मुंबई : पश्चिम बेंगळुरूमधून एक रंजक बातमी समोर आली आहे. एका शिक्षक कुटुंबाने तब्बल ४ लाख रुपये किमतीची ६० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन घरात स्थापना केलेल्या गणेश मूर्तीला घातली होती, मात्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी ते ती चैन काढून घेण्यास विसरले आणि त्यांनी तसेच मूर्तीचे विसर्जन केले. जेव्हा विसर्जनानंतर सोन्याची चैन काढण्याचा आपल्याला विसर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी लगेच चैनीचा शोध सुरू केला. १० तासांच्या शोधकार्यानंतर अखेर ती सोन्याची चैन सापडली. या कालावधीत सुमारे १० हजार लिटर पाणी पंपच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.
विजयनगर येथील दसरहल्ली सर्कल परिसरात ही घटना घडली असून गोविंदराजनगरजवळील माचोहल्ली क्रॉस येथे राहणाऱ्या रमाय्या आणि उमादेवी या शिक्षक जोडप्याने त्यांच्या घरात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यांनी मूर्तीला सोन्याची चैन घातली होती. पूजा झाल्यानंतर रात्री सव्वा नऊच्या सुमारास ते मूर्ती कृत्रिम टाकीत विसर्जित करण्यासाठी घेऊन गेले. मात्र, तेव्हा ती सोन्याची चैन काढण्याचा त्यांना विसर पडला.
रात्री दहाच्या सुमारास घरी परतल्यावर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. रात्री साडे दहा वाजता ते पुन्हा त्या कृत्रिम टाकीजवळ पोहोचले आणि विसर्जनासाठी नेमलेल्या तरुणांकडे सोन्याच्या चैनीबाबत विचारपूस केली. उमादेवी म्हणाल्या, 'मुलांनी आम्हाला सांगितले की त्यांनी मूर्तीवरील चैन पाहिली होती परंतु त्यांना ती खोटी वाटली म्हणून त्यांनी चैनीसह मूर्तीचे विसर्जन केले.'
उमादेवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मगडी रोड पोलिसांना याबाबत कळवले आणि गोविंदराजनगरचे आमदार प्रिया कृष्णा यांनाही झालेल्या घटनेविषयी माहिती दिली. या कुटुंबियांनी आ. कृष्णा यांना तसेच पोलिसांना चैन शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
आ.कृष्णा यांनी दसरहल्ली सर्कल येथे कृत्रिम टाक्या बसवणारे कंत्राटदार लंकेश डी यांच्याशी बोलून चैनीचा शोध घेऊन ती उमादेवींना परत करण्यास सांगितले. तलावावर उपस्थित असलेल्या मुलांनी रात्री बराच वेळ टाकीमध्ये शोध घेतल्यानंतर उमादेवींना सकाळी येण्यास सांगितले. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी चैनीचा शोध घेण्यासाठी परवानगी मिळवली व रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पाणी उपसून चैनीचा शोध घेतला. परंतु काही केल्या चैन सापडत नव्हती. अखेर चैन परत मिळण्याची आशा सोडून देत ते घरी परतले.
लंकेश यांच्या म्हणण्यानुसार, आ. कृष्णा यांच्या निर्देशाप्रमाणे चैनीचा शोध घेण्यासाठी सकाळी ते पुन्हा टाकीकडे गेले आणि शोधकार्यासाठी त्यांनी १० लोकांना बोलावून घेतले. तलावात जवळपास ३०० मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती साचून दलदलीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच रविवारी सकाळी १० ते १२.३० वाजेपर्यंत त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी तलावातून ती चैन शोधून काढली. नंतर उमादेवी आणि रमाय्या यांच्याशी संपर्क साधून हस्तांतराची छायाचित्रे घेऊन ती चैन त्या जोडप्याला परत केली. यानंतर त्यांनी पोलीस आणि आ. प्रिया कृष्णा यांनाही याबाबत कळवले.
१० तासांच्या शोधानंतर दुपारी ही चैन सापडली. या शोधकार्यात सुमारे १०,००० लिटर पाणी बाहेर काढण्यात आले आणि मोठ्या कष्टाने मातीच्या ढिगाऱ्यामधून चैन शोधण्याचे काम केले.