अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला; आयुक्तांना विनंती!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती

    22-Jul-2024
Total Views |
state flood situaution by election
 

मुंबई :     अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेली अडचण लक्षात घेता राज्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांच्याशी चर्चा केली. तसेच सचिव सुरेश काकाणी आणि राज्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली.




निवडणूक आयोगाने राज्यातील विविध जिल्ह्यांतील ११ नगर परिषदांमधील ११ प्रभाग आणि हातकणंगले नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सर्व होऊ घातलेल्या पोटनिवडणुका ग्रामीण भागाशी संबंधित आहेत, हे विशेष. राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे.

तसेच मागील चार पाच दिवसांपासून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्याच जिल्ह्यात पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुशे अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता या निवडणुका पावसाळा संपल्यानंतर घेण्यात याव्यात, अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे.