पुणे : २८८ सोडा मनोज जरांगे विधानसभेत एकाही जागेवर निवडणूक लढणार नाहीत, असे वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केले आहे. तसेच जरांगेंच्या शांतता रॅलीला आमचा विरोध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
लक्ष्मण हाके म्हणाले की, "मनोज जरांगेंनी महाराष्ट्रात काढलेल्या शांतता रॅलीला आमचा विरोध आहे. महाराष्ट्रात त्यांनीच अशांतता निर्माण केली आणि तेच आता शांत करायला निघाले आहेत. या शांतता रॅलीच्या वेळी अनेक शहरांमध्ये शाळा बंद ठेवल्या गेल्या. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कायदा आणि सुव्यवस्था पाळू शकत नाहीत का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "मनोज जरांगे विधानसभा निवडणूकीमध्ये एकही उमेदवार उभा करणार नाहीत. मनोज जरांगे बिनबुडाचा लोटा आहे. लोकसभा निवडणूकीच्या वेळी ते म्हणाले की, आम्ही प्रत्येक लोकसभेत शेकडो अर्ज भरु. पण त्याचं काय झालं माहिती नाही. त्यानंतर त्यांनी इथल्या सगळ्या खासदारांना पाडण्याचं आव्हान दिलं. पण त्याचंही काही झालं नाही. ज्यावेळी निवडणूका लागल्या त्यावेळी ज्या लोकांनी मनोज जरांगेंना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसींचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेंनी केलं आहे. त्यामुळे २८८ सोडा ते एकही विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. ते कुठल्यातरी पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देतील आणि बाजूला होतील," असेही लक्ष्मण हाके म्हणाले.