संतप्त मस्साजोगकरांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा, वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी!

    13-Jan-2025
Total Views |

beed
 
बीड : (Santosh Deshmukh) बीड-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला मात्र अद्याप या प्रकरणातील एका आरोपी फरार आहे. तसेच अटकेत असणाऱ्या इतर आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने संतप्त मस्साजोगकरांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
१४ जानेवारीला सामूहिक आत्मदहनाचा इशारा
 
या हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समाविष्ट करा व इतर आरोपींप्रमाणे त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी देशमुख कुटुंबिय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी उचलून धरली आहे. यासाठी देशमुख कुटुंबांसह मस्साजोगचे ग्रामस्थ आज आंदोलन करणार आहे. आज, सोमवारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यानंतर मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलनात संतोष देशमुख कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. तर, १४ जानेवारीला सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
 
तर मी माझं आयुष्य संपवणार...
 
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. संतोष देशमुख प्रकरणातून कोणाला तरी वाचविण्यात येतेय काय? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील आरोपी सुटले तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबियांना संपवण्यात येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपणच मोबाइल टॉवरवर चढून वरून खाली उडी मारून आपले जीवन संपवण्याचा निर्णय आपण गांभीर्यपूर्वक व विचारपूर्वक घेतल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
 
काय आहेत मस्साजोगकरांच्या मागण्या?
 
१) वाल्मिक कराडला ३०२ चा आरोपी करण्याची व संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्याला सहआरोपी करावी.
२) इतर आठ आरोपींप्रमाणे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी.
३) मोकाट फिरणाऱ्या फरार आरोपी कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करावी.
४) सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम किंवा अ‍ॅड. सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी.