संकट दारात! हस्तक आपल्या घरात? आशिष शेलारांचा सवाल
07-Aug-2024
Total Views |
मुंबई : संकट आपल्या दारात आणि संकटाचे हस्तक आपल्या घरात आहेत का? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
आशिष शेलार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "जगातील काही देश युध्दाच्या तयारीत आहेत. भलेभले देश आर्थिक खाईत आहेत. पाकिस्तान तर समस्यांच्या वणव्यात केव्हाच जळून खाक झाला आहे. आता बांग्लादेश पेटला असून तिथे अराजकता माजली आहे. बांगलादेशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळीच घडी उध्वस्त झाली आहे. तिथल्या हिंदूवर हल्ले केले जात आहेत. देशाची प्रतीके, हिंदू मंदिरे उध्वस्त केली जात आहेत."
"आपल्या देशाच्या दारापर्यंत ही संकटे येऊन ठेपली आहेत. या सगळ्यात काही शक्तींचा मोठा वाटा आहे. आपल्या देशात गेली १० वर्षे ज्या पध्दतीने वातावरण निर्माण केले जातेय, त्यावरून त्याच आंतरराष्ट्रीय शक्तींनी आपले हस्तक भारतातही नियुक्त केले नाहीत ना? हस्तक इथल्या यंत्रणा, न्यायालय, पोलीस, कायदा, प्रशासन आणि संसद सगळ्या लोकशाहीच्या स्तंभावर अविश्वास निर्माण करीत आहेत. ISIS, PFI, सीमी, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज़बुल मुजाहिद्दीन, माओवादी अशा संघटनांची भाषा राजकीय व्यासपीठावरुन बोलत आहेत. समाजा-समाजात, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून टीव्ही, सोशल मिडियाचा वापर करत अशांतता पसरवत आहेत," असा सवाल त्यांनी केला आहे.