बीड : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, बुधवार, १५ जानेवारी रोजी परळीमध्ये व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.
या बंददरम्यान, परळीतील संपूर्ण बाजापेठ बंद ठेवण्यात आली असून वाल्मिक कराड समर्थकांची एक बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यासोबत परळी महामार्गावर कराड समर्थकांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे. अनेक तरूण मोबाईल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत.
वाल्मिक कराडवर मंगळवारी मकोका कायदा लावण्यात आला आहे. तसेच त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतले आहे असून बीड जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे.