मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (bangladesh crisis update) बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारात इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून आतापर्यंत २०० हून अधिक जणांची हत्या करण्यात आली आहे. आरक्षणाविरोधात सुरु झालेले हे आंदोलन हिंसक वळणावर गेले असून बांगलादेशी हिंदूंना यात टार्गेट केले जात आहे. त्यात हिंदू महिलांवर अत्याचार, मंदिरांवरील हल्ले, लॅण्ड जिहाद अशा प्रकारच्या घटना याठिकाणी होत आहेत. बांगलादेशी हिंदू नरसंहारावर आता देश-विदेशातून निषेध व्यक्त होताना दिसत आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार व मंदिरांची तोडफोड याविरोधात नेपाळमधील बीरगंज येथे हिंदू समाजाने निदर्शने केली. यावेळी उपस्थितांकडून बांगलादेश सरकारकडे हिंदू समुदायाच्या सुरक्षेची हमी देण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेपाळमधील निदर्शने बीरगंजच्या मुख्य चौकातून सुरू झाली आणि विविध मार्गांनी फिरून जिल्हा प्रशासन कार्यालयासमोरील रस्त्यावरील सभेत रूपांतरित झाली. हिंदू समाजाच्या नेत्यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणारे हल्ले आणि मंदिरांची तोडफोड याला धार्मिक असहिष्णुतेची उदाहरणे म्हणत तीव्र निषेध केला. या घटनेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष घालावे, असेही त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? : कसा आहे बांगलादेशातील 'अंतरिम सरकार' प्रणालीचा इतिहास?
कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू जागरण मंच आणि सकल हिंदू समाजाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. सियालदह स्थानक परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी हिंदू बांधवांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांबाबत आवाज उठवला. त्यानंतर बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर रास्ता रोको करून निदर्शने सुरू केली. हिंदूंच्या अत्याचारावर विचारवंत गप्प का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
संयुक्त राष्ट्रानेही बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर निषेध व्यक्त केला आहे. आम्ही वांशिक आधारावर होणारे हल्ले आणि हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात आहोत. आम्ही निश्चितपणे बांगलादेशचे सरकार आणि लोकांना आवश्यक वाटेल त्या मार्गाने पाठिंबा देण्यास तयार आहोत. बांगलादेशमध्ये अलिकडच्या आठवड्यात सुरू असलेला हिंसाचार संपुष्टात येईल याची आम्हाला पुन्हा एकदा खात्री करायची आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते यांनी ही माहिती दिली.
हे वाचलंत का? : वंशविच्छेदामुळे बांगलादेशात हिंदू लोकसंख्येत घट
उत्तराखंडच्या राष्ट्रीय योगी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. यानंतर त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान मोदींना निवेदन दिले. राष्ट्रीय योगी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.एस.पी.भारद्वाज, जिल्हाध्यक्ष चंद्रपाल कोहली यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. हा अत्याचार केवळ मानवी हक्कांचे उल्लंघन नाही तर धार्मिक असहिष्णुतेचे टोकाचे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आणि बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने ठोस पावले उचलण्याचे आवाहनही केले.
जयपूरच्या हिंदू संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून बांगलादेशातील परिस्थिती आणि अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवरील हल्ले आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ निदर्शने केली. यावेळी समितीच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर संताप व्यक्त करत तेथील अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. हिंदू मंदिरे पाडणे आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणे हा केवळ एका समुदायावरील हल्ला नाही तर मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्यावरही मोठा हल्ला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारसोबत काम करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केंद्र सरकारकडे केली आहे.