म्हाडा लोकशाही दिन! सर्वसामान्यांना मिळतोय तक्रार निवारणाचं हक्काचं व्यासपीठ
11-Sep-2024
Total Views | 28
मुंबई : म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना तक्रार निवारणाचे हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. 'म्हाडा'मध्ये आयोजित सहाव्या लोकशाही दिनात नऊ अर्जांवर सुनावणी पार पडली. या लोकशाही दिनात आलेल्या नऊ अर्जापैकी चार अर्ज मुंबई मंडळाशी संबंधित होते तर पाच अर्ज मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाशी संबंधित होते.
अर्जदार मिलिंद रेले यांचा सुमारे ३५ वर्षांपासून रखडलेला सदनिका नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी लोकशाही दिनामध्ये रेले कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला आहे. म्हाडा मुख्यालयात झालेल्या लोकशाही दिनात मिलिंद रेले यांनी केलेल्या अर्ज प्रकरणी सुनावणीवेळी मुंबईतील डी. एन. नगर, अंधेरीतील एका गृहनिर्माण संस्थेतील सदस्य दिवंगत बी. एस. रेले यांच्या नावे असलेली सदनिका त्यांच्या वारसांच्या नावे नियमितीकरण करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले. या निर्णयामुळे सुमारे ३५ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यात आले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहाव्या लोकशाही दिनात नऊ अर्जप्रकरणी सुनावणी झाली. तसेच मुंबईतील प्रभादेवी येथील पवनछाया सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भारती वंगारी यांच्या सदनिकेच्या नियमितीकरणाचा सन २००९ पासून प्रलंबित प्रश्न सोडवत जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच या सदनिकेतील अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्यांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही जयस्वाल यांनी दिले.
अंधेरी पश्चिम येथील वंदना शर्मा यांच्या अर्जाप्रकरणी पुनर्विकसित इमारतीत विकासकाने दोन सदनिका देण्याचा करारनामा केला असतांना संबंधित विकासकाने एकच सदनिका दिली. संबंधित अर्जदार शर्मा यांना दुसरी सदनिका मिळण्यासाठी इमारतीच्या नकाशात बदल करून इमारतीत असलेल्या फिटनेस सेंटरची जागा कमी करून उपलब्ध जागी सदनिका देण्यात यावी आणि त्याबदल्यात अर्जदार यांच्याकडून चटई क्षेत्राचे शुल्क घ्यावे, असे निर्देश जयस्वाल यांनी दिले.