मुंबई : जस लिंबू चमचाच्या शर्यतीत लिंबू पडल्यावर पहिला येऊनही काही उपयोग नसतो, तसंच तुमचं झालं आहे, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव जाहीर करा माझा पाठिंबा असेल असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. यावर आता केशव उपाध्येंनी प्रतिक्रिया दिली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "उद्धव ठाकरे, वोट जिहादच्या जीवावर निवडून आलेल्या तुमच्या उमेदवारांचा विजय हा तुमचा खूप मोठा वैचारिक पराभव आहे. जसं लिंबू चमचाच्या शर्यतीत लिंबू पडल्यावर पहिला येऊनही काही उपयोग नसतो, तसंच तुमचं झालं आहे. तुम्ही कधीच विचारधारा सोडली आणि या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि महाराष्ट्राला अडीच वर्षांची विचारहीन, जुलमी, घोटाळेबाज आणि वसुलीबाज राजवट मिळाली."
"याबदल्यात तुम्ही काय गमावलं? तुम्ही तुमची विचारधारा आधीच गमावली होती पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष तुम्ही तुमच्या अहंकारामुळे फोडला. बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार कार्यकर्ते तुमच्यापासून दुरावले. एवढं सगळं करूनही दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री पदासाठी लोटांगण घालून महाविकास आघाडीने न बोलता तुमचे मुख्यमंत्रीपद डावलले आहे. पण तुमची अवस्था एवढी दयनीय झाली आहे की, आज तुमच्यावर कोणीही मुख्यमंत्री झाला तरी पाठिंबा देतो, असं म्हणायची वेळ आली आहे," असा हल्लाबोल केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.