लातूर : विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच आता मनसेने आपला चौथा उमेदवारही जाहीर केला आहे. लातूर ग्रामीणच्या जागेसाठी मनसेने संतोष नागरगोजे यांना उमेदवारी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी मनसेने शिवडी आणि पंढरपूर विधानसभेसाठी आपले उमेदवार घोषित केले होते. दरम्यान, शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर, तर पंढपूर विधानसभेसाठी मनसेने दिलीप धोत्रे यांचे नाव जाहीर केले होते. त्यानंतर आता लातूर ग्रामीणमध्ये संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी घोषित झाल्यानंतर संतोष नागरगोजे यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाले की, "सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला राजसाहेबांनी संधी दिली असून आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. लोकं या खिचडी राजकारणाला वैतागले आहेत. त्यामुळे या भागातील लोक नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्विकारतील," असे ते म्हणाले.