ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! संजय राऊतांचं हेच काम!
शिवसेना खासदार नरेश म्हस्केंची टीका
20-Sep-2024
Total Views |
मुंबई : ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी हेच संजय राऊतांचं काम आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. संजय राऊत राजकारणात अनपढ आहेत, असेही ते म्हणाले. बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
नरेश म्हस्के म्हणाले की, "संजय राऊत ही अतिशय खोटारडी व्यक्ती आहे. बदलापूरची शाळा ही श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात आहे, असा आरोप त्यांनी केला. पण ती शाळा कुठे आहे याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांनी घ्यावी. ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघात बदलापूर येथे आहे. बदलापूर हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. संजय राऊत राजकारणात अनपढ आहेत. कुठलीही माहिती न घेतला ते केवळ आरडाओरड करतात. ते नोकरी उबाठाची करतात आणि चाकरी शरद पवारांची करतात," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "भिवंडीमध्ये शरद पवार गटाचा खासदार आहे. त्याची पाठराखण करण्यासाठी राऊत असं वक्तव्य करतात. केवळ खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे. काही गोष्टी माहिती घेऊन बोलायच्या असतात. केवळ प्रसिद्धीमाध्यमांचे माईक चेहऱ्यासमोर आल्यावर तोंडात येईल ते बोलायचं, ही त्यांची पद्धत आहे. खुर्चीकरिता तुम्ही लाचार झाले आहात. आम्हाला कुणी मुख्यमंत्री बनवता का? असं त्यांचं सुरु आहे. काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा आघाडीतून बाहेर पडा. एवढा अपमान का सहन करताय? खुर्चीसाठी किती लाचारी पत्करणार?" असा सवालही नरेश म्हस्केंनी राऊतांना केला आहे.