मुंबई : दरवर्षी जास्तीत जास्त लोकांनी गणपतीच्या दर्शनासाठी येऊन मंडळाला भेट द्यावी म्हणून प्रत्येक गणेशोत्सव मंडळ काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात. जबलपूरमधील अशाच एका गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेशोत्सव मंडपाबाहेर चक्क हत्ती आणून उभा केला आहे. या गजराजाच्या दर्शनामुळे येणाऱ्या भाविकांनाही आनंद झाल्याचे पहायला मिळते.
जबलपूरच्या मालवीय चौकामध्ये जबलपूरचा महाराजा म्हणून या गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची ख्याती आहे. हे गणेशोत्सव मंडळ इतर मंडळांपेक्षा बऱ्याच गोष्टींमुळे वेगळे आहे. या मंडळाने यावर्षी भव्यदिव्य अशी गणपतीची मूर्ती बसवली असून ती मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे कारण ठरत आहे. येथील आकर्षणाचे केंद्र म्हणजे केवळ गणपतीची मूर्तीच नसून गणपतीच्या रूपात मंडपाबाहेर उभा असलेला गजराज रस्त्याच्या कडेला येणाऱ्याजाणाऱ्या लोकांना आशीर्वाद देताना दिसतो. ज्याला भाविक श्रद्धेने प्रसाद खाऊ घालतात आणि त्याचा आशीर्वाद घेतात.
माहूत शिवप्रसाद आपल्या या हत्तीसह टीकमगडहून जबलपूरला आले आहेत. त्यांना गणेशोत्सव मंडळाने पाचारण केले असून मंडपासमोर हत्तीला उभे करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंडपाबाहेर आपल्या हत्तीला अशा प्रकारे उभा करण्याची संधी शिवप्रसाद यांना पहिल्यांदाच मिळाली आहे. माहूत शिवप्रसाद म्हणतात की "गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक हत्तीची पूजा करत आहेत. त्यांचा हत्ती अतिशय शांत आहे आणि लोक त्यांच्या हत्तीची पूजा करून त्याला प्रसाद म्हणून केळी आणि ऊस खाऊ घालतात."
गजराजाला प्रसाद खाऊ घालण्यासाठी आलेली गणेशभक्त दिव्यांगिता सांगते की, "गणेश चतुर्थीच्या दिवशी पहिल्यांदाच गजराजाचे दर्शन तर झालेच पण त्याला प्रसाद खाऊ घालण्याचीही संधी मिळाली.गणेश दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या लहान मुलांना रस्त्यावर हत्ती दिसला की त्यांना खूप आनंद होतो आणि ते स्वतः हत्तीला स्वतःच्या हाताने प्रसाद खाऊ घालतात."