घननिळ्या सागराशी मैत्री जपणारा ‘रत्नागिरी सागर महोत्सव’ दि. ९ जानेवारी ते दि. १२ जानेवारीदरम्यान रत्नागिरीत संपन्न झाला. यावेळी रत्नागिरीच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयामध्ये सागरप्रेमींची जमलेली जंत्री पाहायला मिळाली. आधुनिक अर्थव्यवस्था आणि मानवी स्वास्थ्य यात सागराचे मोठे योगदान आहे. पण या गोष्टीची जाणीव सर्वसाधारण माणसांना असतेच, असे नाही. किंबहुना, समुद्रापासून दूर राहणाऱ्या नागरिकांना तर याची माहितीसुद्धा नसते. सागरी परिसंस्था आणि त्याचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत नेणे आणि त्यातून संवर्धन कार्याची प्रेरणा देणे, याच ध्येयातून तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात ’आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशन’कडून ’सागर महोत्सवा’ची सुरुवात करण्यात आली.
सागराशी मैत्री साधत ’आसमंत’ त्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांहून अधिक प्रयत्न करत आहे. यंदाच्या सागर महोत्सवाला ’एमआयडीसी’ यांचे प्रमुख प्रायोजकत्व मिळाले होते, तर या महोत्सवासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय-रत्नागिरी, मत्स्य महाविद्यालाय-रत्नागिरी, ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था-गोवा’, ’गोखले इन्स्टिट्यूट’, ‘सेंटर फॉर ससस्टेनेबल डेव्हलपमेंट-पुणे’, ‘इकॉलॉजिकल सोसायटी-पुणे’, ‘कोस्टल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन-मुंबई’ आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ यांचा तांत्रिक सहभाग मिळाला होता. यंदा महोत्सवामध्ये रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तर उपस्थित होतेच, सोबतच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय आणि सिंधुदुर्गातील नेरुर येथील आयडियल इंग्लिश मिडियम इको स्कूलच्या विद्यार्थ्यांनीदेखील उपस्थिती लावली होती. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. के. काथीरेसन यांचे मुख्य भाषण झाले. त्यानंतर श्रीनिवास पेंडसे यांचे ‘महासागराचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रवचन, ‘एनआयओ’चे शास्त्रज्ञ डॉ. समीर डामरे यांचे ‘सागरी बुरशी’ आणि डॉ. नरसिंह ठाकूर यांचे ‘बायोप्रॉस्पेकटिंग’ या विषयावर व्याख्यान पार पडले. त्यानंतर ‘अरबी समुद्रातील चक्रीवादळे’ या विषयी डॉ. मेधा देशपांडे यांचे मार्गदर्शन झाले. महोत्सवाच्या दुसर्या दिवशी म्हणजे दि. १० जानेवारी रोजी प्रसिद्ध लेखक आणि इतिहास अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांचे ‘सागरी किल्ला आणि जैवविविधता’ या विषयी भाषण झाले. ‘एनआयओ’चे डॉ. सुहास शेट्ये, प्राची हाटकर आणि सतिश खाडे यांची व्याख्याने पार पडली. दि. ११ जानेवारी रोजी डॉ. विशाल भावे यांचे ‘समुद्री गोगलगायी’, डॉ. सायली नेरुरकर यांचे ‘सागरी जैवविविधता’ आणि पूजा साठ्ये यांचे ‘सागरी प्रदूषण’ या विषयावरील व्याख्यान पार पडले. महोत्सवाच्या दुसर्या आणि तिसर्या दिवशी प्रदीप पाताडे आणि डॉ. अमृता भावे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वालुकामय आणि खडकाळ किनार्यावर अभ्यास फेरी पार पडली, तर दि. १२ जानेवारी रोजी डॉ. हेमंत कारखानीस यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत कांदळवन सफारी करून महोत्सव संपन्न झाला.
विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती
’आसमंत सागर महोत्सव २०२५’ खूप यशस्वी झाला. सागर आणि परिसंस्था या विषयातील तज्ज्ञांनी उपस्थित श्रोत्यांना उत्तम मार्गदर्शन केले. महत्त्वाचे म्हणजे यावेळी श्रोत्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. पुणे, सिंधुदुर्ग, मुंबई आणि रत्नागिरी येथील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी ‘सागर महोत्सवा’त नेटाने उपस्थित होते. व्याख्यानाच्या माध्यमातून श्रोत्यांना सागरी प्रदूषण, वादळांची परिस्थिती, जैवविविधता, पर्यटन अशा विविध स्तरांवरील माहिती मिळाली, तर कांदळवन सफर आणि किनारा फेरीच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून मिळालेली माहिती त्यांना प्रत्यक्ष पाहता आली.
- नंदकुमार पटवर्धन, आयोजक
मुले समुद्रसाक्षर झाली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरुर येथील ’आयडियल इंग्लिश मिडियम इको स्कूल’ शाळेतील निवडक मुलांनी ‘रत्नागिरी सागर महोत्सवा’ला उपस्थिती लावली. या महोत्सवामुळे मुले समुद्रसाक्षर झाली. कारण, त्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि संशोधकांना भेटण्याची संधी मिळाली. समुद्र हा अभ्यास करण्याची जागा आहे, याची जाणीव मुलांबरोबरीनेच शिक्षकांनादेखील झाली. तीन दिवस समुद्र आणि किनारी परिसंस्थेच्या वेगवेगळ्या अधिवासांमध्ये पार पडलेल्या अभ्यास फेर्यांमुळे त्यांना सागरी जीव प्रत्यक्ष पाहून त्याची माहिती घेण्याची संधी मिळाली.
- डॉ. नंदिनी देशमुख, ट्रस्टी, नेरुर समृद्ध प्रतिष्ठान
‘आंग्रे बँक’चा युद्धात उपयोग
विजयदुर्गाजवळील समुद्री प्रदेशातून जाताना पाश्चात्यांच्या जहाजांवरील तोफांची तोंडे विजयदुर्गाकडेच वळवलेली असत. या पूर्वाभिमुख तोफांना पश्चिमेकडून सागरी हल्ला झाला, तर परत पश्चिमेकडे तातडीने तोंड वळवणे अशक्यच असे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन मराठा आरमार विजयुदुर्गपासून १०० किमी अंतरावर आत समुद्रात उंचवट्याचा प्रदेश असणार्या ‘आंग्रे बँक’वर ठिय्या मांडून बसत. आता पाश्चात्यांचे जहाज किंवा जहाजांचा कफिला विजयदुर्गाच्या समुद्रात आल्यावर त्याला चाहूल लागू न देता, ही ‘आंग्रे बँक’वरील मराठा युद्धसज्ज जहाजे त्वरेने त्या जहाजांवर पश्चिमेकडून येऊन हल्ला करत.
- प्र. के. घाणेकर, वनस्पती इतिहास अभ्यासक
जनजागृतीची गरज
पुण्यातील ’इकॉलॉजिकल सोसायटी’ने राबवलेल्या ‘कोस्टल २.०’ या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधून सागरी सूक्ष्म जीवांच्या ५५० हून अधिक प्रजातींच्या नोंदी केल्या आहेत. यामध्ये वेगवेगळे प्रकारचे शंख, शिंपले, समुद्री गोगलगायी, कंठकचर्मी जीव अशा प्रजातींचा समावेश आहे. यामधील काही प्रजाती या भारतात किंवा महाराष्ट्रात प्रथमच आढळून आल्या आहेत. जैवविविधता नोंदीबरोबरच कोकणातील किनारी भागातील स्थानिकांचा या विविधतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याची माहिती देखील आम्ही मुलाखतीच्या माध्यमातून घेतली.
- डॉ. सायली नेरूरकर, संशोधक, इकॉलॉजिकल सोसायटी
अधिवासानुरूप प्रजाती
उत्क्रांतीच्या प्रक्रियेत समु्द्री गोगलगायींनी आपल्या पाठीवरच्या शंखाचा त्याग केला. कारण त्याला विविध सूक्ष्म अधिवासांमध्ये राहणे आवश्यक होते. काही समुद्रगायी या काही इंचाच्या किंवा फूटभर असणार्या समुद्री शेवाळ किंवा हायड्रोईजवर अन्नग्रहण करतात. अशा फूटभर किंवा काही इंचाच्या समुद्री शेवाळावर जर त्या शंखासोबत चढल्या, तर ते शेवाळ खालच्या दिशेला लवू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या अधिवासात राहण्यासाठी काही समुद्री गोगलगायींच्या पाठीवर शंख नाही. भरती-आहोटीदरम्यान असणार्या विविध सूक्ष्म अधिवासामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या समुद्री गोगलगायी अधिवास करतात.
- विशाल भावे, समुद्री गोगलगायींचे संशोधक
समुद्री गाय संकटात
‘डुडॉग’ म्हणजेच समुद्री गाय हा एकमेव शाकाहारी सागरी सस्तन प्राणी ‘संकटग्रस्त’ आहे. ही प्रजात भारतात गुजरातमधील कच्छचे आखात, तामिळनाडूमधील मन्नारचे आखात आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूहाच्या सागरी परिक्षेत्रामध्येच आढळून येते. २०१२ च्या सर्वेक्षणानुसार भारतात केवळ २०० समुद्री गायी राहिल्याच्या निष्कर्ष समोर आला होता. २०१५ पासून ‘भारतीय वन्यजीव संस्थान’मार्फत या तिन्ही प्रदेशात मच्छीमार आणि स्थानिकांच्या मदतीने संवर्धनाचा प्रकल्प सुरू आहे. ज्यामध्ये सर्वेक्षण, भरपाई योजना, जनजागृती अशा काही उपक्रमांचा समावेश आहे.
- प्राची हाटकर, सागरी अभ्यासक, भारतीय वन्यजीव संस्थान