच. पण कुणीतरी दंग्याची खबर दिली म्हटल्यावर, पोलीस मंडळी वर्गाच्या मैदानावर येऊन थडकली.

तोपर्यंत खेळांचे सत्र संपले होते आणि सांघिक गीत सुरू झाले होते. मघाशी मनसोक्त दणकादणकी करणारे शिक्षाथ आता गात होते,

‌‘शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार हैं|
दिव्य ऐसे प्रेम में ईश्वर स्वयम्‌‍ साकार हैं॥‌’

दंग्याचा तपास करायला आलेले फौजदार साहेब आणि त्यांची पोलीस पाट यांनी, गीताचा आनंद घेतला आणि खो खो हसत कोतवालीत परतले.

- मल्हार कृष्ण गोखले

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.