राज ठाकरे बैठक घेऊन निघाले अन् कार्यकर्ते आपापसांत भिडले! काय घडलं?
23-Aug-2024
Total Views |
चंद्रपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यातून बाहेर पडताच मनसेचे दोन गट आमनेसामने आले आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. मनसेने जाहीर केलेल्या विधानसभेच्या उमेदवारीवरून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांनी गुरुवारी चंद्रपूरमध्ये असताना दोन उमेदवारांची घोषणा केली. मनसेने चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरे आपल्या पुढील दौऱ्याकरिता रवाना झाले.
मात्र, त्यानंतर मनसेच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. राजूरा विधानसभेसाठी मनसेने जाहीर केलेल्या सचिन भोयर यांच्या उमेदवारीवरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे नेते चंद्रप्रकाश बोरकर यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध असल्याने हा गोंधळ झाला. सचिन भोयर यांना उमेदवारी देऊन खूप मोठी चूक केली असून आपल्यावर अन्याय झाला आहे, अशी भावना चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांची होती. यातूनच दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. दरम्यान, राज ठाकरेंनी चंद्रप्रकाश बोरकरांची हकालपट्टी केल्याचे सांगण्यात येत आहे.