बीड : ( Beed Case ) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असताना आता बीड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हवेत गोळीबार करून त्याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यामध्ये कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे.
कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे या तिघांचे बीडमध्ये हवेत गोळीबार करतानाचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर जिल्ह्यातील १२८१ शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. कुणालाही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २३२ जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. या सर्वांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली. यातील ७१ जणांचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द केला आहे. तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरु आहे. आतापर्यंत ३०३ परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गरज नसताना घेण्यात आलेल्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच झटका दिला आहे.