मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Thailand Ganeshotsav) विश्व हिंदू परिषद थायलंडने बँकॉकच्या मध्यभागी असलेल्या निमुबित्र एरिना येथे गणेशोत्सव साजरा केला. विहिंप थायलंडचे उपाध्यक्ष देव के. सिंह यांनी पट्टायाच्या भारतीय समुदायाच्या सहकार्याने येथील गणेशोत्सव सोहळा आयोजित केला होता. दि. १६ सप्टेंबर रोजी जड अंतःकरणाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भारतीय, थाई आणि इतर मंडळी भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या या सोहळ्यात मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.
हे वाचलंत का? : रा.स्व.संघाच्या 'बाल ऑलिम्पिक' स्पर्धेला मोठा प्रतिसाद
विहिंप थायलंडने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामुदायिक सेवा उपक्रमांसह हा आनंदोत्सव साजरा केला. सांस्कृतिक वारसा, सामुदायिक भावना, एकता व सद्भावना या मूल्यांना प्रोत्साहन देणे हे या उत्सवांचे उद्दिष्ट आहे. या सोहळ्यात भारत, श्रीलंका, तिमोर-लेस्ते यांच्या दुतावासाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी पट्टायाचे महापौर, मुख्य जिल्हा दंडाधिकारी (डीएम) आणि पट्टाया सिटी कौन्सिलचे इतर सदस्य तसेच थायलंडमधील उच्च व्यवसायांचे स्थानिक प्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती होती.
दरम्यान 'गणेशोत्सवाचे महत्त्व आणि हिंदू विधी' या विषयावर शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात आल्या. उत्सवाच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पैलूंची सखोल माहिती मिळवणे हा यामागचा उद्देश होता.