मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभ हस्तांतरण प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. शुक्रवारी सकाळपासून तब्बल १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात हा लाभ जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे. आज सकाळपासून १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात ३००० रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते."
हे वाचलंत का? - "लिंबू चमचाच्या शर्यतीत लिंबू पडल्यावर..."; उद्धव ठाकरेंवर भाजपचा घणाघात
"सद्यस्थितीत एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, १७ तारखेपर्यंत अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लाखों महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले असून यापुढे अर्ज येणाऱ्या महिलांनाही हा लाभ मिळणार आहे.