मुंबई : मनोज जरांगे आता एकटे पडत आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय भाषा टाळायला हवी, असा सल्ला भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. तसेच मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा अजिबात आवडत नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील जेवढी राजकीय भाषा टाळू शकतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते जेवढं मराठा आरक्षणाबद्दल बोलतील तेवढं त्यांच्या हिताचं आहे. नाना पटोले बोलले की, ओबीसीमधून मराठा आरक्षण नको, शरद पवारांनीही सांगितलं की, कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण द्या. उद्धव ठाकरेंचीही तिच भूमिका आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे एकटे पडत चालले आहेत."
"महाविकास आघाडी आणि महायूतीच्या नेत्यांची मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची तयारी असेल तर जरांगेंनीही ती भूमिका जाहीर करावी. मनोज जरांगेंच्या राजकारणामुळे समाजाचं नुकसान होत असेल तर मराठा समाज लवकरच आपली भूमिका घेईल, असं मला वाटतंय," असेही नितेश राणे म्हणाले.