राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त!
15-Jan-2025
Total Views |
बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ माजली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय खंडणीप्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडवरही हत्येचा कट रचल्याचा आरोप करत मोक्का दाखल करण्यात आला आहे. हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेमुळे ही जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित अनेक लोकांचे नाव आले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचा मुख्य आरोपींमध्ये समावेश आढळल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांची निवड होईपर्यंत राजेश्वर चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच यापुढे तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणूक करताना त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.