सहानुभूती मिळवण्याचा देशमुखांचा केविलवाणा प्रयत्न; उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
10-Sep-2024
Total Views |
नागपूर : अनिल देशमुखांचा सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. देवेंद्र फडणवीस मला अटक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अनिल देशमुखांचा सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ही केस सीबीआयला दिली होती. गिरीष महाजनांना आरोपी बनवण्यासाठी अनिल देशमुखांनी माझ्यावर दबाव टाकला, असे स्पष्टपणे एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. गिरीष महाजनांवर मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, त्यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला, याबाबतचे सगळे पुरावे एसपींनी दिले आहेत. त्या काळातील नोंदीसुद्धा त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सीबीआयने देशमुखांवर कारवाई केली आहे. खरं म्हणजे कुठलीही चूक नसताना गिरीष महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वात आधी अनिल देशमुखांनी त्यांची माफी मागायला हवी," असे ते म्हणाले.
नागपूर अपघात प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, "नागपूर हिट अँड रन प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. परंतू, यावर ज्याप्रकारे राजकारण करण्यात येतंय ते चुकीचं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट करून यावर राजकारण सुरु आहे," असेही ते म्हणाले.